रामलल्लाचे मनमोहक रुप सर्वांसमोर

0
33

मधुर हास्य अन्‌‍ ललाटावर टिळा; पहिलेवहिले बालरुप सोशल मीडियावर व्हायरल; 22 जानेवारीला अयोध्येत सोहळा

22 जानेवारीला अयोध्येतील भव्य राम मंदिरात होणाऱ्या प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. गुरुवारी 18 जानेवारीला मंदिराच्या गाभाऱ्यात मूर्ती स्थापित करण्यात आली होती. आता मंदिराच्या गर्भगृहात स्थानापन्न झालेल्या प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पहिले संपूर्ण छायाचित्र काल सर्वांसमोर आले. कारागिरांनी ही मूर्ती राम मंदिराच्या गाभाऱ्यात बसवल्यानंतर आणि काही धार्मिक विधी पार पडल्यानंतर आता रामलल्लाच्या डोळ्यांवरची पट्टी काल दूर करण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदाच रामलल्लाचा मनमोहक चेहरा समोर आला आहे. बालरुपातील रामलल्लाची लोभस मूर्ती पाहताक्षणीच अनेकांच्या नजरेत भरत आहे. रामलल्लाच्या चेहऱ्यावरील शांत भाव, तेज आणि मधुर हास्य मूर्तीच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकत आहेत. रामलल्लाचे हे पहिलेवहिले रुप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. कर्नाटकच्या अरुण योगीराज यांनी काळ्या पाषाणात रामलल्लाची ही मूर्ती कोरली आहे.

गेल्या तीन दशकांपासून देशातील राजकारण आणि समाजकारणाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या अयोध्येतील राममंदिराचे येत्या 22 जानेवारीला उद्घाटन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची मंदिरात प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. हा सोहळा आता अवघ्या काही काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सध्या देशभरात सर्वत्र ‘रामनामा’चा जप सुरू असून, सर्वांना अयोध्येतील सोहळ्याची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रभू रामांचा हा भव्य सोहळा ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी अनेकजण अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. देशभरातील रामभक्तांना आता फक्त रामललाच्या भेटीची ओढ लागली आहे. देशातील प्रत्येकाच्या मनी रामललाच्या दर्शनाची आस आहे.

‘त्या’ पाच न्यायमूर्तींनाही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण
अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेकासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 22 जानेवारीच्या दिवशी हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देश-विदेशातल्या व्यक्तींना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचे ज्या पाच न्यायमूर्तींनी राम मंदिर आणि बाबरी मशीद वाद प्रकरणाचा निकाल दिला होता, त्या सगळ्या न्यायमूर्तींनाही या सोहळ्यासाठी निमंत्रण धाडण्यात आले आहे.

राम मंदिर आणि बाबरी मशीद वादाची सुनावणी करणारे पाच न्यायमूर्ती रंजन गोगोई, शरद बोबडे, डी. वाय. चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दुल नजीर अशा पाचही न्यायमूर्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. या पाचजणांनी रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला होता. ज्यानंतर मंदिर निर्मिताचा मार्ग मोकळा झाला. आता हे पाचही न्यायमूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

कशी आहे रामलल्लाची मूर्ती?

राम मंदिरात स्थापित केलेल्या रामलल्लाच्या मूर्तीचे राजस, सुकुमार विलोभनीय रूप सर्वांसमोर आले आहे. या मूर्तीच्या ललाटावर टिळा, डाव्या हातात धनुष्य आणि आशीर्वाद देत असलेल्या उजव्या हातात बाण आहे.
रामलल्लाच्या मूर्तीची पायापासून ललाटेपर्यंतची उंची ही 51 इंच एवढी आहे. तसेच मूर्तीचे वजन सुमारे 200 किलो आहे.
रामलल्लाच्या मूर्तीमागची प्रभावळ वैशिष्ट्‌‍यपूर्ण आहे. प्रभावळीच्या दोन्ही बाजूंना सुरुवातीला हनुमंत आणि गरुडाच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत, तर वर मध्यभागी सूर्यदेवतेची मूर्ती आहे.
मूर्तीच्या उजवीकडून डावीकडे भगवान विष्णूच्या 10 अवतारांच्या प्रतिमा आहेत. यामध्ये मत्स्य, वराह, कूर्म, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की या अवतारांचा समावेश होतो.
प्रभावळीवर धार्मिक चिन्हे बनवली आहेत. त्यात स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आहे.

पर्वरीत सोमवारी ‘श्रीराम ज्योती’

>> पर्यटन खात्याकडून राज्य पातळीवर कार्यक्रम

राज्य सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे अयोध्येतील श्रीराम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सोमवार दि. 22 जानेवारी संध्याकाळी 6 वाजता पर्वरी येथे राज्य पातळीवर ‘श्रीराम ज्योती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक सुनील अंचिपाका यांनी काल दिली.

पर्यटन खात्याकडून आध्यात्मिक पर्यटनाला चालना दिली जात आहे. त्यामुळे श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त श्रीराम ज्योती कार्यक्रमाचे राज्य पातळीवर आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम पर्वरी येथे होणार आहे. त्यामुळे पर्वरी, पणजी बसस्थानक आदी भागातील प्रमुख मार्गावर आकर्षक सजावट आणि रोषणाई केली जात आहे. श्रीराम यांच्या प्रतिमा सर्वत्र उभारण्यात येत आहेत. विद्युत रोषणाईचे उद्घाटन 20 जानेवारीला संध्याकाळी 6 वाजता पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
श्रीराम ज्योती कार्यक्रमानिमित्त भजन संध्या, दिंडी, महाआरती, सांस्कृतिक नृत्य आदी कार्यक्रम होणार आहेत, अशी माहिती पर्यटन खात्याचे अधिकारी दीपक नार्वेकर यांनी दिली. हा कार्यक्रम आल्त-पर्वरी येथे हाउसिंग मंडळाच्या जागेत होणार आहे. दि. 22 रोजी संध्याकाळी 6 वाजता भजन संध्या या कार्यक्रम होणार आहे. तसेच, रामायणावर आधारित सांस्कृतिक नृत्यांचे सादरीकरण केले जाणार आहे. श्रीराम नामाच्या गजरात दिंडीचे सादरीकरण होणार आहे. यावेळी 1 हजार दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत. तसेच, 150 दिवजांची आरती होणार आहे. रात्री 9 वाजता महाआरती होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.