राज्यात 800 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणार ः ढवळीकर

0
3

>> 40 ईव्ही चार्जिंग स्टेशन्सची उभारणी करणार

राज्यात भारतीय तेल महामंडळातर्फे 800 मेगावॉट सौरऊर्जा प्रकल्प आणि त्यांच्या पेट्रोल पंपावर 40 ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती वीज आणि अक्षय ऊर्जामंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या दोन्ही प्रकल्पासंबंधी एक सामंजस्य करार नुकताच करण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांबरोबरच अन्य प्रकल्पसुद्धा हाती घेतले जाणार आहेत. राज्य सरकारकडून सौरऊर्जा निर्मितीवर भर दिला जात आहे. राजधानी पणजी वर्षभरात सौरऊर्जेवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात असून इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी खास अनुदान दिले जात आहे. तथापि, राज्यात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची कमतरता भासत असल्याने अनेक नागरिक इलेक्ट्रिक वाहन खरेदीकडे वळत नाहीत. त्यामुळे राज्यभरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. इंडियन ऑईल महामंडळातर्फे त्यांच्या पेट्रोल पंपावर 40 चार्जिंग स्टेशन सुरू केली जाणार आहेत. राज्यभरातील पेट्रोल पंपावर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.