राज्यात सापडले डेंग्यूचे १०२ रुग्ण

0
10

>> परिस्थिती नियंत्रणाखाली; आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांचा दावा

राज्यभरात आतापर्यंत डेंग्यूचे केवळ १०२ रुग्ण सापडले असून, राज्यात डेंग्यू परिस्थिती नियंत्रणाखाली आहे, अशी माहिती काल आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल विधानसभेत दिली.
काल प्रश्‍नोत्तराच्या तासाला आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाचे उत्तर देताना राणे यांनी ही माहिती दिली. अशा प्रकारच्या रुग्णांसंबंधीची माहिती गोळा करण्यास व लक्ष ठेवण्यास खात्याने पंचायत स्तरावर ‘रोगी कल्याण समित्या’ स्थापन केल्या असल्याचे सांगून त्यासाठी पंचायतींची मदत घेतली असल्याचे राणे यांनी यावेळी पुढे बोलताना स्पष्ट केले.

यावेळी तक्रार करताना रेजिनाल्ड म्हणाले की, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ डेंग्यू रुग्णांसह अन्य रुग्णांवर तेथे उपचार न करता त्यांना उपचारासाठी गोमेकॉत पाठवत असते. त्यामुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना मडगाव येथून बांबोळीत धाव घ्यावी लागते. मडगावमधील रुग्णांवर मग तो डेंग्यूचा रुग्ण असो अथवा अन्य कोणत्याही आजाराचा, त्याच्यावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातच उपचार व्हायला हवेत, अशी मागणी रेजिनाल्ड यांनी केली.

त्यावर उत्तर देताना राणे म्हणाले, की अशा रुग्णांवर आरोग्य केंद्रातही उपचार करणे शक्य आहे. पण तसे असताना सर्व रुग्णांना उत्तर व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ तसेच उपजिल्हा इस्पितळ अशी ही तिन्ही इस्पितळे रुग्णांना गोमेकॉत पाठवून देत असतात. आपण आता रोज यावर लक्ष ठेवणार असून, आरोग्य सचिवांनाही लक्ष ठेवायला सांगणार आहे. एखाद्या रुग्णाला गोमेकॉत का पाठवून देण्यात आले त्याचे स्पष्टीकरण मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी रेजिनाल्ड, तसेच दिगंबर कामत, विजय सरदेसाई, रुडॉल्फ फर्नांडिस आदी आमदारांनी डेंग्यू, मलेरिया व चिकनगुन्या आदी डासांपासून होणार्‍या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी औषधांची फवारणी करण्याची मागणी केली. त्यावर उत्तर देताना राणे म्हणाले, की फवारणी करण्यात येत असून, आता त्यात गरज भासल्यास वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.