राज्यात संचारबंदी आठवड्याने वाढवली

0
34

कोविड महामारीमुळे राज्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी गोवा सरकारने पुन्हा एकदा वाढवली असून आता ती येत्या १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. मागील संचारबंदीच्या काळात लागू करण्यात आलेले निर्बंध तसेच पुढे लागू राहणार आहेत.

मांडवी नदीतील तरंगणार्‍या कॅसिनोसह राज्यातील सर्व कॅसिनो, प्रेक्षकागृहे, समाजसभागृहे, जलक्रीडा, जलउद्याने, करमणूक उद्याने, स्पा, मसाज पार्लर्स ही बंदच राहतील. एखाद्या स्थळावर त्याच्या क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना एकत्र आणून सामाजिक, राजकीय मेळावे, क्रीडा मेळावे तसेच करमणुकीचे, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम, लग्न समारंभ, अन्य सोहळे आदी आयोजित करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

अन्य राज्यांतून येणार्‍यांना ७२ तासांपूर्वी केलेला कोविड चाचणीचा आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सादर केल्यास राज्यात प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र आणीबाणीच्या वैद्यकीय उपचारासाठी परराज्यातून जर कुणाला गोव्यात यायचे असेल तर त्याला त्यासाठीचा पुरावा सादर करावा लागेल. तसेच कोविड लशीचे दोन्ही डोस घेतलेल्या व कोविडची कोणतीही लक्षणे नसलेल्यांना प्रवेश देण्यात येईल. त्यात येथील उद्योगात काम करणारे कामगार व मजूर तसेच उद्योगधंदा व नोकरीसाठी येणारे कोविडमुळे परराज्यात अडकून पडलेल्यांचा समावेश असेल.
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात दि ९ मेपासून ही संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. संचारबंदीत सातत्याने वाढ करण्यात येत आहे. काल पुन्हा ही वाढ करण्यात आली असून ही संचारबंदी आता दि. १३ सप्टेंबरपर्यत लागू राहील.