राज्यात गुरुवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

0
41

>> काणकोणात शनिवारी ४ इंच पावसाची नोंद

हवामान खात्याने राज्यात अतिवृष्टीचा इशारा परवा शनिवारी दिल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल रविवारी राज्य प्रशासन पावसामुळे राज्यावर कोसळू शकणार्‍या संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज झाले होते. हवामान खात्याने काल नव्याने ९ सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टी होऊ शकते, असा इशारा दिलेला आहे.

काणकोणात ४.३३ इंच पाऊस
मागच्या दोन दिवसांपासून काणकोण तालक्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे तालुक्यातील गालजीबाग आणि तळपण नदीला पूर आलेला आहे. काल शनिवारी तालुक्यात तब्बल ४.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी उसंत घेतली होती. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने जोरदार कोसळण्यास सुरुवात केली आहे. राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेकडून व्यक्त करण्यात येत असून, अशीच परिस्थिती कायम राहिल्यास नदीकाठच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता येथील नागरिक व्यक्त करत आहेत.अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जनजीवनही कधी नव्हे एवढे विस्कळीत झाले.

वास्कोत वृक्ष कोसळून नुकसान
दरम्यान, काल सकाळी वास्को शहरातील बाजार परिसरात एक मोठा वृक्ष उन्मळून पडल्याने ७ ते ८ चारचाकी गाड्यांची व दोन दुचाकींची मोडतोड झाली. वृक्ष जेथे कोसळला तेथेही वाहने पार्क करून ठेवण्यात आली होती. चतुर्थीनिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी असते. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.