राज्यात भाजपविरोधात महाआघाडीसाठी प्रयत्न

0
9

>> सोमवारपर्यंत चित्र स्पष्ट होणार

तृणमूल कॉंग्रेस व मगो पक्ष यांच्यात युतीत आता राज्यातील एक प्रमुख पक्ष असलेला कॉंग्रेस व प्रादेशिक पक्ष गोवा फॉरवर्ड यांना सामावून घेऊन राज्यात भाजपविरोधात एक महाआघाडी स्थापन करण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख ममता बॅनर्जी व कॉंग्रेसचे निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांच्यात लवकरच त्यासंबंधी बोलणी होण्याची शक्यता असल्याची माहिती काल दोन्ही पक्षातील सूत्रांनी दै. नवप्रभाशी बोलताना दिली.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख आमदार विजय सरदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना तसेच ट्विटद्वारे भाजपाविरोधात महाआघाडी स्थापन होण्याची गरज व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर आता ही महाआघाडी मूर्त रुप घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमच्या प्रतिनिधीने काल मगो पक्षाचे नेते व आमदार सुदिन ढवळीकर यांना याविषयी विचारले असता त्यांनी, तृणमूल कॉंग्रेस व मगो पक्ष यांच्या महाआघाडीत कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड ह्या पक्षांनी सहभागी व्हावे यासाठी ममता बॅनर्जी व कॉंग्रेसचे गोव्यातील निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् यांच्यात लवकरच बोलणी होणार असून सोमवारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली.