राज्यात प्राणी कल्याण मंडळाची स्थापना

0
37

>> उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सरकारची माहिती

राज्यात प्राण्यांवर होणारी क्रुरता रोखण्यासाठी तसेच मुक्या प्राण्यांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्य प्राणी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच बैलांच्या झुंजीचे आयोजन करणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्सच्या सूचनेनुसार प्रत्येक पोलीस स्थानकात विशेष विभाग कार्यरत करण्यात आले आहेत.

त्याशिवाय २०१८ ते ७ सप्टेंबर २०२१ पर्यंत राज्यात गुरांच्या झुंजीचे आयोजन केल्याप्रकरणी ४६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून ८८ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन व पशुचिकित्सा खात्याचे संचालक डॉ. आगुस्तिनो अँटोनियो मिस्किता यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर प्रतिज्ञापत्राद्वारे सादर केली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
या प्रकरणी ‘पीपल फॉर एनिमल्स’ या बिगर सरकारी संघटनेने खंडपीठासमोर याचिका सादर केली होती. त्यानंतर २० डिसेंबर १९९६ रोजी खंडपीठाने गुरांच्या झुंजीवर बंदी आणली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र ते फेटाळण्यात आले होते. जानेवारी आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये राज्यात कोविडचे निर्बंध लागू असताना झुंजींचे आयोजन केले जात असल्याबद्दल तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर याचिकादाराने खंडपीठात अवमान याचिका दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठात वरील माहिती देण्यात आली.