राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडींना वेग

0
87

>> तवडकरांना मगोची उमेदवारी, प्रियोळात गावडेंना भाजपचा पाठिंबा, प्रताप गावसांचे बंड

 

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत व पर्यायाने मतदानाची तारीख नजीक ठेपली असताना राज्यातील राजकीय क्षेत्रातील नाट्यमय घडामोडींनाही वेग आला आहे. कालचा दिवसही याला अपवाद नव्हता. डिचोलीतील कालच्या सोहळ्यात कॉंग्रेसच्या प्रवीण झांट्येना भाजपात प्रवेश देण्यात आला. भाजपने उमेदवारी नाकारलेल्या क्रीडामंत्री रमेश तवडकर यांना उमेदवारी देण्याचे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सांगितले. तर सभापती अनंत शेटही निर्णयाच्या अंतिम टप्प्यात आहेत. मगो अध्यक्ष दीपक ढवळीकरांना पराभूत करण्यासाठी भाजपाने अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

भाजपने गावडेंना पाठिंबा दिल्यामुळे आम आदमी पक्षाने त्यांना आधी दिलेला पाठिंबा मागे घेतला आहे.
दुसरीकडे विरोधी कॉंग्रेसच्या माजी आमदार प्रताप गावस यांनी आपल्या अनेक समर्थकांसह काल पक्षाचा राजिनामा देऊन अपक्ष निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. विरोधी महायुतीच्या प्रयत्नातील एक घटक असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागण्या मान्य करण्यास कॉंग्रेसने नकार दिला. मात्र गोवा फॉरवर्डच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली.

प्रवीण झांट्ये भाजपात

मये मतदार संघातून भाजपा उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या प्रवीण झांट्ये यांचे काल डिचोलीतील मेळाव्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.
सभापती अनंत शेट यांना उमेदवारी डावलण्यात आली तरी त्यांच्याबद्दल पक्षाची भावना आदराचीच असून त्यांचा योग्य सन्मान पक्ष राखून सन्मानाचे स्थान देईल. प्रवीण झांट्ये यांनी देखील त्यांचा मान राखावा असे आवाहन पार्सेकर यांनी केले. रमेश तवडकर यांनी पक्षाचा राजिनामा दिल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी टिका करताना पक्षाची विचारसरणी मानणार्‍यांनी असा निर्णय घेणे अपेक्षित नव्हते असे पार्सेकर म्हणाले. उमेदवारी आपणालाच ही मक्तेदारी चुकीची असून व आपणच आमदार असावा ही अभिलाषा योग्य नसून सर्वच कार्यकर्त्यांसाठी मये व काणकोणमध्ये हा योग्य संदेश असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.