राज्यात कोरोना बळींची संख्या तीन हजारांपार

0
115

>> चोवीस तासांत ११ मृत्यू, ३०३ नवे बाधित

राज्यात कोरोना विषाणमुळे काल मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात ह्या महामारीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३ हजारांवर पोहोचली असून ती ३००८ एवढी झाली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांच्या तुलनेत काल कोरोनाबाधितांच्या संख्येतही वाढ दिसून आली. गेल्या चोवीस तासांत कोरोनाबाधित नव्या ३०३ रुग्णांची नोंद झाली आहे.

सोमवारी कोरोनाचे नवे रुग्ण २१८ तर रविवारी कोरोनाचे २०७ रुग्ण सापडले होते. मात्र काल मंगळवारी पुन्हा ३०० च्या वर बाधितांची संख्या गेली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या २९२० एवढी खाली आली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,६४,९५७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.४१ टक्के एवढे आहे.

चोवीस तासांत ४३८ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात ४३८ जण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संंख्या १,५९,०२९ एवढी झाली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.

इस्पितळांतून काल डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या २६ एवढी आहे. तर काल नव्याने इस्पितळात ४२ जणांना भरती करण्यात आले. काल दिवसभरातील चोवीस तासांत राज्यात एकूण ४३११ एवढ्या स्वॅबच्या चाचण्या करण्यात आल्या. काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने २६१ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.
आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २७,८५७ एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,१३,६२६ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत ८,९५,४०९ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

११ जणांचा मृत्यू
काल राज्यात कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना संक्रमणाचे प्रमाण काही अंशी कमी झाले असून कोरोना मुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या ११ मृत्यूंपैकी ७ जणांचा मृत्यू बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात झाला. एकाचा मृत्यू मडगावच्या दक्षिण जिल्हा इस्पितळात तर दोघांचा मृत्यू दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात तर एकाचा मृत्यू उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात झाला आहे.