राज्यात कोरोनाने ९ बळी, २२९ बाधित

0
104

राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ९ कोरोना रुग्णांचा बळी गेला असून नव्या २२९ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २७२७ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३०२२ एवढी झाली आहे.

राज्यात जून महिन्यापासून नवीन कोरोना रुग्ण आणि कोरोना बळींच्या संख्येत चढउतार सुरू आहे. मागील काही दिवसांत दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्रकारचे रुग्ण आढळून आले आहेत. शेजारील महाराष्ट्र राज्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ६.३६ टक्के एवढे आहे. नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५ टक्क्यांच्या खाली येण्याची गरज आहे. इस्पितळातून ३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात कोरोना बळींच्या संख्येत चढउतार सुरू आहे. चोवीस तासांत आणखी ९ रुग्णांचा बळी गेला आहे. गोकॉमध्ये ६ रुग्ण, दक्षिण गोवा इस्पितळात ३ रुग्णांचा बळी गेला आहे. चोवीस तासांत आणखी ३५९६ स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील २२९ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.

मडगाव, पणजी, कांदोळी, पर्वरी, फोेंडा, कुठ्ठाळी, वास्को, कासावली, पेडणे, साखळी, काणकोण या भागात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६५ हजार ४२६ एवढी झाली आहे. कोरोनाबाधित नव्या ३५ रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

फोंडा येथे सर्वाधिक २३१ रुग्ण आहेत. मडगाव येथे १५३ रुग्ण, काणकोण येथे ११५ रुग्ण, कुठ्ठाळी येथे ११० रुग्ण, पणजीमध्ये १५४ रुग्ण, म्हापसा येथे १०२ रुग्ण, साखळी येथे १२८ रुग्ण, कांदोळी येथे ११९ रुग्ण, चिंबल येथे १०८ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागांतील रूग्ण संख्या शंभरपेक्षा कमी आहे. नवीन १९४ जणांनी होमआयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.

राज्यातील आणखी २५८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५९ हजार ६७७ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५२ टक्के एवढे आहे.

कोरोना रुग्णांसाठी
दोन इस्पितळे राखीव
राज्यातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने बांबोळी येथील सुपर स्पेशालिटी आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ कोरोना रूग्णांना उपचारासाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. राज्यात इतर कोविड इस्पितळांचा दर्जा मागे घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळून आल्याने म्हापसा येथील जिल्हा इस्पितळ, मडगाव येथील ईएसआय इस्पितळ, फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळ, वास्को येथील सरकारी इस्पितळ कोविड रुग्णांना राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेत आता कमी रुग्ण आढळून येत असल्याने कोरोना रुग्णांना वरील दोन इस्पितळे राखीव ठेवण्याचे ठरविले आहे.

दुसर्‍या डोससाठी नोंदणीची गरज नाही

कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी कोविन पोर्टलवर नोंदणी करण्याची गरज नाही. नागरिकांना लशीचा दुसरा डोस देण्यास शुक्रवारपासून प्रारंभ केला जाणार आहे, अशी माहिती राज्य लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी काल दिली.

नागरिक लशीचा दुसरा डोस थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेऊ शकतात. तसेच, कागदपत्रे नसलेल्या नागरिकांना लस देण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे, असेही डॉ. बोरकर यांनी सांगितले.