जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा विचार

0
110

>> दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान मोदींचे आश्‍वासन

नवी दिल्लीत जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांच्या काल झालेल्या बैठकीत काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित नेत्यांना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत बहुतेक नेत्यांनी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच राज्यात लवकर निवडणुका घ्याव्यात अशीही मागणी केली. जवळपास साडेतीन तास ही बैठक चालली.

निवडणुकांना प्राधान्य ः मोदी
पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीमध्ये काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया पुन्हा प्रस्थापित करणे याला आपले प्राधान्य असेल. जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकादेखील विनासायास पार पडायला हव्यात, असे सांगितले. जम्मू-काश्मीरमधील मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर विधानसभा निवडणुका घेतल्या जातील असे पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर त्याला सर्वपक्षीय नेत्यांनी सहमती दर्शवली.
काश्मीरमधील तरुणांचे संरक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. आपण इथल्या तरुणाईला संधी द्यायला हवी, त्या बदल्यात ते देशाला खूप काही परत देतील, असे पंतप्रधान म्हणाले.

या सर्वपक्षीय बैठकीत माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, महबूबा मुफ्ती आणि कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. बैठकीत उमर अब्दुल्ला, रवींद्र रैना, कवींद्र गुप्ता, निर्मल सिंह, सज्जाद लोन, भीम सिंह या नेत्यांची उपस्थिती होते. त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, एनएसए अजित डोवाल, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी करण्यात आलेल्या मागण्यांत काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी मुख्य होती. कॉंग्रेसतर्फे काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन, जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका, राजकीय नेत्यांची नजरकैदेतून सुटका असे मुद्दे मांडण्यात आले.

यावेळी बोलताना भाजप नेते रवींद्र जैन यांनी, जम्मू काश्मीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत. जम्मू काश्मीरमधील जनतेच्या कल्याणासाठी केंद्र सरकार पावले उचलत असल्याचे सांगितले.

काश्मीरी पंडितांचा विरोध
दरम्यान, काल आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीला काश्मिरी पंडितांनी विरोध दर्शवला. आपला विरोद दर्शवताना काश्मीरी पंडितांनी जम्मूत आंदोलनही केले.

विकासासाठी सरकार कटिबद्ध ः अमित शहा
जम्मू-काश्मीरच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असे गृहमंत्री अमित शहा यांनी या बैठकीनंतर सांगितले. शहा म्हणाले की, राज्याच्या भवितव्याबाबत बैठकीत चर्चा झाली. राज्यात लवकरच शांततेत निवडणूक घेण्यात येईल. तसेच जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन संसदेत सरकारने दिले होतं. यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे शहा म्हणाले.