राज्यात कोरोनाने ५ जणांचा मृत्यू

0
37

>> नवे ६२ रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या ८७३ वर

राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी असले, तरी काल पुन्हा एकदा मृतांचा आकडा वाढल्याचे दिसून आले. काल कोविडमुळे राज्यात ५ जणांचा मृत्यू झाला.

गेल्या २४ तासांत राज्यात ६२ नवे रुग्ण आढळले आहेत. एकूण ४२२५ चाचण्या करण्यात आल्या, त्यात ६२ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. कोविड संसर्गाची टक्केवारी राज्यात १.४ टक्के एवढी अल्प आहे; मात्र कोविडमुळे गंभीर अवस्थेतील ५ रुग्णांचा काल राज्यात मृत्यू झाला. त्यात राय येथील ८० वर्षांचा वृद्ध, कोलवा येथील ७९ वर्षांची वृद्धा, पणजीतील ५५ वर्षांचा इसम, सालपे येथील ७० वर्षांची वृद्ध महिला व शिरोडा येथील ७९ वर्षांच्या वृद्ध इसमाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३१७६ एवढी झाली आहे.

राज्यभरात काल ९६ रुग्ण कोविडमुक्त झाल्याने सक्रिय कोविड रुग्णांची संख्या आता ८७३ एवढी झाली आहे. काल इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या ४ एवढी होती, तर इस्पितळात भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ७ एवढी होती. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या ९७.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे.