राज्यात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

0
7

गोव्यात आज 19 रोजी गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. आज राज्यातील काही भागांत ताशी 40 कि. मी. एवढ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचेही वेधशाळेने स्पष्ट केले आहे.

राज्यात उद्या 20 जूनपर्यंत हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 कि. मी. प्रती ताशी या वेगाने वारेही वाहण्याची शक्यता आहे. तद्नंतर 22 जूनपासून राज्यात सातत्याने पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

सध्या राज्यात पावसाचा जोर अगदीच कमी असून कधी कधी तुरळक प्रमाणात पाऊस पडत असून जून महिना आतापर्यंत जवळजवळ कोरडाच गेल्याने तो गोमंतकीयांसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे. पावसाअभावी शेतीची कामे अडून राहिलेली असून राज्यातील धरणेही कोरडी पडण्याची भीती निर्माण झालेली आहे.