गोव्याला 2047 पर्यंत विकसित करणार

0
7

गोवा क्रांतीदिनी आझाद मैदानावर मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

2047 साली जेव्हा भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील तोपर्यंत गोवा हे एक विकसित राज्य बनवणे हे उद्दिष्ट डोळ्यांपुढे ठेवून आपले सरकार काम करीत आहे. स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया आदी क्षेत्रांबरोबरच अन्य विविध क्षेत्रांत क्रांती घडवण्यासाठी गोवा राज्य सज्ज झाले आहे, असे उद्गार काल 18 जून रोजी गोवा क्रांतीदिनानिमित्त आझाद मैदानावरील स्मृतिस्थळावर हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.

गोवा क्रांतीदिनाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी यासाठी इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पुस्तकात गोवा क्रांतीदिनावरील पाठाचा समावेश पुढील वर्षापासून करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

काल आझाद मैदानावर क्रांतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्य सचिव पुनितकुमार गोयल, विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव, वीजमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, आमदार रूडाल्फ फर्नांडिस, पणजीचे महापौर रोहित मोन्सेर्रात, पोलीस महासंचालक जसपाल सिंग, विविध स्वातंत्र्यसैनिकांनी श्रद्धांजली वाहिली.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, गोवा क्रांतीदिनावरील पाठ सध्या इयत्ता चौथीच्या गोमंतक बालभारती ह्या पुस्तकात असल्याची माहिती दिली. गोवा दमण आणि दिव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरूदास कुंदे यांनी गोवा क्रांतीदिनावरील पाठाचा इतिहासाच्या पुस्तकात समावेश करण्यात यावा यावेळी केलेल्या आपल्या भाषणातील मागणीचा धागा पकडून बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावीच्या इतिहाच्या पुस्तकात या पाठाचा समावेश करण्यात येईल.

18 जून 1946 रोजी स्वातंत्र्यसेनानी डॉ. राम मनोहर लोहिया व डॉ. ज्युलिओ मिनेझिस यांनी गोव्यात केलेल्या क्रांतीचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला व राज्यातील सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या ज्या मागण्या असतील त्या पूर्ण केल्या जातील, असे स्पष्ट केले.

स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना पुढील वर्षापर्यंत नोकऱ्या

स्वातंत्र्यसैनिकांच्या 100 मुलांना सरकारी नोकरीची प्रतिक्षा असून त्यांना पुढील वर्षापर्यंत नोकरी मिळेल, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यानी दिले. दोघां-तिघा स्वातंत्र्यसैनिकांच्या पेन्शनचा प्रश्न असून तो एक-दोन महिन्यात सोडवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोवा दमण दिव स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष गुरूदास कुंदे यांनी यावेळी बोलताना 18 जून 1946 ह्या दिवशी राम मनोहर लोहिया यांचे मडगाव शहरात आगमन झाल्यानंतर काय घडले याची माहिती दिली. ह्या क्रांतीदिनानंतरच गोव्यात खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यलढा सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणाऱ्या इतिहासाच्या पुस्तकात क्रांती दिनावरील पाठाचा समावेश करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी दिली.

गोवा संपन्न राज्य बनेल ः राज्यपाल
सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेले गोवा हे देशातील सर्वोत्कृष्ट, संपन्न राज्य बनू शकेल असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. स्वातंत्र्य हे केवळ राजकीयच नाही तर सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य असल्याचे सांगून राज्यपालांनी आपली व्यवस्था दिवसेंदिवस विकसित होत आहे असे आपण अभिमानाने म्हणू शकतो आणि आपली भारतीय राज्यघटना जगातील सर्वोत्कृष्ट संविधानांपैकी एक म्हणून स्वीकारली गेली आहे. राज्यात विद्यमान सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल आनंद व्यक्त केला. राज्यपालांनी डॉ. राम मनोहर लोहिया आणि डॉ. ज्युलियो मिनेझिस यांच्या पोर्तुगीज राजवटीविरुद्ध लढलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांचे योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविले पाहिजे असे सांगितले.
खोर्ली तिसवाडी बालभवन समूहाने देशभक्तीपर गीत सादर केले. श्रीमती अक्षता भट पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले.