राज्यात आजवर ११६ इंच पाऊस

0
187

>> गेल्या चोवीस तासांत पाच इंचांची नोंद

राज्यात मागील चोवीस तासांत पाच इंच पावसाची नोंद झाली असून केपे येथे सर्वांधिक ७.७१ पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील नव्याने तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १३ ऑगस्टनंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील चोवीस तास झोडपून काढल्यानंतर सध्या पावसाचे प्रमाण थोडे कमी झाले असून काही भागात जोरदार सरी कोसळत आहेत. राज्यात आत्तापर्यत ११५.८० इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त आहे. चोवीस तासात उत्तर गोव्यात ५.०१ आणि दक्षिण गोव्यात ५.१६ इंच पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील सर्वच भागात सोमवारी जोरदार पावसाची नोंद झाली. केपे येथे सर्वांधिक ७.७१ इंच पाऊस कोसळला. पेडणे येथे ५.२२ इंच, पणजी येथे ५.६६ इंच, ओल्ड गोवा येथे ५.६१ इंच, म्हापसा येथे ३.९३ इंच, साखळी येथे ४.४४ इंच, वाळपई येथे ५.१९ इंच, काणकोण येथे ३.७७ इंच, दाभोळी येथे ४.५३ इंच, मडगाव येथे ५.८३ इंच, मुरगाव येथे ४.३१ इंच, सांगे येथे ४.८२ इंच पावसाची नोंद झाली आहे. फोंड्यातील पावसाची माहिती उपलब्ध झाली नाही.

पेडण्यात १३९.३२ इंच
राज्यात यंदा पेडणे तालुक्यात सर्वाधिक १३९.३२ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडण्यात गतवर्षीप्रमाणे यंदाही पावसाचे प्रमाण जास्त आहे. साखळी येथे १२४.४४ इंच आणि काणकोण येथे १२३.०२ इंच पावसाची नोंद झाली आहे.