राज्यात अजूनही १६% घरांना नळजोडण्या नाहीत ः ढवळीकर

0
259

गोवा सरकारने राज्यातील १०० टक्के घरांना पाणीपुरवठा करण्यात आल्याचे म्हटले असले तरी ती वस्तुस्थिती नसून अजूनही राज्यातील १६ टक्के घरांना नळ जोडण्या देण्यात आलेल्या नाहीत, असा खुलासा काल माजी पाणी पुरवठा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला. सरकारने आत्मस्तुतीसाठी खोटी माहिती देऊ नये, असा सल्लाही ढवळीकर यांनी काल एका व्हिडिओद्वारे सरकारला दिला.

गोवा हागणदारी मुक्त झाल्याचेही सरकारने काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते, तेही तेही खोटे असून गोव्यातील कित्येक गावांत शौचालये नसल्याने अजूनही लोकांना उघड्यावर जावे लागत असल्याचे ढवळीकर यांनी म्हटले आहे.
फोंडा, प्रियोळ, सावर्डे व अन्य कित्येक ठिकाणच्या लोकांनी शौचालयांसाठी सरकार दरबारी पैसे भरलेले असले तरी अद्याप या लोकांना सरकारने शौचालये दिली नसल्याचे ढवळीकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात ३४ हजार कृषी कार्डधारक असून त्याखाली मिळणार्‍या योजनांसाठी २१ हजार कार्डधारक हे पात्र ठरले आहेत. तर लाभार्थींसाठी हजार जणांची नाव नोंदणी झालेली आहे, असे ढवळीकर म्हटले असून ज्या प्रमाणे कामगार निधी घोटाळा झाला होता तसा घोटाळा येथेही होऊ नये यासाठी सरकारने या सर्वांची नावे, पत्ते व हे लोक कसले कृषी उत्पन्न घेतात ते तपशील सरकारने जाहीर करावेत, अशी मागणीही ढवळीकर यांनी केली आहे.
दरम्यान, भोपळा, काकडी, सुरण, रताळी आदींचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांनाही सरकारने कृषी कर्जे द्यावीत, अशी मागणीही ढवळीकर यांनी केली आहे.