राज्यातील संचारबंदी आठवड्याने वाढवली

0
57

कोरोनामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत राज्य सरकारने पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ही संचारबंदी पुढील सोमवार दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

सरकारने राज्यातील कॅसिनो, सिनेमागृहे, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, एन्टरटेन्मेंट, ऑडिटोरियम, जलक्रीडा, वॉटर पार्क, स्पा, मसाज पार्लर्स आदी बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील कोरोना स्थिती अद्याप आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे संचारबंदी वाढवली असून उत्तर व दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी त्या संबंधीचा आदेशही जारी केला आहे.

रविवारी १०५ कोरोनामुक्त
गेल्या चोवीस तासांत राज्यात १०५ जण बरे झाले आहेत. तर इस्पितळांतून काल १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या १,६७,०४६ एवढी झाली आहे. तसेच काल नव्याने इस्पितळात १४ जणांना भरती करण्यात आले.

काल कोरोनाची सौम्य लक्षणे आढळल्याने ४५ जणांनी घरी विलगीकरणाचा निर्णय घेतला.

सध्या राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण मडगाव येथे असून त्यांची संख्या ७९ आहे. कासावली ५८, पणजी ७०, शिवोली ५१ अशी रुग्णसंख्या आहेत.

आतापर्यंत इस्पितळात उपचार घेतलेल्यांची संख्या २८,६५० एवढी असून गृहविलिनीकरणात राहिलेल्यांची संख्या १,१९,०७८ एवढी आहे. राज्यात आतापर्यंत १०,५९,७१८ एवढ्या लोकांची कोरोना संसर्गाची चाचणी करण्यात आलेली आहे.

कोरोनाने एकाचा मृत्यू
राज्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे एका मृत्यूची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३१४८ झाली आहे. तसेच काल राज्यात ५९ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. काल राज्यातील ३५३४ जणांची स्वॅब चाचणी करण्यात आली. सध्या राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या १०११ एवढी झाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या १,७१,२०५ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५७ टक्के आहे.