राज्यातील भाजप सरकार असंवदेनशील : आमोणकर

0
11

>> अतिवृष्टीमुळे राज्य संकटात;
>> सरकार मात्र उत्सवात दंग

संपूर्ण गोव्यात पावसाने थैमान घातले आहे. लोकांची घरे उद्ध्वस्त झालेली असताना आणि नागरिक हवालदिल होऊन मदतीची याचना करीत असतानाच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी असंवेदनशील बुधवारी एका स्नेहमेळाव्याचे आयोजन करणे हे धक्कादायक आहे. मुख्यमंत्र्यांना भाजप सरकारचे १०० दिवस साजरे करण्याचा नैतिक अधिकार नाही. जनता संकटात असताना स्नेहमेळावा आयोजनातून भाजप सरकारचा असंवेदनशीलपणा उघड झाला आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे आमदार संकल्प आमोणकर यांनी काल केली.

भाजप सरकारच्या १०० दिवस पूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आपणास सदर स्नेहमेळाव्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले आहे. यातून भाजपचा निर्लज्जपणा उघड होत आहे. आज संपूर्ण गोवा अतिवृष्टीमुळे जवळजवळ बुडाला आहे. लोक बेघर झाले आहेत. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांनी खरेतर लोकांना मदत करण्यासाठी पुढे येणे गरजेचे होते. दुर्देवाने मुख्यमंत्री स्नेहमेळावे आयोजित करून उत्सव साजरे करण्यात धन्यता मानत आहेत, अशी टीका देखील संकल्प आमोणकर यांनी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर स्नेहमेळाव्याचे आयोजन रद्द करावे. सरकारी तिजोरीतून जनतेचा पैसा वायफळ खर्च करण्याचा भाजप सरकारला अधिकार नाही. सरकारने खर्च कपात करून जनतेला मदत करणे गरजेचे आहे, अशी मागणी आमोणकर यांनी केली.