राज्यसभेच्या 56 जागांसाठी निवडणूक जाहीर

0
4

>> 27 फेब्रुवारीला मतदान आणि निकाल; 15 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्जांसाठी मुदत

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या 15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम काल जाहीर केला. त्यानुसार, 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. मतदानानंतर त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

एकूण 15 राज्यांतील 56 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल 2024 मध्ये संपत आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, 8 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जाहीर होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करता येईल. 16 फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जांची छाननी प्रक्रिया होईल. तसेच, 20 फेब्रुवारीपर्यंत उमेदवार आपला अर्ज मागे घऊ शकतील. 27 फेब्रुवारीला सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल. मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होऊन निकाल जाहीर होईल.

उत्तर प्रदेशमधून राज्यसभेच्या सर्वाधिक 10 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र व बिहार प्रत्येकी 6, पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश प्रत्येकी 5, गुजरात आणि कर्नाटक प्रत्येकी 4, आंध्रप्रदेश, तेलंगण, राजस्थान व ओडिसा प्रत्येकी 3, उत्तराखंड, छत्तीसगढ, हरयाणा आणि हिमाचल प्रदेशमधील प्रत्येकी 1 जागेसाठी मतदान होणार आहे.

निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक
राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या एकूण खासदारांपैकी सर्वाधिक म्हणजेच, तब्बल 60 खासदार भाजपचेच आहेत. यापैकी 57 खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये पूर्ण होत आहे. एप्रिलमध्ये निवृत्त होणाऱ्या भाजपच्या राज्यसभा खासदारांमध्ये केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षणमंत्री भूपेंद्र यादव, आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा समावेश आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचाही कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार आहे.