राज्यपालपदी मृदुला सिन्हा यांचा शपथविधी

0
104
मृदुला सिन्हा यांना राज्यपाल पदाची शपथ देताना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मोहीत शाह. बाजूस मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर.

ज्येष्ठ भाजप नेत्या व सुप्रसिध्द हिंदी साहित्यिक मृदुला सिन्हा (७१) यांचे काल गोव्याच्या राज्यपाल म्हणून शपथग्रहण झाले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहीत शाह यांनी राज्यभवनपर त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
गोव्याच्या पूर्णवेळ राज्यपाल म्हणून शपथ घेणार्‍या त्या पहिल्या महिला राज्यपाल ठरल्या आहेत. हिंदी साहित्यिक व निवृत्त अध्यापिका असलेल्या मृदुला सिन्हा या बिहार राज्यातील असून तेथील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील छात्रा या गावी २७ नोव्हेंबर १९४२ रोजी त्यांचा जन्म झाला होता. केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्षा म्हणूनही त्यानी काम पाहिलेले आहे. त्याशिवाय भाजप महिला मोर्चाच्याही त्या अध्यक्ष होत्या. साहित्यिक या नात्याने त्यानी कादंबरी व कथालेखन केलेले आहे.
काल राज्यभवनवर झालेल्या शपथग्रहण सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, अन्य मंत्री गण, आमदार व सरकारी अधिकारी उपस्थित होते. गोव्याचे राज्यपाल भारतवीर वांछू यांनी अतिमहनीय व्यक्तींसाठी खरेदी केलेल्या हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी राजीनामा दिल्यानंतर गोव्याचे राज्यपालपद रिक्त झाले होते.