राजेश पाटणेकर विधानसभेचे सभापती

0
121
????????????????????????????????????

>> प्रतापसिंह राणेंचा २२ वि. १६ मतांनी पराभव ः चर्चिल आलेमाव राहिले अनुपस्थित

गोवा विधानसभेचे नवे सभापती म्हणून काल भाजपचे राजेश पाटणेकर यांची निवड झाली. सभापतीपदासाठी काल झालेल्या निवडणुकीत भाजपचे राजेश पाटणेकर यांनी कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे यांचा २२ विरुद्ध १६ मतांनी पराभव केला. पाटणेकर यांना भाजपचा १६ आमदारांसह गोवा फॉरवर्डच्या ३ व ३ अपक्षांची मिळून २२ मते मिळाली, तर कॉंग्रेसचे प्रतापसिंह राणे यांना कॉंग्रेस आमदारांची १५ व मगो पक्षाचे आमदार सुदिन ढवळीकर यांचे मिळून १६ मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चर्चिल आलेमाव निवडणुकीवेळी विधानसभेत गैरहजर राहिले.

निष्पक्षपणे काम
करणार ः पाटणेकर
निवडणुकीनंतर सभापतींच्या आसनावर बसल्यानंतर राजेश पाटणेकर म्हणाले की, सभापती पद हे विधानसभेतील सर्वांत मोठे पद आहे. त्या पदाची आपण शान राखणार असून निष्पक्षपणे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानसभेतील सत्ताधारी तसेच विरोधी सदस्यांकडून आपण सहकार्याची अपेक्षा करीत आहे.

मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
राजेश पाटणेकर यांची सभापतीपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. सभापतीपदी निवड झालेले राजेश पाटणेकर हे डिचोली तालुक्यातील तिसरे सभापती आहेत. प्रथम मये मतदारसंघातले अनंत शेट नंतर साखळी मतदारसंघातील आपण व आता डिचोली मतदारसंघातील राजेश पाटणेकर हे सभापती बनल्याचे सावंत म्हणाले.

प्रतापसिंह राणेंकडूनही अभिनंदन
प्रतापसिंह राणे यांनीही यावेळी राजेश पाटणेकर यांचे अभिनंदन केले. आपण या विजयाबद्दल व्यक्तिशः तसेच पक्षाच्यावतीने पाटणेकरांचे अभिनंदन करीत आहे. लोकशाहीत ज्या पक्षाकडे बहुमत असते त्या पक्षाचाच विजय होत असतो. सभापती हा निष्पक्ष असावा लागतो. पाटणेकर सभापती म्हणून चांगल्या प्रकारे न्यायदान करतील, अशी अपेक्षा असल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.

अपात्रता याचिकांवर योग्य
निवाड्याची अपेक्षा ः ढवळीकर
मगोचे आमदार सुदिन ढवळीकर हे यावेळी म्हणाले की, राजेश पाटणेकर हे एकेकाळी मगो पक्षाचे युवा नेते होते. पाटणेकर यांच्या विजयाने आपणाला आनंद झाल्याचे ते म्हणाले. आपण पाटणेकर यांना मत दिले नाही त्याला वेगळी कारणे असल्याचे सांगतानाच पाटणेकर हे या सभागृहाचे पावित्र्य जपतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. विश्‍वजित राणे, बाबू आजगावकर व दीपक पावस्कर या तीन आमदारांविरुद्ध ज्या अपात्रता याचिका आहेत त्यांचा योग्य निवाडा पाटणेकर हे देतील, अशी अपेक्षाही ढवळीकर यांनी यावेळी व्यक्त केली.

अपात्रता याचिकांवर पूर्ण
अभ्यासांतीच निवाडा ः पाटणेकर
विश्‍वजित राणे, मनोहर आजगावकर व दीपक पाऊस्कर या तीन आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिकांवर आपण पूर्ण अभ्यासांतीच निवाडा देणार असल्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. मला अपात्रता याचिकांचा पूर्ण अभ्यास करावा लागेल. नंतरच आपण त्याबाबत योग्य काय तो निर्णय देऊ, असे पाटणेकर म्हणाले.

क्षणचित्रे
म्हापश्यातून पोटनिवडणुकीत जिंकून आमदार बनलेले जोशुआ डिसोझा यांनी काल पहिल्यांदाच गोवा विधानसभेत पाऊल ठेवले. तर सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांनी पोटनिवडणुकीत जिंकून येऊन काल पुन्हा गोवा विधानसभेत पाऊल ठेवले. बाबुश मोन्सेर्रात यांनीही पणजी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत विजय मिळवित विधानसभेत पुनरागमन केले.

ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेर्रात यांनी जोशुआ डिसोझा व सुभाष शिरोडकर यांचे सभागृहात अलिंगन देऊन स्वागत केले. तसेच दयानंद सोपटे यांचेही बर्‍याच सदस्यांनी हस्तांदोलन करून स्वागत केले. बाबुश मोन्सेर्रात यांचेही बर्‍याच आमदारांनी अभिनंदन केले.

आजारपणामुळे नीट चालता येत नसलेले कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांना विधानसभेत येण्यासाठी वॉकिंग स्टिकबरोबरच इतरांचा आधार घ्यावा लागला.
सभापतीपदाच्या निवडणुकीत मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी प्रथमच कॉंग्रेसच्या उमेदवाराला मत दिले.

निवडणुकीवेळी भाजप उमेदवाराच्या ठरावाच्या बाजूने असलेल्या आमदारांनी उभे राहून पाठिंबा द्यावा. मात्र आजारी पांडुरंग मडकईकर यांनी बसून हात वर करावा अशी सूचना सभापती मायकल लोबो यांनी केली.
सभापतीपदी पाटणेकर यांची निवड जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री सावंत व विरोधी पक्षनेते कवळेकर आदींनी त्यांना सभापतींच्या आसनाकडे नेले.