चर्चा ‘फेसबुक’च्या चलनाची

0
143
  • ऍड. प्रदीप उमप

फेसबुकने ‘ग्लोबलकॉईन’ हे स्वतःचे आभासी चलन म्हणजे क्रिप्टोकरन्सी बाजारात आणण्याची घोषणा केली आहे. अमेरिकेसह अनेक देशांमधील नियामक यंत्रणांकडून त्याविषयी विविध शंका आणि हरकती उपस्थित केल्या गेल्या असून, अनेक अडथळ्यांची शर्यत फेसबुकला अद्याप पार करायची आहे. येत्या तीन ते पाच वर्षांत ङ्गेसबुकचे चलन दैनंदिन जीवनाचा भाग बनेल, असे छातीठोकपणे सांगणारे आहेतच!..

फेसबुकने क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. ही क्रिप्टोकरन्सी (आभासी चलन) फेसबुकच्या माध्यमातून व्यवसायवृद्धीस चालना देईल; कारण हे खुले आभासी चलन असेल. इतर बंदिस्त आभासी चलनापेक्षा त्याची तरलता (लिक्विडिटी) अधिक असेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. म्हणजेच, विविध प्रचलित चलनांबरोबर त्याचे हस्तांतरण अधिक सोपे असेल. त्यामुळे ग्राहकांना या चलनाचा वापर करण्याची इच्छा अधिक असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फेसबुकने व्हॉट्‌स ऍप आणि इन्स्टाग्रामवरही कब्जा केला आहे. त्यानंतर आता ‘पेमेन्ट प्लॅटङ्गॉर्म’ निर्माण करून व्यवसायाची व्याप्ती अनेक पटींनी वाढविण्याचा फेसबुकचा विचार आहे, असे या निर्णयातून दिसून येते. २०२० च्या पहिल्या तीन महिन्यांत किमान १२ देश फेसबुकशी या विनिमय मंचाच्या साह्याने जोडले जातील, अशी शक्यता आहे. फेसबुकच्या या संभाव्य चलनाला इच्छुकांकडून ‘ग्लोबल कॉइन’ असे नाव मिळाले असून, या चलनाची चाचणी या वर्षात होईल, असा अंदाज ‘बीबीसी’ने वर्तविला आहे. अमेरिकेची यू. एस. ट्रेझरी आणि बँक ऑङ्ग इंग्लंडसह अनेक देशांच्या चलन नियमन यंत्रणांशी फेसबुकने याविषयी बोलणी केली आहेत, असेही या वृत्तांतात म्हटले आहे. फेसबुकच्या या आभासी चलनाचा वापर अनेक मार्गांनी करता येऊ शकेल. उदाहरणार्थ, सोशल मीडियावर जाहिराती पाहणार्‍यांना ‘रिवार्ड’ म्हणून फेसबुककडून काही चलन दिले जाऊ शकते, असे वॉल स्ट्रीट जर्नलने म्हटले आहे.

‘प्रोजेक्ट लिब्रा’ या मोहिमेअंतर्गत पैशांची देवाणघेवाण गतिमान आणि सुटसुटीत करण्याचा फेसबुकचा विचार आहे. बँक खाते नसलेले लोक हा फेसबुकने या चलनाच्या बाबतीत आपला प्रमुख ग्राहक मानला आहे. ज्या डिजिटल करन्सीचा वापर व्यवहारांसाठी करण्यात येणार आहे, ती आता ‘ग्लोबल कॉइन’ नावाने ओळखली जाऊ लागली आहे. आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षितरीत्या करता यावेत, असा यामागील हेतू आहे. डॉलर किंवा अन्य चलन देऊन ग्लोबल कॉइन हे आभासी चलन फेसबुककडून मिळविता येणार आहे. ऑनलाइन व्यापार करणार्‍यांनी ग्लोबल कॉइन हे चलन स्वीकारावे, यासाठी ङ्गेसबुकचे प्रयत्न सुरू आहेत आणि २०२० पर्यंत प्रत्यक्ष व्यवहार सुरू होतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ग्लोबल कॉइनचा विनिमय अमेरिकी डॉलर, ब्रिटिश पौंड, युरो, येन आदी विविध देशांच्या पारंपरिक चलनांबरोबर सुरू होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील आर्थिक संघटनेसोबत तसेच काही बँका आणि ब्रोकर्ससोबत फेसबुक काम करीत आहे, असे सांगितले जाते. परंतु ग्लोबल कॉइन हे केवळ व्यवहारांचे माध्यम राहावे आणि आभासी संपत्ती संकलित करण्याचे माध्यम बनू नये, यासाठी फेसबुकने दोन गोष्टी करण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करतात. एक म्हणजे, व्यापार्‍यांची सर्वव्यापी स्वीकारार्हता प्राप्त करणे आणि दुसरे म्हणजे, ग्लोबल कॉइनचा विनिमय दर स्थिर राखण्याचा प्रयत्न करणे.

अनेक ऑनलाइन व्यापार्‍यांशी ङ्गेसबुक चर्चा करीत असल्याचे बीबीसीने आपल्या पहिल्या वृत्तांतात म्हटले असून, व्यवहाराचे अत्यल्प शुल्क आकारले जाईल, असे व्यापार्‍यांना सांगितले आहे. दुसर्‍या वृत्तांतात बीबीसीने म्हटले आहे की, सातत्याने ज्या चलनाच्या विनिमय दरात चढउतार होत असतात, अशा चलनात व्यवहार करणे सामान्य लोक फरकाळ पसंत करत नाहीत. या अडथळ्यातून मार्ग काढण्यासाठी फेसबुकने ग्लोबल कॉइन ही विविध देशांच्या सरकारकडून वितरित करण्यात येणार्‍या पारंपरिक चलनांच्या तुलनेत ‘स्टेबल कॉइन’ ठरावी, असा प्रयत्न सर्वप्रथम करायला हवा. फेसबुकच्या नियोजित आभासी चलनाचे मूल्य डॉलरच्या मूल्यानुसार ठरेल, असे ‘फयनान्शियल टाइम्स’ने म्हटले आहे. फेसबुककडून किती चलन वितरित केले जाईल, किती चलन साठवून ठेवण्यास परवानगी दिली जाईल आणि किती चलनाच्या विनिमयास परवानगी दिली जाईल, हे अद्याप अस्पष्ट असल्याचे या वृत्तांतात नमूद करण्यात आले आहे. बिटकॉइनसारख्या सध्या प्रचलित असणार्‍या आभासी चलनांना मोठ्या प्रमाणावर स्वीकारार्हता मिळविण्यात यश आलेले नाही. ग्लोबल कॉइन हे नाव मात्र बदलण्याची शक्यता असून, याच नावाचे आभासी चलन २०१२ मध्ये अस्तित्वात आल्यामुळे हा बदल संभवतो.

येत्या तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत फेसबुकची क्रिप्टोकरन्सी दैनंदिन जीवनाचा भाग बनेल, असे काहींना वाटते. मात्र, या बाबतीत काही अडथळे आणि धोके आहेत, त्याकडेही काही तज्ज्ञ लक्ष वेधतात. क्रिप्टोकरन्सीची निर्मिती आणि प्रसार करताना अनेक देशांच्या नियामक यंत्रणांना सामोरे जावे लागणार आहे. त्याचप्रमाणे गोपनीयता हा सर्वांत मोठा धोका या प्रक्रियेत काहींना जाणवतो. गोपनीयतेच्या बाबतीत फेसबुक सध्याच अनेक खटल्यांना सामोरे जात आहे. गोपनीयता नसल्यामुळे फेसबुकवरील डेटा अनेक कंपन्यांकडे गेल्याचे निदर्शनाला आल्यानंतर फेसबुकवर चौङ्गेर टीकाही झाली. अशा वेळी लोक आपले आर्थिक व्यवहार फेसबुकच्या आभासी चलनाद्वारे करतील का, असाही प्रश्‍न विचारला जात आहे.

दुसरी महत्त्वाची भीती अशी व्यक्त केली जात आहे की, स्वतःची देवाणघेवाण प्रणाली स्वतःच्याच चलनाच्या माध्यमातून पुरविल्यानंतर फेसबुकला लोकांच्या खर्च करण्याच्या सवयींबाबतही माहिती होणार आहे. अशा स्थितीत मुळातच असुरक्षित असलेला फेसबुकवरचा डेटा पुढील काळात अधिक असुरक्षित होईल, अशी चिंता काहीजण व्यक्त करीत आहेत.

अमेरिकेच्या यूएस ट्रेझरीनेही अशी शंका व्यक्त केली आहे की, ग्लोबल कॉइनचा वापर पैशांची अफरातफर करण्यासाठी किंवा काळा पैसा पांढरा करण्यासाठी केला जाऊ शकतो. दरम्यान, अमेरिकेतील सिनेट कमिटी ऑन बँकिंग, हाउसिंग अँड अर्बन अफेअर्सने फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांना पत्र लिहिले असून, अनेक प्रकारच्या चिंता फेसबुकच्या नवीन आभासी चलनाविषयी व्यक्त केल्या आहेत. वापरकर्त्यांना गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची हमी कशी देणार? वापरकर्त्यांच्या आर्थिक घडामोडींसंदर्भात कोणती माहिती फेसबुकला मिळणार? वापरकर्त्याची कोणतीही माहिती इतरांना देणे किंवा विकणे फेसबुकला शक्य होणार का? व्यक्तिगत वित्तीय बाबींसंदर्भात कोणती माहिती फेसबुक गोळा करू पाहत आहे? फेअर क्रेडिट रिपोर्टिंग ऍक्टचे पालन फेसबुक करणार का? असे अनेक प्रश्‍न या कमिटीने विचारले असून, त्यामुळे ङ्गेसबुकचे आभासी चलन बाजारात येण्याची वाट खडतर ठरू शकते. आभासी चलन ही संकल्पना प्रत्यक्षात उतरून दहा वर्षे होऊन गेली आहेत. विविध देशांच्या नियामक यंत्रणांनी या चलनाला परवानगी मागितली, याचे मुख्य कारण म्हणजे अशा प्रकारच्या आभासी चलनातील व्यवहारांवर कोणत्याही देशाच्या नियामक यंत्रणेचे अजिबात नियंत्रण नसते. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहारांची संख्या वाढण्याचा धोका असतो. सर्वसामान्यांचाही आभासी चलनावर ङ्गारसा विश्‍वास नाही. या पार्श्‍वभूमीवर फेसबुकच्या आभासी चलनाचा पुढचा प्रवास कसा राहतो, हे पाहावे लागेल.