निवडणुकीत नातेवाईकांना उमेदवारी देऊ नये असे नाही. एखाद्या राजकारण्याचा मुलगा खरोखर समाजसेवा, कष्ट करून कर्तृत्व सिद्ध करून पुढे आल्यास त्याचा उमेदवारीसाठी विचार झालाच पाहिजे, परंतु कॉंग्रेसने ज्या राजकारण्यांच्या मुलामुलींना उमेदवारी दिली आहे, त्यांचे समाजातील योगदान काय आहे, हा प्रश्न आहे, असे गडकरी पुढे म्हणाले.
निष्ठावंत व कार्यक्षम कार्यकर्त्यांना डावलून पात्रता नसलेल्या आपल्याच मुलांना राजकारणात आणून त्यांना आमदार, मंत्री बनविण्यासाठी धडपडणे हे वाईट आहे. त्याचा भारतीय लाोकशाहीवर, समाजावर विपरीत परिणाम होणार आहे. कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी देण्याच्या बाबतीत कॉंग्रेसने गोव्यात विक्रम केल्याचे गडकरी यांनी सांगितले.
बेकायदेशीर खाण प्रकरणी एम. बी. शहा यांनी तयार केलेल्या अहवालात मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनाही जबाबदार धरले आहे. निवडणुकीच्या वेळी अडचणीचे होईल या भीतीपोटी केंद्रातील यूपीए सरकारने हा अहवाल दाबून ठेवल्याचा आरोप गडकरी यांनी केला. हा अहवाल उघड करण्याची गरज होती, असे ते म्हणाले. चुकीच्या आर्थिक धोरणामुळे महागाई वाढल्याचे गडकरी यांनी सांगितले. दि. ३ रोजीची विधानसभा निवडणूक भाजप परिवारवाद, भ्रष्टाचार व महागाई विरोधात लढत आहे व गोमंतकीय जनतेचा त्याला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री कोण असेल, असा प्रश्न विचारला असता, सध्या विरोधी नेते मनोहर पर्रीकर, प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर व खा. श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जात आहे. निकालानंतर आमदार बैठक घेऊन नेता निवडतील, असे गडकरी यांनी सांगितले. पक्षाने श्रीपाद नाईक यांना पर्वरी मतदारसंघाची उमेदवारी देण्याचे ठरविले होते. परंतु त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला, असे ते म्हणाले.
कॉंग्रेसच्या धोरणाला जनता कंटाळली आहे. जनता परिवर्तनाच्या प्रतीक्षेत आहे. भाजप हा खरा सर्व धर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. त्यामुळेच अल्पसंख्यांकांचा चांगला पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा हे सुशिक्षतांचे राज्य आहे. त्यामुळे येथील लोकांना आवश्यक असलेले स्वच्छ प्रकाशन भाजपकडूनच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेस खा. श्रीपाद नाईक व प्रदेश अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर उपस्थित होते.