रशियाच्या बश्कोर्तोस्तान रिपब्लिकमधील उफा शहरातील स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृहात शनिवारी अनेक विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला झाला. या हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थ्यांसह किमान सहाजण जखमी झाले. प्राथमिक माहितीनुसार, एक 15 वर्षांचा मुलगा हातात चाकू घेऊन परदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील प्ले हॉलमध्ये घुसला आणि तेथे अनेक विद्यार्थ्यांवर हल्ला केला. अटकेदरम्यान आरोपीने पोलिसांवरही हल्ला केला, ज्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले.भारतीय दूतावासाने सांगितले की ते स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात आहेत. कझान येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकारी जखमी विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी उफा येथे रवाना झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे, तर तिघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.