केंद्र सरकारकडून अधिकृतपणे प्रक्रिया सुरू
भारत सरकारने चिनाब नदीवरील सावलकोट जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसाठी मान्यता दिली असून आता त्यासाठी सरकारने अधिकृतपणे टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारी क्षेत्रातील कंपनी एनएचपीसीने चिनाब नदीवरील सावलकोट जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीसाठी अधिकृतपणे टेंडर प्रक्रिया सुरू केली. रामबन जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे 5,129 कोटींचा खर्च अपेक्षित असून नऊ वर्षांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण कामकाज एका पॅकेजमध्ये राबवले जाणार आहे.
भारत सरकारने आता जम्मू-कश्मीरमध्ये पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. सदर कंपनीच्या माहितीनुसार बोली प्रक्रिया 12 मार्चपासून 20 मार्चपर्यंत चालेल.
जम्मू-कश्मीरच्या वाढत्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी या सावलकोट जलविद्युत प्रकल्पातून 1,856 मेगावॅट वीज निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जम्मू काश्मीरची वीजेची गरज भागणार आहे. राष्ट्रीय वीज ग्रीडही अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
पाकिस्तानला दणका
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे. पाकिस्तानातील शेतीचा मोठा भाग हा सिंधू नदीच्या पाण्यावर चालतो. अशा परिस्थितीत, आता भारताने सिंधूचे पाणी अडवल्यामुळे पाकिस्तानला मोठा दणका बसणार आहे. चिनाब नदीवरील हा उपक्रम देशातील जलसंपत्तीचा अधिक परिणामकारक वापर करण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरेल.