रजनीकांत – कमल हसन भेटीमुळे तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ

0
116

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दोन दिग्गज सुपरस्टार रजनीकांत आणि कमल हसन हे दोघेही राजकारणात येणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले असून त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात खळबळ माजली आहे. काल रविवारी या दोन्ही सुपरस्टार्सची भेट झाली. दुपारी रजनीकांत यांच्या घरी कमल हसन जेवण घेतले. त्यांच्या या भेटीमुळे तामिळनाडूच्या राजकारणाला नवे वळण मिळणार आहे.
आपली ही भेट राजकीय चर्चेसाठी झाली नसल्याचे कमल हसन यांनी म्हटले आहे. ही भेट केवळ एक सदिच्छा भेट असल्याचे त्यांनी सांगितले. तर, रजनीकांत म्हणाले, कमल हसन यांची तामिळनाडूतील लोकांची सेवा करण्याची इच्छा आहे. ते राजकारणात केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना यश मिळो अशी ईश्वराजवळ प्रार्थना करतो असे त्यांनी सांगितले.

कमल हसन २१ फेब्रुवारी रोजी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. तर, रजनीकांत यांनी यापूर्वीच आगामी तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सर्वच्या सर्व २३४ जागा लढवेल असे जाहीर करून टाकले आहे. या पार्श्‍वभूमीवर हे दोघेही ही भेट केवळ औपचारिक भेट असल्याचे सांगत असले तरी त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून त्याचे परिणाम येत्या काळात पहायला मिळतील. रजनीकांत यांनी यापूर्वी कमल हसन यांच्यासोबत राजकीय युती करणार असल्याचे संकेतही दिले होते.तामिळनाडूच्या राजकारणात कायमच सिनेकलाकारांचा दबदबा राहिला आहे. सुरुवातीला एमजीआर आणि त्यानंतर जयललिता याची उदाहरणे आहेत.