– डॉ. रामकृष्ण जनार्दन हळर्णकर
मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाजात तो जन्मतो, वाढतो अन् मृत्यू पावतो. जन्म आणि मृत्यू या दोन अवस्थांच्या मध्ये त्याचा अनेक गोष्टींशी संबंध येतो. त्यात सगळ्यात निकटचा संबंध असतो तो सणांशी… गोवा हे लोककला व लोकसाहित्याचे माहेरघर आहे. वर्षाचे बाराही महिने येथे सण साजरे होतात. गोव्यात सध्या शिमगोत्सवाचे वारे वाहू लागले आहे.
निसर्गरम्य गोव्याला देवादिकांचेही वरदान लाभलेले आहे. येथील छोटी-छोटी गावे एकाच माळेत गुंफलेली. अनादिकालापासून येथे सण-उत्सव साजरे होत आले आहेत. बारा गावच्या बारा जत्रा, पंचमी, दसरा, शिमगा अशा सणा-परबांनी येथील गावे लोककलायम झालेली आहेत.
शिमग्याच्या दिवसांत अनेक ठिकाणी ‘गडे पडणे’ हा प्रकार होतो. ‘गडे’ उत्सवाने शिमग्याचे वातावरण तयार होते. ‘शिमगो’ हा बहुरंगी उत्सव. तो इंद्रधनुष्यी गुलालाने गावाचे सौंदर्य नटवतो. अनेक रंगांत रंगून माणसाचे मन एका रंगात एकजीव करून टाकतो. अनेक रंगांचा हा सुंदर संगम होळीच्या निमित्ताने आपल्या तनामनावर प्रेमवर्षाव करीत आला आहे.
शिशिर ऋतूतील गुलाबी थंडीची संध्याकाळ व वसंत ऋतूची उषःकालची उबदार मिठी घेऊन हा उत्सव येतो. गोव्यात होळी सण शिमगोत्सव म्हणून साजरा केला जातो. हा कष्टकरी लोकांचा उत्सव आहे. गोव्यात धाकला शिमगा व थोरला शिमगा अशा दोन प्रकारांत तो साजरा होतो. मांडवी नदीच्या दक्षिणेकडे धाकला शिमगा होतो. तो फाल्गुन शु. नवमीला सुरू होऊन पुनवेला संपतो, तर थोरला शिमगा पुनवेला सुरू होतो. सत्तरीत रंगपंचमीने शिमग्याला सुरुवात होते. काही भागांत तो गुढीपाडव्यापर्यंत चालतो.
होळी हा सण गोव्यात शिमगोत्सव म्हणून ओळखला जातो. तो फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत मर्यादित न राहता त्रयोदशी, चतुर्दशीपासून अमावास्येपर्यंत वेगवेगळ्या गावांत विविध प्रकारे साधारणतः चार-पाच दिवसांच्या कालावधीपासून पंधरा दिवसांपर्यंत साजरा केला जातो. तसाच तो अन्य नावांनी भारताच्या सर्व भागांत साजरा केला जातो.
उत्तर आणि मध्य भारतात या सणाला ‘फागुन’ म्हणतात. स्त्री-पुरुष नाचत-गात, रंगाची उधळण करीत मदहोश होऊन गातात-
भीगी चुनरियॉं
भीगी चोली
संग संग खेले होली
फागुन आयो रेऽऽऽ
लोक क्षणभर आपली दुःखे विसरून या आनंदोत्सवात सामील होतात. नाचतात, गातात आणि रंगात मिसळून एकजीव होऊन जातात. शिमग्याच्या दिवसांत संपूर्ण आनंदविलास त्यांच्या तनामनात व्यापून राहिलेला असतो.
शिमगोत्सव हा गोव्याचा पारंपरिक उत्सव. शहरी भागातही हा सण मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. होळी दहनाचा कार्यक्रम झाला की रंगांच्या उधळणीला सुरुवात होते. गोव्यात काही परप्रांतीय आपल्या रीतीरिवाजानुसार आपले उत्सव साजरे करतात. त्यानिमित्ताने त्यांच्या प्रथा-परंपरा इथे येतात आणि आपल्या ते घेऊन जातात. अशा प्रकारे लोककला, संस्कार आणि संस्कृतीची देवाण-घेवाण होत असते.
शिमगोत्सवातून अनेक लोककला सादर केल्या जातात. किंबहुना लोककलेचाच एक भाग म्हणून शिमगोत्सव साजरा केला जातो. या दिवसांत गावगावांत ऐतिहासिक आणि सामाजिक नाट्यप्रयोगही होतात. ही नाटके ‘शिमग्याची नाटिका’ म्हणून ओळखले जातात. आजकाल शहरांतून चित्ररथांची मिरवणूकही काढली जाते. त्यानिमित्ताने लोकांना आपल्यातील कलाकौशल्य दाखवण्याची संधी मिळते. ही लोककला परंपरेतून चालत आलेली आहे. त्यांतील गाणी मौखिक परंपरेने आजही गायली जातात.
गावागावांत बर्याच दिवसांपासून शिमग्याच्या तयारीची सुरुवात होते. शिमग्याचा दिवस उजाडला की पहिल्या दिवशी मांड ठेवला जातो. प्रमुख मांडकरी, मांडाचे वांगडी व अन्य समुदाय मांडावर एकत्र जमतात. तिथे समई पेटवतात. नारळ ठेवतात. ढोल-तासे वाजवले जातात. प्रत्येक गावच्या रीती, पद्धती वेगवेगळ्या असतात. काही ठिकाणी वाजवत जाऊन विशिष्ट तळीचे व विहिरीचे पाणी आणून ते मांडावर व अन्य वस्तूंवर शिंपडले जाते. देवतांना बोलावून मांडावर त्यांची प्रतिष्ठापना केली जाते आणि शिमगा संपेपर्यंत त्या मांडाचे पावित्र्य राखले जाते. शिरगावात लईराईच्या जात्रेला ‘होमखण’ घालतात. असेच होमखण होळीलाही काही गावांत घातले जातात. रखरखत्या निखार्यांवरून भाविक चालून जातात. त्यांच्या पायांना इजा होत नाही. एकोशी गावातील हळर्णकर वाड्यावरही असे होमखण घातले जाते.
शिमग्याच्या दिवसांत ग्रामदेवतांला जागृत केले जाते. त्यांच्या कृपेसाठी त्यांना खिचडीचा नैवेद्य दाखवला जातो. मांडवावर लोक गोळा होतात त्यांना मेळ म्हणतात. यात गावचे पुरुष व मुले भाग घेतात. स्त्रियांचा मात्र यात सहभाग नसतो. वळवई गावच्या शिमगोत्सवात लोक घरोघरी जाऊन ‘गुरूशीत- गुरूकडी’ मागतात आणि असे अन्न गोळा करून एकत्र बसून चवीनं जेवतात.
शिमगा म्हणजे कलाकौशल्यांचा आविष्कार. मेळ म्हणजे नाचणारे पुरुष वाद्ये वाजवीत घरोघरी जातात. आपली कला सादर करतात. रंगरंगोटी करून सोंगे आणतात. ‘हो स्सै, होस्सैऽऽ’ असे शब्द काढत, हातांतील ‘तरंगा’ खाली-वर करत, नाचत-बागडत मेळ घरोघरी जातो. प्रत्येकाच्या अंगणात नाचतो. यावेळी ‘जोत’ नावाचे गाणेही म्हटले जाते. हे गाणे त्या गावचा एखादा जाणकार म्हणतो. पण आज अशी गाणी म्हणणारे सापडत नाहीत. आजचे तरुण सिनेमाची गाणी गातात. साखळी, डिचोली व काणकोणसारख्या ठिकाणी गोफ, मोरुले, चौरंग आदी नृत्याचे प्रकार होतात. यातील तालगडी हा प्रकार सर्वत्र आहे.
मेळ दारात येताच घरातील सवाष्ण स्त्री मेळाचे स्वागत करते. पेटती समयी एका पाटावर ठेवली जाते. ताटात पाच नारळ ठेवल्यावर देवाला गार्हाणे घातले जाते. अन्य देवांनाही नारळ-विडी ठेवून त्यांचा मान राखला जातो. देवांचा मान-सन्मान झाल्यानंतर ढोल, ताशा, कासाळे ही वाद्ये मांडावर आणली जातात. त्यांची फुलांनी पूजा केली जाते. मग होळी देवासमोर उभी करून तिचे दहन केले जाते.
गावचे प्रमुख मांडकरी ढोलावर पहिली काठी मारून शिमग्याला प्रारंभ करतात. मग सर्व रांगेत उभे राहतात व नमन करतात. कांसाळे, ढोल-ताशे विशिष्ट पद्धतीने ताल व लयीत वाजू लागतात. नमन झाल्यावर परंपरेची गुढी आणली जाते. ही गुढी म्हणजे गावाचे प्रतीक असते. गावकरी गळ्यांत फुलांच्या माळा घालून मांडावर गोळा होतात. त्यांना ‘गोंसाय’ म्हणतात. काही गावांत तर ढोल-ताशे वाजवण्याचा मान ‘गावकरांना’ दिला जातो.
शिमग्याची सुरुवात ही श्रीगणेशाच्या नमनाने होते. मांडा गुरूला व नंतर गावची सर्व दैवते तसेच वेताळ, बेताळ, ग्रामपुरुष, कुलदैवत, सांतेर, जाग्यावयलो देवचार या सर्वांची नावे घेऊन गार्हाणे घातले जाते. हे गार्हाणे गाण्यात गुंफून गायले जाते-
देवा समर्था…
अडी अडचणीक पाव
खोटे-नखटे पायाखाली ठेव
समर्थाऽऽ
असे मांडागुरू गावदेवा नमन बा
मांडा देवा देवचारा नमन माझे
असे गावपुरसा, सातेरी, वेताळा, बेताळा नमन बा
देवांचे देवणपण भुवनी गाजे…
त्यांच्या या गार्हाण्यात गेयता असते. हे गार्हाणे गावचा जाणकार किंवा घाडी आपला स्वर आवळून घालतो. पार्श्वसंगीताची साथ नसूनही गार्हाण्यात गोडवा असतो. लोकही ‘हर हर महादेव’ म्हणत प्रतिसाद देतात.
देवादिकांचा राग-रोस कोणालाही परवडणारा नसतो. दैवतांचे नमन बराच वेळ चालते. नंतर तांदूळ व नाणे ठेवले जाते. याला तळी म्हणतात. खेळ संपताच गावचा प्रमुख प्रार्थनावजा गाणे म्हणतो. यातून ‘घरमालकाचे, मुलाबाळांचे कल्याण होऊ दे’ अशी प्रार्थना केली जाते. या तळीचे गीत असे-
तळी रे तळी सासणाची तळी
आरती आयली उतरली खेळयानी
घरदार भरूं तुजें तिळ तांदळांनी
आरती आली रे हासवंत
घरदार नांदू तुजे सासवंत
असा आशीर्वाद देऊन ताटातील तांदूळ तीनवेळा घरावर टाकले जातात. हे मेळ घरोघरी जाऊन आशीर्वाद देतात. यावेळी गावातील वातावरण मंगलमय झालेले असते. काही मेळ खेळायला एका गावाहून दुसर्या गावाला जातात, तर काही गावचे मेळ एकाच ठराविक दिवशी एखाद्या मंदिरात नाचत येतात व नाचत जातात.
फाल्गुन शु. चतुर्दशीला म्हार्दोळ येथे पंचक्रोशीतले अनेक मेळ येतात. शिमग्याच्या दिवसांत काही गावांत ‘सुवार्या’ येतात. प्रत्येक सुवारीत वीस-पंचवीस ताशे, चार ढोल व इतर तर्हेची वाद्ये असतात. या सुवारीवादनाच्या तालावर धुलीवंदनाला सुरुवात होते. अशा ‘सुवार्या’ डिचोली, आमोणा गावात येतात. म्हणूनच तर ‘वाद्याने आमोण्याचा शिमगा, तर गुलालाने जांबावलीचा शिमगा’ अशी एक म्हण प्रचलित झाली आहे.
दरम्यान, काही कलाकार आपली कला सादर करतात. यात राम, कृष्ण, हनुमान यांसारखी पौराणिक, शिवाजी, मावळे अशी ऐतिहासिक व राक्षस, म्हातारा, दारुड्या, माकड, अस्वल अशी विविध सोंगे आणली जातात. पुरुष स्त्रियांची सोंगे आणतात. आपल्या विविध कला ते पेश करतात. एकूण या नाट्यविष्काराने येथील वातावरण भारून जाते.
शिमगोत्सवात काही मुले घरोघरी जाऊन ‘शबय’ मागतात. त्यावेळी ती आपल्या चेहर्यावर रूपणं घालतात. त्यांची ओळख कुणालाही पटत नाही. ती ‘शबय’ मागतात अशी-
शबयचे बावले
तारीकडे पावले
शबयऽऽ
आयनाचे बायना
घातल्याशिवाय जायना
शबयऽऽऽ
त्यांच्या हातात एक डबा असतो. त्यात गोळा झालेला पैसा मग ती आपसात वाटून घेतात.
शिमगोउत्सवाचा काही दैवतांशी संबंध आहे. अशा देवादिकांची पूजा केली जाते. सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. देव-देवचाराला सोरोरोंट दिला जातो. गावच्या सीमेबाहेरून रोगराई किंवा वाईट गोष्टी येऊ नयेत अशी विनवणी केली जाते.
आज झपाट्याने बदलत चाललेल्या जीवनात शिमग्याचे स्वरूपही बदलत चालले आहे. यातून जुन्या विधी व संकेत विसरले जात आहेत. तरीही शिमगोत्सवात आपल्याला ‘विविधतेत एकता’ दिसून येते. गोव्यात सर्वत्र शिमगोत्सव साजरा केला जातो. पेडण्याच्या शिमग्यातील मेळाला ‘रोंबट’ म्हणतात, जाबावलीचा ‘गुलाल’, वळवईचा ‘गोंधळ’ तर कुंकळ्ळीचा ‘सत्र्यो’ अशी नावे या मेळांना आहेत. या शिमगोत्सवात सर्व जातीधर्माचे लोक रंग उधळतात. या इंद्रधनुष्यी रंग उधळणीत आपण सर्व एकजीव होऊन जातो. असा हा शिमगोत्सव अनेक रंगांत रंगून नवचैतन्याने न्हाऊन जातो. माणसामाणसांतील नाते वृद्धिंगत करतो. एकतेचे दर्शन घडवतो… गोव्याचा शिमगोत्सव म्हणूनच तर आनंदाची पर्वणी घेऊन येतो.