Home बातम्या मराठी रंगभूमीवरील विविध प्रवाह

मराठी रंगभूमीवरील विविध प्रवाह

0

– विष्णू सूर्या वाघ

मराठी नाटकाच्या इतिहासासंबंधी आजवर खूप काही लिहून झालंय. मराठी रंगभूमी कशी निर्माण झाली येथपासून आज ती कुठं आहे यापर्यंत विविध विषयांवर अनेक लोक हिरिरीने लिहितात, चर्चा करतात. त्यामुळे हा इतिहास उगाळीत बसण्यात अर्थ नाही. मात्र एकूणच मराठी रंगभूमीचे विहंगमावलोकन करीत असताना या रंगभूमीच्या उदयकालातील मूळ प्रवृत्ती कोणत्या होत्या व त्यांचा विकास क्रमाक्रमानं कसा होत गेला हे पाहणं योग्य ठरेल असं वाटतं. त्याचप्रमाणं रंगभूमीच्या उत्क्रांतीकाळात अभिरूचीच्या संकल्पना कशा बदलत गेल्या व आजच्या संदर्भात अभिरूचीविषयक भूमिका कुठल्या पातळीपर्यंत खाली घसरली आहे त्याचाही एक धावता आढावा घेता येईल.
सर्वप्रथम ‘मराठी नाटक’ म्हणजे काय याची संकल्पना आपण स्पष्ट करून घ्यायला हवी. किमान याविषयी आपल्या मनात असलेला भ्रम तरी काढून टाकला पाहिजे. ‘मराठी नाटक’ म्हणजे केवळ ‘मराठी भाषेमधलं नाटक’ नव्हे, तर मराठी मातीच्या प्रेरणा व मराठी संस्कृतीच्या संवेदना घेऊन उभं राहिलेलं नाटक. या अर्थानं आपला दशावतार किंवा वगनाट्य ही शंभर टक्के मराठी आहेत. किर्लोस्करांचं ‘सौभद्र’ हे मराठी नाटक आहे. शिरवाडकरांचं ‘नटसम्राट’ शेक्सपियरच्या किंग लीयरपासून प्रेरित झालं असलं तरी त्याची एकंदर ट्रीटमेंट पाहता तेही पूर्णपणे मराठी नाटक आहे. मात्र कानेटकरांचं ‘गगनभेदी’, ‘गोष्ट जन्मांतरीची’ या नाटकांना ‘मराठी’ म्हणता येणार नाही. मोहन वाघांचं ‘रात्र उद्याची’ हे नाटक अजिबात मराठी म्हणता येणार नाही.

महात्मा फुल्यांचं नाटक

विष्णुदास भाव्यांच्या ‘सीतास्वयंवर’पासून मराठी रंगभूमी उदयाला आली असं मानलं तर आज मराठी रंगभूमीचं वय १७१ वर्षं आहे. पण मराठी रंगभूमीचा उदय कधी झाला यापेक्षा मराठी रंगभूमीवर नाट्याचा उदय कधी झाला हा प्रश्‍न माझ्या दृष्टीनं अधिक महत्त्वाचा आहे. आज जे नाटक आपण करतो आहोत त्या आधुनिक नाटकाचा प्रारंभ १८५५ साली महात्मा ज्योेतिबा फुले यांनी लिहिलेल्या ‘तृतीय रत्न’ या नाटकाने झाला ही वस्तुस्थिती सोयिस्करपणे विसरली गेली आहे. भाव्यांच्या कर्नाटकी यक्षगानाने प्रभावित झालेल्या भागवती नाटकाहून वेगळं आणि पुढे ४२ वर्षांनी मराठी नाटकाची नव्याने रुजवात करणार्‍या अण्णासाहेब किर्लोस्करांच्या संगीत नाटकाच्या बाजाहून पूर्णतया भिन्न, गद्य आणि प्रागतिक विचारांचं नाटक महात्मा फुले यांनी लिहिलं. अण्णासाहेब किर्लोस्करांना आज आपण ओळखतो ते प्रामुख्याने ‘सौभद्र’चे नाटककार म्हणून. पण १८८२ साली ‘सौभद्र’नंतर लिहिलेल्या ‘रामराज्य वियोग’ या नाटकात इतिहासक्रमाला मागं खेचून किर्लोस्करांनी शंबुकाची व्यक्तिरेखा उभी केली व त्याच्या माध्यमातून ब्राह्मणी वृत्तीवर कडाडून हल्ला चढवला ही वस्तुस्थितीही सोयिस्करपणे लपवली जाते.
मराठी रंगभूमीवर सुरुवातीपासून आतापर्यंत काय काय घडत गेलं, कोणते प्रयोग झाले याची जंत्री देऊन काही उपयोग नाही. तो प्रकारच प्रचंड वेळखाऊ ठरेल. त्याऐवजी साहित्यिक परिप्रेक्ष्यातून मराठी रंगभूमीचं निरीक्षण करीत असताना तिचं मूळ स्वरूप, त्या स्वरूपातील काही प्रवाह आणि भोवतालच्या सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचा त्यांच्यावर झालेला परिणाम याचा आढावा घेणं अधिक सयुक्तिक ठरेल.
कोल्हटकरी प्रवाह
त्यासाठी फार मागं न जाता साधारण सुमारे शंभर वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहू. साधारण १९०४ पासूनचा नंतरचा दहा-पंधरा वर्षांचा काळ हा संगीत नाटकांच्या चलतीचा काळ होता. या काळात तीन नाटककार प्रामुख्याने पुढे आले. ते म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आणि नंतर राम गणेश गडकरी.
किर्लोस्कर आणि देवल यांचा काळ आधीचा. देवलांची ‘शारदा’ व ‘संशयकल्लोळ’ ही नाटके त्यावेळी गाजत होती. किर्लोस्करांचं ‘सौभद्र’ लोकप्रिय झालं होतं. मराठी नाट्यसंगीतानं आपली स्वतंत्र ओळख भारतीय रंगभूमीवर प्रस्थापित केली होती. विष्णुदास भावे ते किर्लोस्कर यांच्या मधल्या काळात उर्दू, फारशी, गुजराती रंगभूमीची चलती होती, पण रंजनप्रधानता हेच या रंगभूमीचं सूत्र होतं. या रंगभूमीवर लेखकाला स्थान नव्हतं. वैचारिकता, सामाजिक प्रबोधन, साहित्यिक मूल्यं यांचा नाटकांशी सुतराम संबंध नव्हता. किर्लोस्करांनी आपलं वेगळं नाटक निर्माण केलं. त्यांनी आपल्याकाळी अस्तित्वात असलेल्या रंजनप्रधान रंगभूमीचे काही घटक जरूर वापरले, पण तरीही आपली वाट वेगळी ठेवली. कोल्हटकरांनी मात्र या घटकांचा मुक्त वापर केला. मुळात श्रीकृ हे विनोदकार. त्यांच्या विनोदाची जातही सकस. पण नाटकांकडे वळल्यानंतर उर्दू-फारशीतली चमत्कृतिजन्यता त्यांनी आपल्या नाटकांचा प्रधान घटक बनवली. आपल्या समकालीनांचं अनुकरण न करता पौराणिक किंवा अनुवादित नाटकं करण्यापेक्षा त्यांनी स्वतंत्र सामाजिक नाट्यरचना केली, पण कल्पनारम्यता व अतिवास्तवता हाच त्यांचा मुख्य घटक राहिला. कोल्हटकर हे त्याकाळचे लोकप्रिय नाटककार ठरले. वाङ्‌मयीन कसोटीवर त्यांची ‘वीरतनय’, ‘मूकनायक’ ही नाटकं आज विस्मृतीत गेली असली तरी आपला कालखंड त्यांनी गाजवला, हे निःसंशय.

रांगणेकर व कालेलकर

कोल्हटकरी छापाच्या या नाटकांची मोहिनी पुढे अनेक नाटककारांवर पडलेली आपणाला दिसते. त्यांच्या प्रवृत्तीशी नातं सांगणारे नंतरच्या काळात उदयाला आलेले मोठे नाटककार म्हणजे मो. य. रांगणेकर. कोल्हटकरांप्रमाणेच त्यांचीही नाटकं सोपी, सुटसुटीत व हलक्या-फुलक्या कथानकांची. (कुलवधू, नंदनवन, आशीर्वाद इ.) १९४० नंतरच्या काळात बोलपटांमुळे रंगभूमीपासून दुरावलेला प्रेक्षक रांगणेकरांमुळे पुन्हा थिएटरकडे वळला. प्रेक्षकाला खेचून आणण्यासाठी डोक्याला ताप न देणारी, मनोरंजक नाटकंच आवश्यक आहेत हा धंदेवाईक विचार रांगणेकरांच्या काळापासूनच दृढ झाला.
या परंपरेत पुढं नाव येतं ते मधुसूदन कालेलकर यांचं. १९६० नंतरच्या काळात त्यांचा उदय झाला. मनोरंजनाचा मसाला त्यांच्या नाटकात ठासून भरला होता आणि प्रेक्षकांना रिझवणं ही त्यांची पहिली प्रतिज्ञा होती.
नंतरच्या काळात मराठी रंगभूमीवर कौटुंबिक, सामाजिक व विचारप्रधान नाटकांचा पगडा बसला व निव्वळ कोल्हटकरी नाटकांची परंपरा क्षीण झाली. नंतरच्या काळात या परंपरेशी नाते सांगणारी काही नावे म्हणजे मधुकर तोरडमल, प्र. ल. मयेकर, शेखर ताम्हणे, पुरुषोत्तम बेर्डे, केदार शिंदे आणि संतोष पवार. मयेकरांच्या भाषेवर गडकरी परंपरेचा प्रभाव असला तरी कोल्हटकरांच्या चमत्कृतिजन्यतेशी त्यांचं अधिक जवळचं नातं आहे. तीच गोष्ट अशोक समेळ, ताम्हाणे या नाटककारांची. लोकप्रिय संगीताचा वापर आणि विनोदप्रचुरता हे घटक बेर्डे, पवार यांच्या नाटकांत प्रकर्षाने आढळतात. निव्वळ मनोरंजनाचा निकष लावायचा तर केदार शिंदे हाच आजघडीला कोल्हटकरांचा वारस ठरतो.

खाडिलकरांची विचारनाट्ये

मराठी रंगभूमीच्या मूळ परंपरेतले दुसरे महत्त्वाचे नाटककार कृ. प्र. खाडिलकर. एका अर्थाने मराठीतील ते पहिले नाटककार ज्यांनी नाटकाची प्रयोगशीलता आणि साहित्यमूल्ये यांचा समतोल सांभाळलेला दिसतो. संगीतापासून नाटकाच्या भाषेपर्यंत विविध स्तरांवर नवे प्रयोग करणारेही खाडिलकर पहिलेच. ‘मानापमान’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘द्रौपदी’ या संगीत नाटकांनी त्यांना लोकप्रिय व अजरामर केलं तरी मराठी रंगभूमीवर सामाजिक, राजकीय विचारनाट्याचा पहिला आविष्कार घडवला तो खाडिलकरांनीच. ‘भाऊबंदकी’, ‘कीचकवध’ ही त्यांची नाटकं लक्षणीय आहेत. ‘सवाई माधवरावांचा मृत्यू’ हे तर मनोविश्‍लेषणाच्या पातळीवर जाणारं अप्रतिम नाटक आहे. रंजकतेच्या पलीकडे जाऊन नाटक प्रबोधन करू शकतं हे खाडिलकरांनी सर्वप्रथम दाखवलं. खाडिलकरांच्या वृत्तीशी नातं सांगणारे नंतरच्या नजीकच्या काळातले नाटककार म्हणजे वीर वामन जोशी व स्वातंत्र्यवीर सावरकर. पण खाडिलकरांइतकी सशक्तता व परिपूर्णता त्यांच्याकडे नसल्यामुळे तितक्या उंचीला हे दोन्ही नाटककार पोचू शकले नाहीत. सामाजिक प्रश्‍नांना वाचा फोडू पाहणारे खाडिलकरी प्रवृत्तीचे पुढचे नाटककार म्हणजे मामा वरेरकर. ‘हाच मुलाचा बाप’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘स्वयंसेवक’, ‘संन्याशाचा संसार’, ‘सोन्याचा कळस’ ही त्यांची नाटकं वरेरकरांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतात. याच काळात प्रबोधनकार ठाकरे यांनीही ‘खरा ब्राह्मण’सारखं नाटक लिहून या परंपरेशी नातं जोडलं.
खाडिलकरांच्या विचारनाट्यांचा वारसा पुढची अनेक वर्षे कुणालाच पुढं नेता आला नाही. अपवाद गो. पु. देशपांडे यांचा. पुढं मात्र प्रेमानंद गज्वी, रामनाथ चव्हाण, दत्ता भगत, प्रशांत दळवी, काही प्रमाणात अभिराम भडकमकर व आता अलीकडचे संजय पवार यांच्यापर्यंत ही परंपरा येते. माझं ‘तुका अभंग अभंग’ हे नाटकही याच पठडीतलं. ‘आदित्यचक्षु’, ‘चार बापांचा मुलगा’, ‘कृष्णद्वैपायन’ ही माझी इतर नाटकंही याच परंपरेतली.

गडकर्‍यांचे भाषावैभव

शतकापूर्वीच्या काळातले तिसरे महत्त्वाचे नाटककार राम गणेश गडकरी. मराठी रंगभूमीवर आजही सर्वाधिक प्रभाव आहे तो गडकर्‍यांचाच. ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’ आणि ‘राजसंन्यास’ ही गडकर्‍यांची तीन प्रमुख नाटके त्यांच्यातल्या महान नाटककाराची महत्ता दर्शवितात. नाटकाचं तंत्रही कसं असावं ते गडकर्‍यांनी दाखवलं. या तंत्राचा व भाषावैभवाचा वसा पुढं आचार्य अत्रे व बाळ कोल्हटकर यांनी घेण्याचा प्रयत्न केला. पण बाळ कोल्हटकर यांनी घेतला तो केवळ भाषेचा बाज. भाषा व तंत्र या दोन्ही बाबतीत लोकमान्य ठरले ते आचार्य अत्रे. या भाषेच्या सौंदर्याची मोहिनी आपणाला पुढे वि. वा. शिरवाडकर यांच्यावर पडलेली दिसते, तर तंत्राचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांनी उचलल्याचे स्पष्ट होते. वसंत कानेटकर हेसुद्धा गडकर्‍यांशी चांगल्या प्रकारे नातं सांगतात. किंबहुना गडकरी प्रवाह विकसित केला तो कानेटकरी नाटकांनीच. मग त्यात जयवंत दळवी, शं. ना. नवरे, सुरेश खरे, मधुकर तोरडमल, अशोक पाटोळे, अभिराम, गिरीश जोशी, आनंद म्हसवेकर, शेखर ढवळीकर अशा अनेकांनी आपापले झरे मिसळवले.
कोल्हटकर, गडकरी, खाडिलकर या तिन्ही परंपरांशी नातं सांगू शकतील असे दरम्यानच्या काळातले नाटककार म्हणजे रत्नाकर मतकरी. त्यांचे वैविध्य लक्षणीय आहे. लोककथा ७८, आरण्यक, खोल खोल पाणी ही त्यांची नाटकं खाडिलकरांशी नातं सांगतात. तर त्यांची विनोदी नाटकं काहीशी कोल्हटकरी, काहीशी गडकरी अंगाने फुललेली दिसतात. गडकर्‍यांनी नाट्यलेखनात जी स्वतंत्र विनोदशैली विकसित केली तिचा अंगीकार जुन्या काळातल्या माधवराव जोशांपासून गेल्या पिढीतील वसंत सबनीस व अगदी हल्लीचे परेश मोकाशी यांच्यापर्यंत अनेकांनी केलेला दिसतो.

तेंडुलकरी प्रवाह

कोल्हटकर, गडकरी, खाडिलकर यांच्याहून सर्वस्वी वेगळा, स्वतंत्रपणे उगम पावून विकसित झालेला आणि मराठी रंगभूमीला जागतिक स्तरावर पोचवणारा चौथा प्रवाह विकसित केला तो विजय तेंडुलकर यांनी. तेंडुलकरांच्या नाटकांनी नाट्यरचना, संवाद, भाषा, व्यक्तिरेखाटन याबाबतीत स्वतंत्र पायंडे पाडले. त्यांच्या प्रत्येक नाटकाची शैली वेगळी आहे तरी त्यांचा प्रभाव सतत विस्तारत गेल्याचे जाणवते. याच प्रभावातून महेश एलकुंचवार हा सशक्त नाटककार उभा झालेला दिसतो. अजित दळवी, शफाअत खान, जयंत पवार, चेतन दातार, अतुल पेठे असे अनेक नाटककारही या प्रवाहातून पुढे आले.
मराठी रंगभूमीला पूर्णपणे वेगळा आयाम देणारा एक वेगळा नाटककार चिं. त्र्यं. खानोलकर. नाट्यरचनेचं तंत्र पूर्णपणे उमगलेलं नसतानाही आपल्या उत्तुंग कविप्रतिभेच्या जोरावर खानोलकरांनी जी अप्रतिम नाट्यनिर्मिती केली ती विस्मयजनक आहे.
मराठी रंगभूमी अशी पुढे सरकत असतानाच लोकरंगभूमीची एक स्वतंत्र धाराही मार्गक्रमणा करीत होती. ही धारा आज फारच विस्तारलेली दिसते. एकाहून एक जबरदस्त परफॉर्मर्स लोकरंगभूमीने महाराष्ट्राला दिले. ‘विच्छा माझी…’, ‘गाढवाचं लगीन’ ही वगनाट्ये तर क्रांतिकारक म्हणावी अशाच थाटाची होती.
असाच एक वेगळा प्रवाह प्रस्थापित केला तो सतीश आळेकर या नाटककाराने. याच परंपरेत चं. प्र. देशपांडे, मकरंद साठे, राजीव नाईक, योगेश सोमण ही नावं आपल्याला घेता येतील.
बबन प्रभू यांनी मराठीत फार्सचा प्रवाह आणला. हिराकांत कलंगुटकर यांची समर्पक साथ त्यांना लाभली. फार्सच्या या परंपरेत गेल्या पंचवीस वर्षांत आपल्या अंगभूत शक्तीने उठून दिसणारं एकच नाव म्हणजे गंगाराम गवाणकरांचं ‘वस्त्रहरण.’ मराठीतील हा एकमेव ओरिजिनल फार्स म्हणायला हरकत नाही.
मराठी रंगभूमीवरील या विविध प्रवृतीप्रवाहांचा नुसताच निसटता उल्लेख मी केला आहे. तो करीत असताना जुन्या काळापासून आजतागायतच्या अनेक नाटककारांची नावे विस्तारभयाने टाळली आहेत. पहिली स्त्री नाटककर्ती हिराबाई पेडणेकर किंवा सोनाबाई केरकर, न. चिं. केळकर, य. ना. टिपणीस, वि. ह. औंधकर, अनंत काणेकर, विद्याधर गोखले, रणजित देसाई, पुरुषोत्तम दारव्हेकर, श्री. वि. वर्तक, नागेश जोशी, कामगार रंगभूमीवरचे मुरारी शिवलकर, ला. कृ. आयरे, आबासाहेब आचरेकर, विश्राम बेडेकर, श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, अनिल बर्वे, पु. भा. भावे, शिवाजी सावंत, दिलीप परदेशी, वसंत कामत, वामन तावडे, गो. गं. पारखी, द. ग. गोडसे अशा अनेकांचे मूल्यमापन करता आलेले नाही. त्याबद्दल क्षमस्व.