योग माहात्म्य

0
310
  •  डॉ. पंकज अरविंद सायनेकर

येणार्‍या काळात ‘योग’ हा प्रत्येकाच्या जीवनात फार महत्त्वाची भूमिका निभावेल यात शंका नाही. फक्त २१ जून या एका दिवसापुरता साजरा न करता, योगदिनाच्या शुभमुहूर्तावर असा निश्चय करू की स्वतःच्या जीवनात थोड्या प्रमाणात का होईना पण योग ‘जगण्याचा’ आणि जपण्याचा प्रयत्न करीन.

योगस्थः कुरु कर्माणि सङ्गत्यक्त्‌वा धनंजय| सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्चते॥ (भ.गी. २.४८) येथे योगाची परिभाषा ‘समत्वं योग उच्चते’ अशी केलेली आहे. योग म्हणजे समत्व. कोणत्याही परिस्थितीत समत्व राखणे म्हणजे योग. उष्ण आणि थंड, गोड आणि कडू, सुख आणि दुःख या आणि अशा अनेक प्रसंगी किंवा गोष्टींत समत्व राखणे म्हणजे योग. यश आणि अपयशाबद्दलच्या आसक्तीचा त्याग करून समभावाने कर्म करणे, त्या समभावालाच योग म्हणतात.

तसे पाहिले तर योगाच्या अनेक व्याख्या पाहायला मिळतात. योगः कर्मसु कौशलम्, योगश्चित्तवृत्तिनिरोधः| पण सोप्या आणि साध्या शब्दांत म्हणायचे झाले तर योग म्हणजे जुळणे. योग हा शब्द ‘यूज्’ या संस्कृत धातूपासून बनला आहे, ज्याचा अर्थ ‘जुळणे.’ परंतु इतक्या खोलवर न जाता रोजच्या जीवनात योग कसा अमलात आणता येईल यावर लक्ष देणे आवश्यक आहे. आपले शरीर वेगवेगळ्या संस्थांनी (system) बनलेले आहे. पचनसंस्था (digestive system), रक्ताभिसरण संस्था (circulatory system), मज्जासंस्था (nervous system) इत्यादी. योगाच्या माध्यमातून या सर्व संस्था निरोगी ठेवू शकतो. योगासनाच्या निरंतर अभ्यासाने मांसपेशी, स्नायू निरोगी राहतात. विशिष्ट आसनांमध्ये विशिष्ट स्नायूंवर ताण किंवा दाब पडल्याने ते स्नायू मजबूत होण्यासाठी मदत होते. आसने म्हणजे शरीराला योग्य रीतीने हाताळणे. मंडुकासन, चक्रासन या आसनांच्या अभ्यासाने इन्सुलिन, पोटात तयार होणारी आम्लं (acids) योग्य प्रमाणात स्त्रवतात (secretion). पश्चिमोत्तानासन, ताडासन अशा आसनांच्या अभ्यासाने स्नायू ताणून त्यांची वाढ होते.

चक्रासन, भुजंगासन यांच्या अभ्यासाने पाठीचा कणा लवचीक बनतो. प्राणायाम म्हणजे, श्वासोच्छ्‌वासावरील नियंत्रण. प्राणायामाच्या निरंतर अभ्यासाने श्वसनसंस्था सुदृढ होते. आपली फ्फुफुसे साधारणपणे पाच ते सात लिटर हवा साठवू शकतात. परंतु, आम्ही फक्त वीस टक्के (म्हणजे एक लीटर) हवा शोषण करतो. याचा अर्थ, फ्फुफुसाचा बराचसा भाग विनावापर उरल्याकारणाने त्याची कार्यक्षमता कमी होते. अनुलोम-विलोम, उज्जाई या प्राणायामाच्या अभ्यासाने श्वसनसंस्था सुदृढ होते. योगातील विविध क्रिया, जसे कपालभाती, जल-सूत्र नेती, बस्ती, धौती यांनी शरीरशुद्धी होते. आजच्या ‘कोरोना’ महामारीच्या काळात नेती फारच उपयुक्त आहे. शीर्षासन, सर्वांगासनामुळे मेंदूमध्ये रक्तपुरवठा योग्य प्रमाणात होतो. बंधच्या (मूलबंध, उड्डीयानबंध, जालंधरबंध इत्यादी) मदतीने मज्जासंस्थेतील ऊर्जा योग्य रीतीने निर्माण होते तसेच संक्रमित होते.
महर्षी पतंजलींनी ‘अष्टांग योग’ सांगितला आहे. अष्टांग म्हणजे आठ अंगे असलेला योगमार्ग. या अंगांना पायर्‍या न म्हणता फांद्या म्हणणे उचित होईल. समजा पायरी म्हटले तर दुसर्‍या पायरीवर पोचण्यासाठी पहिली पायरी सोडावी लागते.

अष्टांग योगामध्ये असे असू शकत नाही. आपण तिसर्‍या पायरीचा (आसन) अभ्यास करत असताना पहिल्या दोन पायर्‍या सोडू नयेत. म्हणजेच, ही सर्व आठही अंगे बरोबर चालतात. ती आठ अंगे म्हणजे- यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यातील पहिली चार बहिरंग योग, शेवटची तीन अंतरंग योग आणि पाचवा (प्रत्याहार) हा अंतरंग व बहिरंग यांना जोडणारा सेतू. यम आणि नियम हे प्रत्येकी पाच आहेत. यम: १. अहिंसा ः मनसा, वाचा, कर्मणा या तीनही प्रकारे हिंसा न करणे. २. सत्य ः कोणत्याही परिस्थितीत सत्याची कास न सोडणे. ३. अस्तेय ः चोरी न करणे. ४. ब्रह्मचर्य ः ब्रह्मं इति चरति या उक्तीप्रमाणे कार्य करणे आणि ५. अपरिग्रह ः आवश्यकतेपेक्षा जास्तीचा संचय न करणे. नियम : १. शौच ः स्वच्छता राखावी. २. संतोष ः समाधानी असावे. ३. तप ः तप्त होणे. आपणास जर एखादी गोष्ट प्राप्त करायची आहे तर त्यासाठी लागणारे सर्व प्रयत्न करण्याची तयारी ठेवणे. ४. स्वाध्याय ः स्व अध्ययन करीत प्रगती साधणे. ५. ईश्वर प्रणिधान ः आपणाला जे मिळाले आहे ते ईश्वरामुळेच आणि मी जीवनात जे काही मिळवले आहे ते मी त्या ईश्वराच्या चरणी अर्पण करतो ही भावना मनात ठेवणे. (ईश्वर हा देववाचक नसून पुरुष विशेष या अर्थाने वापरला आहे. ईश्वर या विषयावर योगदर्शनात सविस्तर भाष्य केले आहे.)
आसन म्हणजे शरीराची विशिष्ट प्रकारची रचना करणे (posture), जेणेकरून योग्य व्यायाम मिळतो. स्नायू, हाडे, रक्तवाहिन्या यांचे आणि इतरांचे आरोग्य सुधारते. प्राणायामाद्वारे श्वसनसंस्था निरोगी होतेच, त्याचबरोबर प्राण (पंचप्राण : प्राण, अपान, व्यान, उदान, समान) यांचेही शरीरातील संचालन योग्य प्रमाणात आणि योग्य रीतीने होते. त्यानंतर आहे प्रत्याहार. ज्याचा अर्थ, इंद्रियांवर ताबा मिळवणे. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, मनस् या सर्वांवर ताबा मिळवणे आणि आपले लक्ष बाहेरच्या जगापेक्षा स्वतःमध्ये केंद्रित करणे. धारणा म्हणजे एकाग्रता. कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करून ठेवू शकणे. ध्यान म्हणजे जेव्हा धारणेतील एकाग्रता परिपूर्ण होते आणि आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले आहे ती एकच वाटणे. समाधी अवस्था म्हणजे ध्यानाची पराकाष्ठा. आपले अस्तित्व विसरून पूर्णपणे ध्यान केलेल्या गोष्टीमध्ये एकरूप होणे.

याचप्रमाणे स्वात्मारामांचे हठप्रदीपिका, ऋषी घेरंड यांची घेरंड संहिता ज्यामध्ये योगी माणूस कसा असावा, योग साधकाने काय मर्यादा पाळाव्यात, शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे असे आणि अशा अनेक गोष्टींवर विवेचन केले आहे. शुद्धीक्रिया, ज्या शरीर शुद्धीसाठी फार उपयुक्त आणि महत्त्वाच्या आहेत. त्याविषयी फार सुंदर लिखाण हठप्रदीपिका आणि घेरंड संहितेमध्ये मिळते. संपूर्ण शरीराला शुद्ध करणार्‍या अशा या क्रिया सहा वर्गात विभागल्या आहेत. नेती, नौली, बस्ती, कपालभाती, धौती, त्राटक असे सहा विभाग केले आहेत. २१ वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया आपले शरीर, शारीरिक आणि मानसिक पातळीवर सुदृढ ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.

योगदर्शनात ‘चित्तविक्षेप’ नावाची संकल्पना आहे. योगमार्गात येणारे अडथळे त्यामध्ये सांगितले आहेत. व्याधी ः शारीरिक आजार, स्त्यान ः माहिती असूनही योग्य पावले न उचलणे, संशय ः स्वतःबद्दल किंवा भोवताली असलेल्या साधनांवर संशय, प्रमाद ः दिरंगाई करणे, आलस्य ः आळशीपणा करणे, अविरती ः विषयांची आसक्ती असणे, भ्रांती दर्शन ः चुकीचे समज (false knowledge), अलब्धभूमिकत्व ः एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवण्यात अपयशी होणे आणि अनवस्थितत्व म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये प्रावीण्य मिळवणे परंतु ते टिकवण्यास अपयशी ठरला हे अडथळे येऊ शकतात. या चित्तविक्षेपांसोबत त्याचे सहभुवही त्यांपाठोपाठ येतात. ते म्हणजे, दुःख, दौर्मनस्य, अंगमेजयत्व आणि श्वासप्रश्वास हे होत. चित्तविक्षेप यांसोबत ’चित्तप्रसादन’ असाही उल्लेख केला आहे. ज्यामध्ये सुखी माणसाशी मैत्री, दुःखी माणसाप्रती करुणा, पुण्य करणार्‍या माणसाची मुदिता (स्तुती) आणि अपुण्य करणार्‍याची उपेक्षा करणे असा सल्ला दिला आहे. वरील चित्त विक्षेप आणि चित्तप्रसादन या गोष्टी पाहिल्या तर असे दिसून येते की महर्षी पतंजली एक मानसशास्त्राप्रमाणे उपदेश देतात.

द्वेश, राग, अभिलाषा या सर्व मनामध्ये निर्माण झालेले भाव आहेत आणि महर्षी आमच्यापुढ्यात एका आरश्याप्रमाणे उपस्थित करतात. चित्तविक्षेपामुळेच आजच्या घडीला प्रत्येकाला स्वतःवर, स्वतःच्या शक्तीवर संशय निर्माण होताना दिसतो. नाहीतर शुल्लक कारणाने कोण टोकाची भूमिका घेणे, स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तीवर विश्वास नसणे अशा गोष्टी दिसल्या नसत्या. एकंदरीत माणसाच्या मानसिक प्रश्नांची उत्तरेही योगाभ्यासाने मिळतात.
योगमार्गात योग साधकाने खाण्याबाबत सतर्क असणे आवश्यक आहे, आणि याविषयी भगवत् गीता, हठप्रदीपिका इत्यादीमध्ये विवेचन केले आहे. योगी माणसावर याबाबतीत काहीही निर्बंध घातले नाहीत तर दर्शनांमध्ये फक्त कोणत्या गोष्टी खाल्याने काय होऊ शकते याची माहिती दिली आहे. ही सृष्टी त्रिगुणात्मक आहे (त्रिगुण : सत्व, रजस आणि तमस). त्याचप्रमाणे हे शरीरही तीन गुणांनी निर्माण झाले आहे. खाणे हे शरीर चांगल्या प्रकारे चालण्यासाठीचे इंधन आहे आणि त्याचप्रमाणे आपण खाल्ले पाहिजे. रतन टाटा यांनी म्हटल्याप्रमाणे- eat your food as a medincine otherwise you will have to consume medicine as your food! सात्विक खाणे ः जे सोज्वळ, शुद्ध, साधे आहे असे. राजसिक ः जे क्रियात्मक प्रवृत्तीचे असते आणि तामसिक ः शरीरात जडत्व निर्माण करणारे. सुस्ती, मानसिक शैथिल्य आणणारे. त्यामुळे योग साधकाने ठरवावे की कोणत्या प्रकारचे भोजनाचे सेवन करणे उचित होईल. जास्ती न शिजवलेले, शिजवून तीन तासांत खाणे, ताजे, असे अन्न सात्विक गुणांनी युक्त असते. कांदा-लसूण, मांस, मसालेदार इत्यादी राजसिक अन्न आहे. तर, हवाबंद/ पिशवीबंद, शिळे अन्न, तळलेले पदार्थ, स्निग्ध पदार्थ हे तामसिक गुण असलेले अन्न आहे. योगातील शिकवण फक्त शारीरिक पातळीवरच नाही तर त्याहूनही प्रगल्भ, भव्य-दिव्य आहे. म्हणूनच योग हा विषय फक्त आसन-प्राणायामापर्यंत मर्यादित न ठेवता इतर गोष्टीही समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आधुनिक मानसशास्त्र (modern psychology) चिंता, नैराश्य अशा भावनांचे विवेचन करते आहे. पण त्याहूनही फार बुद्धीपुरस्सर रीतीने सर्व भावनांबद्दल भाष्य पूर्वीपासूनच होत आले आहे. अलीकडच्या काळात योगाचा प्रचार आणि प्रसार फार झाला आहे. भारतीय संस्कृतीतील योग विद्या सर्वदूर पसरली आणि सर्वांनी स्वीकारली आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी २०१४ साली संयुक्त राष्ट्रांनी (united nations) २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून मान्य केला आणि २०१५ सालापासून साजरा करण्यात येतो आहे. येणार्‍या काळात ‘योग’ हा प्रत्येकाच्या जीवनात फार महत्त्वाची भूमिका निभावेल यात शंका नाही. फक्त २१ जून या एका दिवसापुरता साजरा न करता, योगदिनाच्या शुभमुहूर्तावर असा निश्चय करू की स्वतःच्या जीवनात थोड्या प्रमाणात का होईना पण योग ‘जगण्याचा’ आणि जपण्याचा प्रयत्न करीन. तुम्हा सर्वांना ६व्या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.