योगाने सर्वही साधते…!

0
7

योगसाधना- 622, अंतरंगयोग- 2–

  • डॉ. सीताकांत घाणेकर

हे राक्षस म्हणजे मानवात असलेले विकार, वासना व अहंकार. दशमुखी रावणदेखील तेच दाखवतो. आता आपण आपणातील सर्व विकारांचा वध करूया. आपले मन विचारांच्या पवित्र, कोमल सुमनांनी भरून त्याचा सुगंध घेऊया… आपले विचार बदलले तर सृष्टीदेखील सुंदर, सुशोभित, पवित्र व शांत दिसेल.

हल्लीच्या धकाधकीच्या तणावपूर्ण मानवी जीवनात, शरीराच्या प्रत्येक संस्थेचे विविध तऱ्हेचे रोग बळावले आहेत. याला कारणेदेखील अनेक आहेत- दोषयुक्त जीवनपद्धती, ताणतणाव- प्रत्येक वयात- पेशात, धंद्यात, शिक्षणात, कुटुंबात… परंतु यातील नव्वद टक्के रोग हे निव्वळ मनोदैहिक असतात. याचे मूळ कारण म्हणजे बहुतेकांच्या मनात असलेले नकारात्मक विचार.
योगशास्त्रात पंचकोशांपैकी प्रत्येक कोशाला- अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय (आत्मा)- महत्त्व आहेच. पण मनोदैहिक रोगांचा विचार केला तर मनाचे महत्त्व कळते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी बुद्धी आहेच; पण ती सद्सद्विवेकबुद्धी हवी. तद्नंतर आत्मादेखील विचारांना (मनाला), बुद्धीला चालना देतो. पण तोदेखील मूळ संस्कारांप्रमाणे पवित्र हवा. त्याचे मूळ गुण सांभाळायला हवेत- आत्मज्ञान, सत्य, प्रेम, शांती… दुर्भाग्य म्हणजे अध्यात्मशास्त्राची जाणीव व अभ्यास नसल्यामुळे हवा-पाणी-धरतीबरोबर मन-बुद्धी-आत्मा यांचेदेखील प्रदूषण वाढले आहे.

अध्यात्मशास्त्र व योगशास्त्र यांमध्ये व्यक्तीच्या विचारांना फार महत्त्व आहे. विचारांमुळे भाव निर्माण होतो. त्याप्रमाणे बोल, कर्म व भाग्य बनते. म्हणूनच बालपणापासून सद्विचारांवर संपूर्ण लक्ष द्यायला हवे. अर्थात कुटुंबात वडीलधाऱ्यांनी, शाळा-कॉलेजात शिक्षकांनी, तर समाजात विद्वानांनी. पूर्वीच्या काळात ही गोष्ट सहज होत असे. पण आता विचारांवर योग्य अन्‌‍ अपेक्षित नियंत्रण नाही. ज्ञान मिळवण्याची विविध माध्यमे वाढली आहेत- वर्तमानपत्र, टीव्ही, ई-मेल, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्वीटर… अशी असंख्य. व्यक्तीच्या मनावर- मुख्यत्वे बालमनावर- काय परिणाम होईल याची खात्री नाही.

विचारांचे महत्त्व काय व किती आहे यासंबंंधी एक वाचलेली कथा आठवते-
एक समृद्ध राज्य होते. एक दिवस राजा व प्रधान सकाळी फिरायला निघाले. चालता चालता एका जागेवर चंदनाचा परिमळ दरवळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढे जाऊन बघतात तर त्यांना चंदनाची एक मोठी बागच दिसली. प्रधानाकडून राजाला कळले की ती बाग राज्यातीलच एका व्यक्तीची आहे. राजाला त्या बागेचा मोह झाला. त्याला वाटले की ही छान बाग आपली व्हावी. त्याने प्रधानाला सांगितले की त्या व्यक्तीकडून ती बाग घे व तिला दुसरीकडे जागा दे.
राजाज्ञेप्रमाणे प्रधान त्या व्यक्तीकडे गेला व त्याला राजाज्ञा सुनावली. ती व्यक्ती म्हणाली की त्याची मुलगी लग्नाची आहे व चंदन विकून पैसे मिळाल्यावर आपण मुलीचे लग्न थाटामाटाने करणार. त्या व्यक्तीने पुढे विचारले की, राजाने मला ही जागा सोडून जायला का सांगितले आहे?
प्रधान बुद्धिमान व विचारवंत होता, शिवाय अध्यात्माचा त्याचा अभ्यास होता. त्याने त्या व्यक्तीला विचारले- ‘कधीकाळी तुझ्या मनात राजाबद्दल वाईट विचार आले होते का?’
ती व्यक्ती काही बोलेना. कारण विचार आले होते ते योग्य नव्हते. प्रधानाने त्याला अभय दिल्यावर ती व्यक्ती म्हणाली, ‘माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसे हवे आहेत म्हणून विचार आला की जर राजा स्वर्गवासी झाला तर त्याच्या अंतक्रियेसाठी चंदनाचा मोठा साठा लागेल. माझे सगळे चंदन विकले जाईल. मला कळते की असा विचार करणे चूक आहे, पाप आहे. पण विचार आला खरा. पण मी तो कुणालाही बोलून दाखवला नाही. तुम्हालाच पहिल्यांदा सांगतो. कृपया, राजाला सांगू नका. मला शिक्षा होईल.”
प्रधानजी म्हणाले, “तू चिंता करू नकोस. मी बघतो काय करायचे ते!”

त्या व्यक्तीने विचारले, “प्रधानजी, तुम्हाला कसे कळले की माझ्या मनात वाईट विचार आला म्हणून?”
प्रधानजी म्हणाले, “मी अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करतो. त्याप्रमाणे एका आत्म्याच्या मनातील विचार दुसऱ्या आत्म्यापर्यंत नैसर्गिकपणे पोचतात. खरे म्हणजे तू असा विचार करायला हवा होता की राज्यात फार मोठा यज्ञ, हवन, पूजा व्हायला हवी. माझे चंदन तिथे विकले जाणार.” त्या व्यक्तीला ते पटले. त्याने प्रधानजीचे आभार मानले.
प्रधानाने एक फार मोठे सत्कर्म केले होते. एका व्यक्तीच्या सद्विचारांना चालना दिली होती. जसे नारदाने वाल्या कोळ्याला मार्गदर्शन केले आणि तो महर्षी वाल्मिकी झाला. भगवान बुद्धांनी भील्ल डाकू अंगुलीमलाला आत्मज्ञान देऊन संत बनवले.

सारांश एवढाच- सद्विचारांचे महत्त्व. शास्त्रकार सांगतात की, प्रत्येकाच्या मनात दिवसाला चाळीस-पन्नास हजार विचार येतात. आपण विचार करायला हवा की यातील किती चांगले, परोपकाराचे, कल्याणकारी विचार असतात व किती स्वार्थी, आत्मकेंद्रित, दुष्ट विचार असतात. त्याप्रमाणे आपला भाव-बोल-कर्म- भाग्य ठरणार.
मनोवैज्ञानिक म्हणूनच सांगतात- ‘विचार करण्यापूर्वी विचार करा!’ काही व्यक्तींचे विचारच नकारात्मक असतात. उदा. मी बाहेर निघताना एका व्यक्तीचे तोंड पाहिले आणि माझे कामच झाले नाही. ती व्यक्ती वाईट आहे म्हणून असे झाले.
खरे म्हणजे ती व्यक्ती वाईट नसते. आपले मन तिच्याबद्दल वाईट विचार करते म्हणून आपल्या अंतर्मनात तसा विचार येतो व मग ते सत्यरूपात येते. अध्यात्मशास्त्राचा एक मूळ फायदा म्हणजे- आपण जसे देतो, तसेच आपल्याला प्रकृती परत करते. त्यामुळेच आपण सकाळी पूजापाठ करावा असा आग्रह होता. पण हे सर्व कर्मकांडात्मक शब्दबोलच न राहता अंतर्मनातून उमटायला हवे. ध्यान करताना श्रेष्ठ, पवित्र, शक्तिमान विचार हवेत. कारण अशावेळी आपला परस्पर संबंध कल्याणकारी, प्रेमळ, सर्वशक्तिमान परमात्म्याशी असतो. त्याला तर आपण माता-पिता-बंधू-सखा मानतो.

आपण किती वेळ पूजा केली, ध्यान केले, भजन म्हटले हे महत्त्वाचे नाही, तर त्याची पवित्रता महत्त्वाची असते. हे कर्मकांड करताना जे वातावरण असते- ज्योती, अगरबत्ती, कर्पूरारती, धूप, फुले… त्यावेळी चांगले, आनंदी, पवित्र वाटते. पण तद्नंतर इतर कुठेही जाताना मनाची स्थिती तशीच ठेवायचा प्रयत्न हवा. म्हणून हे कर्मकांड करण्यामागचा हेतू काय होता, ध्येय काय होते, हे माहीत हवे. हे ज्ञान शास्त्रशुद्ध योगसाधनेमार्गे मिळेल. कारण योग हे अत्युच्च अध्यात्मशास्त्र आहे.
बालपणात देवीदेवतांच्या कथा सांगितल्या जात. त्या कथा पवित्र, सोळाकलासंपूर्ण होत्या. त्यांच्यासाठी ‘अहिंसा परमोधर्म’ होता. त्या कथा भक्तांना प्रेम देतात. कल्याणकारी असतात. या कथा फक्त ऐकण्यापुरत्याच नसतात तर आचरणात आणण्यासाठी असतात.
अभ्यासपूर्ण वृत्ती नसल्यामुळे आपण फक्त कर्मकांडातच गुंततो. त्यामागील तत्त्वज्ञान व भाव बघत नाही. नुकताच दसरा होऊन गेला. काहीजण रावणवधाच्या गोष्टी सांगतात, तर काही दुर्गामातेने राक्षसांचा वध केला अशा कथा सांगतात. हा फक्त शब्दार्थ झाला. त्यातील गर्भीतार्थ, भावार्थ व आध्यात्मिक अर्थ समजायला हवा. हे राक्षस म्हणजे मानवात असलेले विकार, वासना व अहंकार हे दोष. दशमुखी रावणदेखील तेच दाखवतो.
आता आपण सर्व आपणातील विकारांचा वध करूया. आपले मन विचारांच्या पवित्र, कोमल सुमनांनी भरून त्याचा सुगंध घेऊया… आपले विचार बदलले तर सृष्टीदेखील सुंदर, सुशोभित, पवित्र व शांत दिसेल.