योगमार्ग – राजयोग

0
231

(योगसाधना – २५९)

(स्वाध्याय – २७)

– डॉ. सीताकांत घाणेकर
धरतीवर जन्म घेतला की ही अपेक्षा ठेवायलाच हवी कीजीवनाचे विविध पैलू नैसर्गिकरीत्या असतीलच. सुखदुःखं असतील. चांगल्या घटनांबरोबर अनेक संकटे-मस्याही असतील. सर्व मानवजातीसाठी तेच कायदे आहेत. सामान्य-ज्ञानी, गरीब-श्रीमंत, संतसत्‌पुरुष-चोर डाकू अगदी देवाधिक व अवतार – कुणालाही या संदर्भात सूट नाही.अशा या बहुरंगी जीवनावर सखोल विचार व चिंतन करून आपल्या ऋषींनी विविध जीवनोपयोगी शास्त्रे, ग्रंथ तयार केले. त्यांच्यावर आधारित महाकाव्ये – रामायण, महाभारत, पुराणे लिहिली. सामान्य माणसाला तत्त्वज्ञान समजणे कठीण होते म्हणून पुष्कळ साहित्य सत्य घटनांवर आधारित असे तयार केले. स्वतः सृष्टिकर्ता भगवंतदेखील अवतार रूपाने धरतीवर आले. जीवनातील समस्यांना सामोरे कसे जावे हे स्वतः भोगून शिकवले. खरे म्हणजे त्यांनी ज्या हाल-अपेष्टाच दिवस काढलेत त्या मानाने आपल्या समस्या तेवढ्या तीव्र नाहीत. पण अनेक वेळा आपण म्हणतो की अवतार म्हणजे स्वतः भगवंतच होते. त्यांना या गोष्टी सोप्या होत्या. पण आपण हे विसरतो की एकदा पृथ्वीवर जन्म घेतल्यावर ते भगवंतासारखे वागले नाहीत. तर सामान्य माणसासारखे वागले. आपल्या अद्भुत शक्तीचे सहसा प्रदर्शन केले नाही.
आपण असे बोलतो व मानतोसुद्धा. याचे कारण म्हणजे आपण शास्त्रशुद्ध अभ्यास करत नाही. तसेच नियमित अभ्यास करीत नाही. यासाठीच सांगितले आहे प्रमाद न करता नियमित स्वाध्याय करा.
रामायणाबद्दल वाचताना आम्हाला असे ज्ञान होते की एवढा सुंदर – रामायणासारखा – ग्रंथ रचणारे महर्षी वाल्मिकी पूर्वाश्रमात अत्यंत दुराचारी गुंड वाल्या कोळी होते. पण नारदांनी त्याला उपदेश करून ज्ञान दिले. त्यामुळे त्याचे मतपरिवर्तन झाले. तसेच आम्ही अंगुलीमल या डाकूबद्दल वाचले. त्यालासुद्धा शांतमूर्ती भगवान बुद्धांनी आत्मज्ञान दिले आणि नंतर तो त्यांचा शिष्य – अहिंसक या नावाने ओळखला जाऊ लागला. तोसुद्धा विधायक कार्य करायला लागला.
अशा मानव परिवर्तनाच्या गोष्टी ऐकल्या की आपण सहज म्हणतो त्यांना काय कठीण? नारद तर महर्षी होते आणि बुद्ध तर अवतार होते! स्वाध्याय केल्यावर ज्ञात होते की अशी शक्ती तर प्रत्येक मानवामध्ये आहे. म्हणून विविध शास्त्रांचा अभ्यास आवश्यक आहे. ज्यामुळे आंतरिक शक्तीची जाणीव होते.
पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले या महापुरुषाने हीच गोष्ट आपल्या प्रवचनातून आणि प्रत्यक्ष कृतीतून त्यांच्या स्वाध्याय परिवाराला समजावली. त्यांना आपल्या आंतरिक आत्मिक शक्तीची जाण झाल्यावर ते कार्यरत झाले. त्यांना समजले की ‘स्वाध्याय’ म्हणजे आठवड्यातून एक तास स्वाध्याय केंद्रात येऊन प्रार्थना, भक्तिगीते म्हणणे. श्‍लोकांचे पारायण करणे आणि चिंतनिका किंवा प्रवचन ऐकणे एवढे करून स्वाध्याय कार्याची प्रक्रिया पुरी होत नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. त्यांना ज्ञान झाले की या ज्ञानामुळे माझा जीवनविकास होत आहे. तसाच इतरांचाही व्हावा. हे विश्‍व भगवंताच्या इच्छेप्रमाणे सुंदर व्हावे. सर्वजण सुखी व्हावे.
शास्त्रीजींच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्वाध्याय कार्यात ज्ञान-कर्म-भक्ती या तिन्ही योगमार्गांचा सुरेख संगम आहे. भावफेरी व भक्तीफेरी करून ते आपला कर्मयोग आचरतात. यामुळेच जिथे जिथे शास्त्रीजींना अभिप्रेत असे स्वाध्याय कार्य चालू आहे तिथे तिथे मानव परिवर्तन हळूहळू दृष्टिक्षेपात येते.
मागील लेखात आपण नेमडा गावातील डाकू कसे बदलले व संपूर्ण गाव स्वाध्यायी कसा झाला हे बघितले. तसाच एक बदललेला गाव म्हणजे आपला – दमण. अनेक वर्षांपूर्वी पोर्तुगिजांकडे असलेला. तेथील घटनासुद्धा हृदयस्पर्शी आहेत.
दमण गावात – किनार्‍यावरचा गाव असल्यामुळे बहुतेक लोक मच्छीमार म्हणजे कोळी आहेत. ते आपल्या ट्रॉलरवर मासे पकडतात. तिथे एक स्मगलर होता. किनारपट्टी असल्यामुळे असा धंदाही लहान बोटी वापरूनच करतात. स्मगलिंगमध्ये लाखो-करोडोंची उलाढाल असते. कारण तिथे सोने, ड्रग्ज, दारू, शस्त्रं, दारूगोळा… अशा वस्तूंचे स्मगलिंग चालते. त्यामुळे आर्थिक प्राप्ती जास्त असते. मच्छीमारी बोटींवर तेवढी प्राप्ती नसते. त्यामुळे अनेकजण स्मगलिंगच्या बोटींवर जात असत.
नैसर्गिकरीत्या पैसा भरपूर असल्यावर व्यसने-दारू, तंबाखू, सिगारेट-विडी, वेश्या, जुगार जास्त असतात. असा गाव दुर्गतीला जातो. थोड्या व्यक्तींना या अशा स्थितीबद्दल खंत असते. पण प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे फार कमी असतात. त्यामुळे गावाची स्थिती फारशी सुधारत नाही. आज असली गावे पुष्कळ आहेत. आपल्या गोव्यातही आहेत.
एक दिवस दमणमध्ये पांडुरंगशास्त्रींचे काही स्वाध्यायी पोहोचले. तेथील नागरिकांची ती अवस्था बघून त्यांना फार दुःख झाले. पण फक्त दुःख उगाळीत बसणारा हा स्वाध्याय परिवार नाही. ते तिथे नियमित भक्तीफेरीला जायला लागले. स्वाध्याय कार्याचा जम बसायला लागला. शास्त्रीजी केव्हाही व्यसने सोडण्याबद्दल आग्रह करत नाही – बिडी, सिगारेट ओढू नका, दारू पिऊ नका, जुगार खेळू नका, तंबाखू खाऊ नका… ते फक्त सांगतात की ‘भगवंत आपल्या आत आहे, याची जाणीव ठेवा. तो आपल्या सर्व कर्मांची – सत्कर्म व दुष्कर्म यांची नोंद ठेवतो. आपले मूल असे वागते याची आईला जाणीव झाल्यावर तिला जसे दुःख होते तसेच दयाळू, कृपाळू, मायाळू भगवंताला होते. ही गोष्ट अप्रत्यक्षरीत्या उपदेश न करता त्या व्यक्तीच्या लक्षात येते.
पांडुरंगशास्त्री पुढे सांगतात की ‘गैर वागणार्‍या कुठल्याही व्यक्तीला प्रेम, आत्मीयता द्या. त्याचा द्वेष करू नका. हळूहळू त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन होणारच. पण गीतेच्या वचनाप्रमाणे कर्मफळाची अपेक्षा ठेवू नका. भगवंतावर श्रद्धा ठेवून आपले काम करीत रहा. तो आपल्या सत्कर्माची नोंद घेईलच.
ही शास्त्रशुद्ध पद्धत स्वाध्याय परिवार आपल्या भक्तीफेरीत आचरणात आणतो. दमणमध्येही या परिवर्तनाची हळूहळू प्रचिती यायला लागली. त्यांना आनंद व्हायला लागला. आपली चूक समजल्यामुळे अनेक जण स्मगलरच्या बोटींवर जायला नकार द्यायला लागले. तसेच अनेक लोकांची दारू सुटली. साहजिकच ज्यांच्या धंद्यावर परिणाम झाला त्यांना चीड आली. ते भांडण-तंटे करायला लागले. दमदाटी सुरू झाली. वातावरण तंग व्हायला लागले. गावांत पोलीस चौकशी सुरू झाली.
गुजरात राज्यात अनेक गावात स्वाध्याय कार्य बर्‍याच वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे राज्यकर्ते, पोलीस सर्वांना स्वाध्यायाच्या विधायक कार्याबद्दल माहीत आहे.
इथेही स्वाध्यायींनी स्मगलर व त्याच्या गुंडांना प्रेमच दिले. कसलीही तक्रार केली नाही. परिणाम अपेक्षेप्रमाणे झालाच. तो स्मगलर व त्याचे अनुयायी बदलले. जाहीर बैठकीमध्ये तो आला. आपली चूक कबूल केली. स्वाध्याय परिवाराचे कौतुक केले व विधायक कार्याला लागला.
‘अंतर्नाद’ या चित्रपटामध्ये या दोन्ही सत्य घटना अत्यंत सुंदर रितीने दाखवल्या आहेत. अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर हा सिनेमा दाखवला होता. तसेच अनेक थिएटरमध्येही प्रदर्शित केला होता.. आपल्या गोव्यातसुद्धा.
याबद्दल लिहिण्याचा हेतू म्हणजे –
* फक्त अवतार, भगवंत, महापुरुषच माणसाला बदलवू शकतात हा गैरसमज काढून टाका.
* आळस न करता शास्त्रशुद्ध स्वाध्याय करावा.
* ‘स्वाध्याय’ हा जरी अष्टांगयोगातील एक नियम असला तरी त्यांत ज्ञान-कर्म-भक्ती या तिन्ही योगमार्गांचा समावेश अपेक्षित आहे.
* कर्मफळाची अपेक्षा न ठेवता भगवंतावर अतूट श्रद्धा ठेवली तर देव अवश्य नोंद ठेवून यश देतोच. कारण शेवटी आपण त्याचेच विश्‍व चांगले व्हावे म्हणून प्रयत्न करतो.