योगमार्ग-राजयोग अंतरंग योग-५०

0
221
  •  डॉ. सीताकांत घाणेकर

हुतुतु, फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट… यामुळे शारीरिक व्यायामाचे सर्व फायदे मिळतात. मन प्रफुल्लित राहते. पचन व्यवस्थित होते. झोप शांत लागते.
पण त्याचबरोबर योगशास्त्राचा विचारही हवा. कारण योगसाधनेमुळे मनुष्याच्या सर्व पैलूंवर- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक,
हवा तसा परिणाम होतो.

सर्व विश्‍वात योगसाधना करणार्‍या व्यक्ती अनेक आहेत. प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे करतो. अगदी अत्यल्पच असे आहेत जे सकाळी ब्राह्ममुहूर्तावर साधना करतात. त्यामागची कारणे अनेक आहेत.

१) बहुतेकजण भारतीय संस्कृतीचा सखोल अभ्यास करत नाहीत. अनेकांना थोडा इतिहास, थोड्या गोष्टी, काही श्लोक एवढेच माहीत आहेत. रामायण, महाभारत, भागवत… यांचे वाचन केलेले पुष्कळ लोक अवश्य आहेत. अनेक ठिकाणी आपल्या आश्रमव्यवस्थेबद्दल माहिती असते. त्यात आश्रमवासियांची उठायची वेळ, दिनचर्या, झोपायची वेळ… याबद्दल नोंद असते. माझ्या वाचनात ब्राह्ममुहूर्त हा शब्द अनेकवेळा आलेला आहे. म्हणजे सकाळी ३ः३० ते ५ः३० (प्रातःकाळ). महाभारतात कर्ण सूर्याला अर्घ्य देण्यासाठी नदीकाठावर गेलेला दाखविलेला आहे. त्यावेळी तो दान करत असे. तेव्हा श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून कुंती त्याच्याकडे जाते.
इथे आपण ती गोष्ट बघत नाही तर साधनेची वेळ हा मुद्दा आहे.

२) आपण योगसाधनेत सूर्यनमस्कार करतो. सूर्योदय होण्याआधी आपण आंघोळ वगैरे करून तयार असायला हवे. म्हणजेच प्रातःकाळी उठण्याबद्दल अप्रत्यक्षपणे नोंद आहे.
या असल्या अत्यंत मुख्य व आवश्यक गोष्टींची आपण सहसा नोंद घेत नाही. मग ब्राह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रश्‍नच येत नाही. फक्त अनेक आश्रमांमध्ये व काही मंदिरांमध्ये (काकड आरती प्रातः ३ः३० वाजता) ब्राह्ममुहूर्त कटाक्षाने पाळला जातो.

त्याशिवाय आम्हाला इतर अनेक निमित्ते आहेत.
– आजची जीवनपद्धती, धंद्याच्या-पेशाच्या वेळा, रेडिओ, दूरदर्शन कार्यक्रम, मुलांचा अभ्यास, रात्रीचे कार्यक्रम- पार्ट्या, बैठका, नाटके, सिनेमा…
या सर्व गोष्टींमुळे रात्री आपण उशिरा झोपतो. मग सकाळी उठणार कसे? याचे मुख्य कारण म्हणजे झोपेच्या वेळेबद्दल अज्ञान. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात प्राथमिकता वेगळ्याच आहेत- भौतिक गोष्टी, मौजमजा.
– योगसाधना, अध्यात्म… यांचे स्थान गौण. त्यामुळे होते काय तर ‘पहाटेची अमर्याद ताकद काय आहे याचा अनुभव येत नाही. मग सकाळी उठण्याची गोडी कशी निर्माण होणार? त्याचे फायदे कसे कळणार?
योगसाधना या विषयावर विचार करताना आपण त्याच संदर्भात बघतो आहोत.
हेल एरॉल्ड यांना कसा फायदा झाला व त्यांनी सांगितलेला कोडवर्ड एसएव्हीईआरएस (सेव्हर्स) त्याबद्दल चिंतन करीत आहोत. त्यांपैकी पहिले तीन मुद्दे आपण बघितले.
१) सायलेन्स (ध्यान) २)ऍफर्मेशन (सकारात्मक, स्वयंसूचना),

३) व्हिज्युअलायझेशन (चांगल्या कल्पना मनात घोळवणे).
… आता पुढच्या तीनवर विचार करूया.

४) एक्सर्साइज (व्यायाम), ५) रिडिंग (वाचन), ६) स्क्राइबिंग (लिहिणे)

४) व्यायाम ः-
लहानपणापासून हा शब्द आपण ऐकतो. शरीरासाठी मुख्य म्हणजे त्याच्या आरोग्यासाठी (शारीरिक) व्यायाम अत्यंत जरुरी असतो. काहीजण तो नियमित करतात तर अनेकजण काही शारीरिक रोग झाल्यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून करतात. काही रोग म्हणजे – मान, पाठ, कंबर, गुडघेदुखी, वजन वाढणे, मधुमेह… वगैरे. पण हे बरोबर नाही. प्रत्येक माणसाने व्यायाम हा आयुष्यभर केलाच पाहिजे. चुकीच्या जीवनपद्धतीमुळे होणारे अनेक रोग त्यामुळे टाळले जातील.
आजच्या धावपळीच्या जीवनात शरीर निरोगी असणे अत्यंत जरुरीचे आहे.
शारीरिक व्यायामाचे अनेक फायदे आहेत…
* सांधे व्यवस्थित हलवल्यामुळे सर्व शरीरात रक्ताभिसरण चांगले होते, तसेच सांधेदुखी होत नाही. पण मुख्य म्हणजे शरीरातील प्रत्येक सांधा- लहान, मोठा हलवणे आवश्यक आहे.
* रक्त सर्व शरीरात फिरल्यामुळे हाडे, मांस यांचे आरोग्य व्यवस्थित राहते.
* सर्व इंद्रियांना आवश्यक तितके रक्त मिळाल्यामुळे भोजनातील सर्व घटक- कर्बोदके, स्थूल पदार्थ, प्रथिने, व्हिटामिन्स, मिनरल्स… प्रत्येक इंद्रियाला मिळतात.
* मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित मिळाल्यामुळे आळस कमी होऊन तरतरी येते. मन देखील प्रफुल्लित राहते.
* अंगाच्या विविध भागांत चरबी एकत्र न साठल्यामुळे वय व उंचीनुसार वजन आटोक्यात राहते.
* शरीरातील ऊर्जेला अपेक्षित वळण मिळते. असे न झाले तर ती ऊर्जा वासनांकडे व अतिरिक्त मैथुनाकडे वळते असे म्हणतात.
* मनाची एकाग्रता वाढते. मुलांचा अभ्यास, वयस्कांची कामे व्यवस्थित होतात.
हे व्यायाम विविध प्रकारचे असतात-
– फिरायला/पळायला जाणे
– डोंगर/पर्वत चढणे
– व्यायामशाळेत (जीम) जाणे, पोहणे, ट्रेडमिल करणे.
सर्वांत चांगला व्यायाम म्हणजे मैदानी खेळ खेळणे- हुतुतु, फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट… त्यामुळे शारीरिक व्यायामाचे सर्व फायदे मिळतात. मन प्रफुल्लित राहते. पचन व्यवस्थित होते. झोप शांत लागते.
पण त्याचबरोबर योगशास्त्राचा विचारही हवा. कारण योगसाधनेमुळे मनुष्याच्या सर्व पैलूंवर हवा तसा परिणाम होतो- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक.
कपालभाती- भस्त्रिका प्राणायाम ः यांच्यामुळे सखोल श्‍वास घेतला जातो. त्यामुळे शरीराला प्राणवायू पुष्कळ प्रमाणात मिळतो. तसेच प्राणशक्तीवर नियंत्रण येते. मानवाची सर्व इंद्रिये उत्तमपणे कार्यरत राहतात.
योगसाधनेचा आणखी एक फायदा म्हणजे त्याचा कसलाही खर्च नाही. कुठल्याही जागी योगसाधना करू शकतो. घरी, मैदानात, निसर्गरम्य वातावरणात तसेच सर्व ऋतूत आणि मुख्य म्हणजे जोडीदार लागत नाही.
सारांश काय- तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक पैलूत व्यक्ती चैतन्यमय हवी.
आजच्या कोरोनाच्या राज्यात अशा चैतन्याची सर्वांना गरज आहे.
स्वामी विवेकानंद म्हणायचे –
‘‘आरोग्य चांगले राहण्यासाठी ध्यान करा व फुटबॉल खेळा.’’
बंगाल व गोवा दोन्ही ठिकाणी फुटबॉल हा लोकांचा आवडता खेळ आहे.
‘सूर्यनमस्कार’ हा एक अत्यंत चांगला व्यायाम आहे. कारण त्यामुळे शरीराच्या विविध भागांना चांगलाच व्यायाम घडतो आणि सूर्याची प्रार्थना बीजमंत्र म्हणून केले तर ती उत्तम योगसाधना देखील होते.

५) रीडिंग (वाचन) ः
साहित्यकार म्हणतात की ‘‘पुस्तकं वाचणारी माणसं एका आयुष्यात अनेक आयुष्यं जगतात.’’
चांगल्या पुस्तकांमधून अनेकांना चांगले ज्ञान मिळते. ऐतिहासिक पुस्तके वाचली तर कुणाला कसे यश मिळाले हे कळते. त्याचबरोबर कुणी कसल्या चुका केल्या हे कळले तर शहाणपण येतं.
‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’- या न्यायाने इतरांच्या अनुभवाने शहाणे होणारे जगावर राज्य करतात.
वॉरेन बफे, बिल गेट्‌स, मार्क जुकरबर्ग… हे सगळे म्हणे आठवड्याला दोन पुस्तके वाचून पूर्ण करत.

६) स्ट्राइबिंग (लिहिणे) ः
आपल्या मनात काय विचार चालतात हे लिहिल्याने मन मोकळे होते. अनेक लोक विविध विषयांवर लिहितात. शेवटी ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. अनेकजण स्वतःचीच डायरी (रोजनिशी) दररोज लिहितात. काही व्यक्ती पत्रे लिहितात. काहींच्या डायर्‍या व पत्रे पुष्कळवेळा पुस्तकरूपाने छापतात. बहुतकरून त्यांच्या मृत्यूनंतर. असे साहित्य अत्यंत मार्गदर्शक असते.
काही लोक छान व भावनाप्रधान कविता लिहितात. थोड्याच ओळींनी त्यांचे मन समाजाला कळते. त्या कविता खरे म्हणजे ‘स्वसंवाद’ असतो.

संत ज्ञानेश्‍वरांनी अगदी लहान वयात ज्ञानेश्‍वरी लिहिली. म्हणून सामान्य जनांना गीतेचे प्राकृत रूपात दर्शन घडले.
संत म्हणतात-
‘‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांशी सांगावे,
शहाणे करून सोडावे सकळ जना.’’
‘‘दिसामाजी काही तरी लिहीत जावे.’’
इंग्रजीत म्हण आहे,‘‘ही इज वेल रेड’’ तो माणूस पुष्कळ वाचणारा आहे. म्हणजेच फार बुद्धिमान आहे. भारतात बहुश्रुत म्हणतात. सारांश लिहिणे, वाचणे, बोलणे अर्थात सत्‌वचन हे बुद्धीसाठी चांगले आहे.- ‘न हि ज्ञानेन संदृशं पवित्रमिह विद्यते’.
( संदर्भः- पहाटेची अमर्याद ताकद- सुपर पॉझिटीव्हिटी)