येत्या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीबाबत ७ जुलैला निर्णय

0
12

>> विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांची माहिती

येत्या ११ जुलैपासून सुरू होणार्‍या गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे दिवस कमी करावेत की पूर्वी ठरल्यानुसार १२ ऑगस्टपर्यंत घ्यावे, याचा निर्णय ७ जुलै रोजी होणार्‍या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी काल स्पष्ट केले. पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचे दिवस कमी करण्याचा अद्याप तरी निर्णय घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी सांगितले.

गुरुवार दि. ७ जुलै रोजी होणार्‍या कामगार सल्लागार समितीच्या बैठकीला सत्ताधारी व विरोधी पक्षाचे सदस्य हजर असतील आणि त्यावेळी एकमताने अधिवेशन कालावधीबाबतचा काय तो निर्णय घेण्यात येणार असल्याचे तवडकर यांनी सांगितले.

मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे विधानसभेचे अधिवेशन आवश्यक तेवढे दिवस घेता आले नव्हते. त्यामुळे अधिवेशन २५ दिवस चालावे, अशी आमची इच्छा आहे; मात्र पंचायत निवडणुका असल्यामुळे आम्हाला पाहिजे तेवढे दिवस हे अधिवेशन घेता येईल का, हेही पाहावे लागणार असल्याचे तवडकर म्हणाले.

मूळ गोमंतकीय व्यक्ती म्हणजेच ‘पोगो’ विधेयक हे कायदेशीर सल्ल्यासाठी सरकारकडे पाठवण्यात आलेले आहे. त्यामुळे ते विधेयक या अधिवेशनात मांडले जाणार नाही. हे विधेयक विविध खात्यांशी संबंधित आहे. त्यामुळे कायदेशीर सल्ल्यासाठी सरकारकडे पाठवण्यात आले असल्याचे ते म्हणाले.