शिंदे सरकार बहुमत चाचणीत ठरले यशस्वी

0
21

>> १६४ मतांनी जिंकला विश्‍वासदर्शक ठराव

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार बहुमत चाचणीत यशस्वी ठरले असून, १६४ विरुद्ध ९९ मतांनी शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. विशेष म्हणजे विश्वासदर्शक ठरावामध्ये विरोधकांची संख्या तिहेरी आकड्यापर्यंतही पोहचू शकली नाही. दरम्यान, शिंदे गटाकडून व्हीपचे उल्लंघटन केल्या प्रकरणी आदित्य ठाकरे वगळता १४ आमदारांविरोधात तक्रार करण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर काल झालेल्या बहुमत चाचणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आणखी एक आमदार शिंदे गटात सहभागी झाल्याने शिवसेनेला धक्का बसला. शिवसेनेचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मतदान केले.

शिंदे सरकारच्या वतीने सोमवारी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी अनुमोदन दिले. या निवडणुकीत भाजपचे दोन आमदार अनुपस्थित असताना १६४ मते घेऊन शिंदे सरकारने बहुमत चाचणी यशस्वी पार केली. त्यामुळे या सरकारला १६६ आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले.