येत्या निवडणुकीत कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड युती

0
99

>> पत्रकार परिषदेत विजय सरदेसाई यांचे संकेत

येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष व गोवा फॉरवर्ड पक्ष युती होणार असून कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी या युतीसाठी मान्यता दिली असल्याची माहिती काल गोवा फॉरवर्डचे प्रमुख व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

आज बुधवारपासून सुरू होणार्‍या गोवा विधानसभेच्या तीन दिवशीय अधिवेशनात गोवा फॉरवर्ड व कॉंग्रेस विविध प्रश्‍नांबाबत सरकारला एकत्रितपणे छेडणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

तर गोव्यात सौर ऊर्जा
क्रांती घडवू ः सरदेसाई

नीलेश काब्राल व नवी दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यात झालेल्या वादविवादाच्या कार्यक्रमावर बोलताना सरदेसाई यांनी, आमचा वीजमंत्री बनला तर आम्ही राज्यात जी सरकारी जमिनीवर सौर ऊर्जा केंद्र उभारून राज्यात सौर ऊर्जा क्रांती घडव असे सांगितले. तसेच आम्ही मुरगाव बंदर कोळसा मुक्त करू व तेथे जलपर्यटनासाठीचे टर्मिनल बनवू, असे सांगितले. नवी दिल्ली येथील चर्च पाडण्यात भाजप व आप या दोन्ही पक्षांचा हात असल्याचे सरदेसाई यांनी यावेळी सांगितले.

राज्यात गुन्हेगारीला ऊत आला असून दिवसाढवळ्या युवतींवर सामूहिक बलात्कार होऊ लागले असल्याचे ते म्हणाले. अमली पदार्थांचा व्यवहारही कधी नव्हे एवढा वाढला असल्याचा आरोप करतानाच कोविड संचारबंदीच्या काळात सगळे व्यवहार बंद होते. मात्र, खाण उत्खनन व खनिजाची वाहतूक चालू हाते, असा आरोपही त्यांनी केला.

युतीस प्रभारींची मान्यता ः कामत
येत्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्ष समविचारी पक्षांशी युती करण्यास तयार आहे, असे कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी जाहीर केले असल्याचे काल कॉंग्रेस विधिमंडळ गटाचे नेते दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी गोव्यात गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती करण्यास मान्यता दिली असल्याचे राव यांनी सांगितल्याचे कामत म्हणाले. युतीसाठीच्या अटी काय असतील, तसेच अन्य गोष्टींवर चर्चा केली जाईल. पक्षश्रेष्ठी जो काय निर्णय घेतील तो अंतिम असेल, असे कामत पुढे म्हणाले.

युतीसंबंधी दिनेश गुंडूराव हे दोन दिवसांपूर्वी आपणाशी बोलल्याचे कामत यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या केंद्रीय नेत्यांनी गोव्यात गोवा फॉरवर्ड पक्षाशी युती करण्यास मान्यता दिल्याचे कामत म्हणाले.