कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी बसवराज बोम्मई यांची निवड

0
106

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदावर अखेर विद्यमान गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची निवड करण्यात आली आहे. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपण स्वेच्छेने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे सोमवारी स्पष्ट केले होते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता बसवराज बोम्मई यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. बोम्मई हे आज बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी बसवराज बोम्मई यांची एकमताने निवड केल्याचे खुद्द येडियुरप्पा यांनीच जाहीर केले आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देखील आभार मानले आहेत. आम्ही एकमताने बसवराज बोम्मई यांची भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालीच बोम्मई कठोर मेहनत घेतील, असे येडियुरप्पा यांनी जाहीर केले आहे. बोम्मई यांचा शपथविधी होईपर्यंत येडियुरप्पा कर्नाटकचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत.