युवा वर्गासाठी दरमहा १०० मिनिटे मोफत टॉक टाईम देणार : मुख्यमंत्री

0
93

>> महिनाभरात महाविद्यालयांमध्ये ‘वाय-फाय

१८ ते ३५ या वयोगटातील विद्यार्थ्यांसह सर्वांना ‘डिजिटल गोवा’ योजनेखाली दर महिन्याला १०० मिनिटांचा ‘मोफत टॉक टाईम’ देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल सांगितले. तसेच सर्व महाविद्यालयांत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची विद्यार्थ्यांनी जी मागणी आहे ती महिनाभरात पूर्ण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपने काल येथील इन्स्टिट्युट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित केलेल्या विद्यापीठ विद्यार्थी मंडळ गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
पुढे बोलताना पार्सेकर म्हणाले, की भाजप सरकारने गोव्याचा चौफेर विकास केलेला असून आम्हांला आणखी किमान २५ वर्षे गोव्यावर राज्य करायचे आहे. मोप विमानतळासह सर्व विकासकामांना सरकार गती देणार असून सुंदर गोव्याबरोबरच संपन्न गोवा हे भाजपचे स्वप्न असल्याचे ते म्हणाले.
गुगलबरोबर समझोता करार
राज्यातील युवा वर्गाचा विचार करून गोवा सरकारने गुगल बरोबर समझोता करार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पार्सेकर यांनी यावेळी सांगितले. या समझोता करारानुसार गुगल गोव्यात ‘ऍन्ड्रॉइड डेव्हलपर्स’ अभ्यासक्रम सुरू करणार आहे. ७ ते ८ आठवड्यांचा हा कोर्स असेल. देशांत ऍन्ड्रॉईड डेव्हलपर्स नसून ते निर्माण करण्याचे काम या अभ्यासक्रमामुळे होणार असून त्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकणार असल्याचे पार्सेकर यांनी यावेळी नमूद केले. विद्यार्थ्यांनी सरकारी नोकर्‍यांच्या मागे न धावता उद्योजक बनावे, असे आवाहन करतानाच सरकारकडून मिळणार्‍या प्रोत्साहनाच्या बळावर गोव्यात रोज तीन युवक उद्योजक बनण्यासाठी पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.