डिचोलीतून नरेश सावळांनाच युतीची उमेदवारी : ढवळीकर

0
63

 

भाजप व मगोची युती कायम आहे. डिचोली मतदारसंघातून नरेश सावळ यांनाच युतीची उमेदवारी मिळावी असा समर्थकांचा आग्रह आहे. त्यानुसार सावळ यांना उमेदवारी नक्की मिळेल अशी ग्वाही मगोचे ज्येष्ठ नेते व साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल येथे दिली. मये पर्यटक तलाव परिसरात डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांच्या समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. ढवळीकर बोलत होते. यावेळी आमदार नरेश सावळ, जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये, नगरसेवक निसार शेख व्यासपीठावर उपस्थित होते.

४ ऑक्टोबरला घोषणा
श्री. ढवळीकर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाला नवी भरारी मिळणार आहे. मगो पक्षात येणार्‍यांचे स्वागत असून सर्व काही जनतेला व कार्यकर्त्यांना हवे तसेच घडेल. याविषयीची सविस्तर घोषणा ४ ऑक्टोबरला करणार असल्याचे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. आमदार सावळ जनतेचा सेवक या नात्याने काम करीत आहेत. मगो पक्षाची वाटचाल यशस्वी करण्यासाठी त्यांनी पक्षात यावे असे आवाहन ढवळीकरांनी यावेळी केले.
आमदार सावळ यांनी जनतेला विश्‍वासात घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले. सुदिन ढवळीकर यांनी डिचोलीच्या विकासाला मदत केल्याने अनेक प्रकल्प मार्गी लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मडकईकर, नरेश सावळ
सुदिन ढवळीकरांना भेटले
कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर व डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी काल सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांची भेट घेऊन मगो प्रवेशावर चर्चा केली. परंतु आपल्या पक्षात कुणाला प्रवेश द्यावा यासंबंधिचा निर्णय ४ ऑक्टोबरनंतरच घेतला जाईल, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
सध्याच्या राजकीय परिस्थितीत मगोत प्रवेश करण्यासाठी अन्य एक अपक्ष आमदारही तयार झाल्याचे वृत्त आहे. परंतु कुणाला प्रवेश द्यावा यावर योग्य तो विचार करूनच निर्णय घेण्याचे मगोने ठरविले आहे.