युवकांना ५०% जागा न दिल्यास कॉंग्रेसचे पुन्हा पानीपत निश्‍चित

0
123

>>युवा नेत्यांचा पक्षाला इशारा

२०१७ साली राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने ४० मतदारसंघापैकी किमान २० मतदारसंघात युवा उमेदवारांना संधी द्यायला हवी. अन्यथा पक्षाला विजय मिळणे कठीणच असल्याचे कॉंग्रेस प्रवक्ते व सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी काल सांगितले. पक्षाचे सचिव दुर्गादास कामत व अन्य एक युवा नेते व पक्षाचे सदस्य तन्वीर खतिब यांनीही तशीच प्रतिक्रिया व्यक्त केली.
श्री. कवठणकर म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाने आता विधानसभा निवडणुकीत युवा नेते व नव्या चेहर्‍यांना संधी द्यायला हवी. किमान २० मतदारसंघात नवे चेहरे व युवकांना संधी मिळायला हवी. २०१२ सालच्या निवडणुकीत पक्षाने जुन्याच चेहर्‍यांना संधी दिली. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींना उमेदवारी देण्याची चूकही केली. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांनाही उमेदवारी दिली. त्यामुळे मतदारांनी कॉंग्रेसचा दारूण पराभव केला. यावेळी जर कॉंग्रेसला विजयी व्हायचे असेल तर नवे चेहरे व युवा नेत्यांना उमेदवारी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही स्वत: निवडणूक लढवण्यास इच्छुक आहात काय, असे विचारले असता होय, आपण मयें मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याचा विचार करीत असल्याचे ते म्हणाले. याविषयी बोलताना पक्षाचे सचिव दुर्गादास कामत म्हणाले की, पक्षाचे सध्याचे आमदार सोडून अन्य सर्व जागांवर नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात यावी. त्यात महिला व पुरुष अशी वाटणी करून युवा नेत्यांना उमेदवारी द्यावी. उमेदवारी देताना सर्व जाती-धर्मांतील युवकांचा विचार केला जावा, असे ते म्हणाले. दुर्गादास कामत हे स्वत: पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
पक्षाचे अन्य एक युवा नेते तन्वीर खतीब म्हणाले की, येत्या विधानसभा निवडणुकीत किमान २५ जागा युवा नेत्यांना मिळायला हव्यात. त्यात महिलांनाही स्थान मिळायला हवे. लोकांनी मागील निवडणुकीत झिडकारलेल्या नेत्यांना संधी देण्याऐवजी नव्या दमाच्या नेत्यांना उमेदवारी देणेच शहाणपणाचे ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिंकून येण्याची क्षमता आहे, अशा युवा नेत्यांना कॉंग्रेसने या निवडणुकीत उमेदवारी द्यायला हवी, असे युवा कॉंग्रेस नेते सचिन परब म्हणाले. ज्येष्ठांसाठीही हाच नियम लागू करण्यात यावा. कारण पक्ष सत्तेवर येणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. ज्येष्ठ नेते हे अनुभवी असल्याने त्यांना डावलणे शक्य नसल्याचे ते म्हणाले. आपण मांद्रें मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे ते म्हणाले.