माणूस घडविणार्‍या शिक्षणाची कमतरता : पर्रीकर

0
111

>>साखळीत रोजगार मेळाव्यात बेरोजगारांना मार्गदर्शन

माणूस घडविणारे शिक्षण महत्त्वाचे आहे. मात्र, आजच्या शिक्षण व्यवस्थेत त्याची कमतरता भासते. पुस्तक परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण होत असले तरी जीवनाच्या परीक्षेत ते नापास होऊ नयेत यासाठी शिक्षणाच्या कक्षा रुंदावणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.
साखळी रवींद्र भवनामध्ये रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर सुमारे हजारभर युवकांना संरक्षणमंत्र्यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आपण कसा घडलो याची कहाणी यावेळी संरक्षणमंत्र्यांनी कथन केली. आपली आवड, आपण काय शिकत आहोत, भविष्यात आपल्याला काय साधायचे आहे या सर्व गोष्टींचा समन्वय साधताना विचारपूर्वक निर्णय घ्या असा सल्ला त्यांनी उपस्थित युवा-युवतींना दिला. अंधारातून प्रकाशाकडे जात असताना शिक्षणाद्वारे आम्ही प्रगल्भ होत असलो तरी परिपूर्ण होण्यासाठी नावीन्याचा ध्यास घ्या. त्याकरिता जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होण्याचा प्रयत्न करा असे पर्रीकर म्हणाले. सभापती अनंत शेट म्हणाले, युवक हेच देशाचे भविष्य आहेत. युवकांनी आपली प्रतिभाशक्ती स्वत:च्या व देशाच्या भल्यासाठी वापरावी. रोजगार मेळाव्याच्या माध्यमाने युवकांनी करिअर घडवावे असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी बोलताना डॉ. प्रमोद सावंत यांनी युवकांना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी मेळावा आयोजित केल्याचे सांगून काही प्रमाणात सुशिक्षितांना रोजगार देण्याचा हेतू असल्याचे स्पष्ट केले. सरकारी नोकरी प्रत्येकाला मिळणे कठीण असून खासगी नोकरी व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून युवा शक्तीला स्वावलंबी बनवण्याचा ध्यास असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले. समई प्रज्वलित करून संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते रोजगार मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. संरक्षण मंत्र्यांहस्ते मेळाव्यात सहभागी कंपनींच्या अधिकार्‍यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पर्रीकर यांनी यावेळी आमदार डॉ. प्रमोद सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुमारे पाच हजार बेरोजगार युवक-युवतींनी नोंदणी केली होती.