Home Featured युद्ध आपल्या दाराशी

युद्ध आपल्या दाराशी

0

सागरी नौकानयनविषयक आंतरराष्ट्रीय कायद्याला खुंटीवर टांगत अमेरिकेच्या पाणबुडीने इराणची भारतातून परतीच्या वाटेवर असलेली युद्धनौका श्रीलंकेजवळ हिंदी महासागरात क्षेपणास्त्र डागून बुडवली. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्र आहे आणि प्रत्यक्ष युद्धभूमीपासून दोन हजार नावीक मैल दूर आहे. तरीही अशा प्रकारचा हल्ला चढवून अमेरिकेने हे युद्ध आता भारताच्या उंबरठ्यावर आणून ठेवले आहे. इराणची ही युद्धनौका बुडत असताना त्यावरून पाठवल्या गेलेल्या संदेशाला अनुसरून श्रीलंकेच्या नौदलाने आणि हवाई दलाने त्या खलाशांना वाचवण्यासाठी धाव घेऊन आपले कर्तव्य पार पाडले. त्यांनी बत्तीस खलाशांना वाचवलेही, परंतु 86 खलाशांना ह्या हल्ल्यात जलसमाधी घ्यावी लागली आहे. ही युद्धनौका भारतीय नौदलाची पाहुणी होती. भारतात विशाखापट्टणमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या युद्धसरावात भाग घेण्यासाठी ती येथे आलेली होती. परतीच्या मार्गावर तिच्यावर अशा प्रकारचा हल्ला झाला. प्रत्यक्ष हल्ला करणारी पाणबुडी अत्यंत जवळ येऊन पोहोचली असूनही या युद्धनौकेला तिचा थांगपत्ता लागला नाही ह्यावरून अमेरिकेने आत्मसात केलेले प्रगत तंत्रज्ञान तर प्रत्ययास येतेच, शिवाय प्रत्यक्ष पाणबुडीद्वारे अशा प्रकारे हल्ला चढवून युद्धनौका समुद्रात बुडवली जात असतानाचा रिअल टाइम व्हिडिओ देखील अमेरिकेने प्रसृत केला आहे.हे देखील प्रगत तंत्रज्ञानातूनच साध्य झाले आहे. त्यामुळे अमेरिकेसारख्या युद्धखोर देशाने साध्य केलेल्या ह्या गोष्टी संपूर्ण जगासाठीही धोक्याचा इशारा आहेत. आंतरराष्ट्रीय कायद्याला न जुमानता ज्या प्रकारे अमेरिकेने हिंदी महासागरात हा हल्ला केला, त्यातून निश्चितपणे काही अतिशय गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. श्रीलंकेचे खासदार आणि माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल राजपक्षे यांनी अमेरिकेच्या कृतीला घेतलेला आक्षेप योग्य आहे. हा हल्ला श्रीलंकेच्या जवळ झाला. भारताच्या नाविक हद्दीमध्ये झाला नाही, परंतु तरीदेखील हिंदी महासागरामध्ये अशा प्रकारचा हल्ला होतो आणि तोही भारताला कोणतीही पूर्वसूचना न देता ही दांडगाई अभूतपूर्व आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच अमेरिकी पाणबुडीने एखादी युद्धनौका बुडवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आणि कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती त्यांच्या अलीकडच्या निर्णयांतून प्रत्ययाला येते. मात्र, भारतीय सागरी हद्दीपलीकडे का होईना, परंतु हिंदी महासागरात भारताच्या पाहुण्या युद्धनौकेवर झालेल्या ह्या हल्ल्याबाबत भारत सरकारने मौन पत्करणे समर्थनीय ठरत नाही. इराणचे सर्वेसर्वा खामेनेई यांची अमेरिकेने इस्रायलमार्फत हत्या केली, त्यावर भारताने मौन बाळगले. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्याबाबत सरकारला सवाल केले. इराण हा नाही म्हटले तरी भारताचा मित्रदेश होता. काश्मीरसारख्या मुद्द्यावर त्याने वेगळी भूमिका घेतली होती हे खरे, परंतु तेल खरेदीपासून छाबहार बंदराच्या विकासापर्यंत त्याने भारताला मदत केली होती. परंतु एकीकडे इस्रायल – अमेरिका आणि दुसरीकडे इराण असा पेच असल्याने भारताने त्यावर प्रतिक्रिया देणे टाळले. परंतु आता अगदी आपल्या समीप हिंदी महासागरामध्ये अशा प्रकारे आपल्या पाहुण्या जहाजावर हल्ला होतो आणि खलाशांना जलसमाधी घडवली जाते, तरीही जर भारत सरकार मौन बाळगणार असेल तर ते योग्य म्हणता येत नाही. अमेरिकेच्या दडपणाखाली आपण मौन बाळगले आहे असा त्याचा अर्थ होईल. ह्या हल्ल्यास भारतालाही जबाबदार धरण्याचा प्रकार घडताना दिसतो आहे. वास्तविक, ह्या हल्ल्याशी ना भारताचा काही संबंध आहे, ना त्याला त्याची कोणती पूर्वसूचना होती. परंतु अशा प्रकारची पूर्वसूचना नसणे ही देखील सामरिकदृष्ट्या गंभीर गोष्ट आहे. आपल्या जवळच्या समुद्रामध्ये अमेरिकेची पाणबुडी येऊन एवढा मोठा हल्ला चढवते आणि अशा हालचालींची चाहुलही भारतीय नौदलाला लागू नये हे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी देखील घातक आहे. आपण आंतरराष्ट्रीय कायदेकानुनांना न जुमानता मनमानीपणे कुठेही कोणावरही हल्ला चढवू शकतो हाच माज अमेरिकेने ह्या हल्ल्यातून जगाला दाखवलेला आहे. त्यामुळे ह्या दांडगाईला विरोध होणे आवश्यक होते. भारत हा जर एक महासत्ता बनायला निघालेला बलवान सार्वभौम देश असेल, तर आपल्या उंबरठ्यावर, हिंदी महासागरामध्ये कोणीही यावे आणि आपले युद्ध येथे लढावे ह्या प्रकाराला आपण कडाडून विरोध करायला हवा. अन्यथा उद्या हे लोण आपल्या देशापर्यंत येऊन पोहोचणे असंभव नाही. इराण – अमेरिका युद्ध हे दिवसेंदिवस अधिकाधिक घातक आणि अधिकाधिक व्यापक होत चाललेले दिसते आहे. इराणची ताकद जरी कमी होत चालली असली, तरी त्याचा लढण्याचा निर्धार कमी झालेला दिसत नाही. ह्या युद्धाची व्याप्ती किती राहील आणि त्याचा ताप कुठवर कोणाला सोसावा लागेल ह्याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. इराणच्या युद्धनौकेवरील हल्ल्याने युद्ध आता आपल्याही दाराशी आणून ठेवले आहे.