Home Featured युद्धाचा भडका

युद्धाचा भडका

0

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकीकडे चर्चेचा बहाणा बनवीत दुसरीकडे इस्रायलच्या मदतीने इराणवर भीषण बॉम्बवर्षाव करून तेथील सत्ताधीश खामेनेई यांचा खात्मा केला. आपल्याला न जुमानणाऱ्या सत्ताधीशांना कोणत्याही थराला जाऊन पदच्युत करायचे ही अमेरिकेची जुनी नीती आहे. सद्दाम हुसेनपासून खामेनेईपर्यंत ती चालत आली आहे. ज्या राजवटी आपले वर्चस्व जुमानत नाहीत, त्यांना सत्तेवरून खाली खेचण्यासाठी अमेरिका सर्व हत्यारे वापरते. अगदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समाजमाध्यमांवरून राजवटीविरुद्ध जनतेमध्ये आक्रोष उत्पन्न करून तिला आंदोलनास प्रवृत्त करण्यापासून, थेट युद्ध पुकारून सत्ता नष्ट करण्यापर्यंत सर्व काही अमेरिका करते. काही वर्षे अरब जगतामध्ये ‘अरब स्प्रिंग’ च्या नावाखाली चाललेली सत्तापालटाची मालिका असो, अथवा नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशमधील सत्तांतरे असोत, आधुनिक सत्तांतरांसाठी समाजमाध्यमांचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आलेला आहे. इराणमध्येही तेथील जनतेला अशाच प्रकारे राजवटीविरुद्ध आंदोलनास प्रवृत्त करण्यात आले होते. परंतु इराणमधील खामेनेई यांच्या नेतृत्वाखालील राजवटीने ते युवकांचे आंदोलन बळाचा वापर करून चिरडून टाकले. त्यामुळे इराणमध्ये सत्तापालटासाठी इस्रायलच्या मदतीने अमेरिकेने सध्याचे युद्ध पुकारले आहे. इराण अण्वस्त्रे विकसित करीत असल्याचा ठपका ठेवून गेली अनेक वर्षे अमेरिकेने अकांडतांडव चालवले होते. प्रत्यक्षात ही अण्वस्त्रे आज कुठेच दिसत नाहीत. गेल्या वर्षी 12 दिवस चाललेल्या युद्धात इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले चढवले होते. आता पुन्हा एकवार इराणविरुद्ध इस्रायल आणि अमेरिकेने पुकारलेले हे युद्ध निर्णायक स्वरूपाचे ठरावे असा ट्रम्प यांचा प्रयत्न दिसतो. इराणच्या जनतेने सरकार उलथवावे असे आवाहन ट्रम्प पुन्हा पुन्हा करीत आहेत, मात्र, खामेनेई यांचा खात्मा करणाऱ्या अमेरिकेविरुद्ध शियापंथीयांची भारतासह जगभरात निदर्शने चालली आहेत. अलीकडे अमेरिकेशी लाळघोटेपणा चालवलेल्या पाकिस्तानमध्ये देखील जनतेने अमेरिकी दूतावासांवर हल्ले चढवून आपला रोष व्यक्त केला. इराणने आपला प्रतिकार केवळ इस्रायलपुरता मर्यादित ठेवला नाही. त्याऐवजी त्याने मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांना आसरा देणाऱ्या देशांनाच लक्ष्य केले. दुबई, अबुधाबी, दोहा, मनामा ह्या शहरांना क्षेपणास्त्रे आणि द्रोनद्वारे लक्ष्य केले जात आहे त्याचा अर्थ तोच आहे. अमेरिकेची साथसोबत करणाऱ्या संयुक्त अरब अमिरात, कतार, बहरीन ह्या देशांना इराणने ह्या हल्ल्यांद्वारे इशारा दिला आहे. इस्रायलने काल लेबनानवर हल्ले चढवले. इराणने गेल्या अनेक वर्षांत लेबनानपासून येमेनपर्यंत आपले हस्तक सुसज्ज केले आहेत. गाझामधील हमास, लेबनानमधील हिज्बुल्ला, येमेनमधील हौथी हे सगळे इराणचे हस्तक आहेत, ज्यांचा वापर इराणकडून केला जाऊ शकतो. हे युद्ध लांबले तर त्याचे व्यापक आणि घातक परिणाम भारतासह संपूर्ण जगावर संभवतात. सध्या विमान वाहतूक क्षेत्राला युद्धाचा मोठा फटका बसला आहे. हे युद्ध आखाती देशांमध्ये पसरले तर तेथे असलेल्या लक्षावधी भारतीयांना फटका बसू शकतो. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालणारी तेल व नैसर्गिक वायूची जलवाहतूक ठप्प झाली तर देशोदेशीच्या अर्थव्यवस्थांना हादरे बसल्याविना राहणार नाहीत. भारतासारख्या देशात तर कच्च्या तेलाची किंमत बॅरलमागे एका डॉलरने वाढली, तरी एकूण आयात खर्चात दीड अब्ज डॉलरचा फटका बसत असतो. भारत आपल्यापाशी पंच्याहत्तर दिवस पुरेल एवढा तेलसाठा राखत असतो. युद्ध लांबले तर तेलाच्या किंमती भडकतील आणि परिणामी महागाईही भडकेल. डॉलरचा दर आताच 91 रुपयांवर गेला आहे. युद्ध जेवढे लांबेल तेवढा ह्या सगळ्याचा मोठा फटका भारतीय अर्थव्यवस्थेलाही बसल्याशिवाय राहणार नाही. इस्रायल आणि इराण हे दोन्ही भारताचे मित्र देश आहेत. नुकतेच पंतप्रधान मोदी इस्रायलमध्ये जाऊन दोन्ही देशांच्या मैत्रीला दृढ करून परतले आहेत. इराणमधील खामेनेई राजवटीशीही भारताने उत्तम संबंध राखले होते. पाकिस्तानमधील चीन विकसित करीत असलेल्या ग्वादार बंदराला प्रत्युत्तर म्हणून इराणमधील छाबहर बंदर भारताने विकसित केले ते ह्याच मैत्रीच्या बळावर. त्यामुळे विद्यमान संघर्षामध्ये दोन्ही देशांमधील संघर्ष ही भारतासाठीही मोठी राजनैतिक कसरत असेल. युद्ध हे शेवटी वाईटच असते. त्याचे घातक परिणाम सर्व संबंधितांना या ना त्या प्रकारे भोगावेच लागतात. सध्याचा संघर्षही लांबत गेला तर अवघ्या जगावर अकारण आर्थिक संकटांचे ढग घेऊन येणार आहे. त्यामुळे सर्व दृष्टींनी पाहता हे युद्ध लवकरात लवकर आटोक्यात येणे हेच भारतासाठी आणि जगासाठी हितावह ठरेल.