Home Featured युद्धविराम

युद्धविराम

0

अठ्ठेचाळीस तासांत होर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास इराणचे वीजनिर्मिती प्रकल्प उद्ध्वस्त करण्याची निर्वाणीची धमकी देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक पवित्रा बदलत पाच दिवसांचा युद्धविराम घोषित केला आहे. इराणच्या नेत्यांशी बोलणी सुरू आहेत, वाटाघाटी चालल्या आहेत, त्यातून काही तोडगा निघेल अशी सामंजस्याची आणि समेटाची भाषा अचानक ट्रम्प यांच्या तोंडी आली आहे. प्रत्यक्षात इराणच्या नेतृत्वाशी खरोखरीच अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे का, तिला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे का ह्याबाबत साशंकता जरी असली, तरीही हा युद्धविराम जगासाठी तूर्त थोडा दिलासा देणारा आहे हे निश्चित. येत्या पाच दिवसांत जर खरोखरीच अमेरिका, इस्रायल आणि इराण ह्या सर्वांनी शांतता पाळली आणि वाटाघाटी सुरू ठेवल्या, तर कोणी सांगावे, ह्यातून कदाचित काही चांगले निष्पन्न होऊही शकेल. परंतु इराणच्या लष्करी प्रतिकाराची सारी सूत्रे ज्यांच्या हाती सध्या आहेत, त्यांनी ट्रम्प यांच्याशी समेटाची तयारी दर्शवली असल्याची कोणतीही खूण अद्यापपावेतो तरी दिसत नाही. उलट इराणी प्रसारमाध्यमे ट्रम्प यांच्या माघारीची खिल्लीच उडवताना दिसत आहेत. जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव गगनाला भिडल्याने अर्थव्यवस्थेला चटके बसू लागल्यानेच ट्रम्प यांनी ही उसंत घेतली आहे इथपासून ते इराणवर निर्णायक कारवाईसाठी थोडा वेळ मिळावा म्हणून ही वादळापूर्वीची शांतता आहे इथपर्यंत अनेक तर्कवितर्कांना सध्या तोंड फुटले आहे. इराणच्या नेतृत्वामध्ये फूट पाडण्यात अमेरिकेला यश आले असेल का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. खरे तर हे युद्ध ट्रम्प यांनी पुकारले तेव्हा ओमानच्या मध्यस्थीने दोन्ही देशांदरम्यान वाटाघाटीच सुरू होत्या. परंतु अचानक ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेत इस्रायलच्या माध्यमातून इराणवर बॉम्बहल्ले चढवले आणि पहिल्याच दिवशी थेट इराणचे सर्वेसर्वा खामेनेई यांचाच खात्मा केला. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये नागरी उठाव होईल आणि त्या संधीचा फायदा घेत आपला बगलबच्चा तेथे सत्तारूढ करता येईल असे ट्रम्प यांना वाटत होते, परंतु ज्या पद्धतीने इराणने कडवा प्रतिकार केला तो पाहता युद्धखोर अमेरिकेला तोंड देण्याची किती कसोशीने त्यांनी तयारी ठेवली होती आणि नेत्यांमागून नेत्यांच्या हत्या होत असताना देखील तो देश निर्नायकी स्थितीला न पोहोचणे ट्रम्प यांच्यासाठी धक्कादायक होते. होर्मुझची सामुद्रधुनी हा इराणपाशी हुकुमाचा पत्ता होता. तो त्यांनी वापरलाच, शिवाय अमेरिकेच्या आखाती मित्रदेशांनाही हादरवून सोडले. इराणच्या ह्या आक्रमकतेमुळे ट्रम्प यांची गोची झाली होती. युद्धाच्या दर दिवसागणिक तेलाचे दर भडकू लागले. जागतिक अर्थव्यवस्थेला त्याचे हादरे बसू लागले. अमेरिकेच्या मित्रदेशांनीही युद्धखोरीचा भाग बनणे नाकारले. त्यामुळे अशा परिस्थितीत माघार घेणे नामुष्कीजनक ठरले असते. बहुधा त्यामुळेच त्यांनी मागल्या दाराने हा वाटाघाटींचा मार्ग पत्करला असावा. मात्र, ट्रम्प प्रशासन नेमके कोणाशी वाटाघाटी करीत आहे आणि त्यांच्याशी इराणमध्ये सर्वसहमती आहे का ह्याबाबत मोठे प्रश्नचिन्ह आहे. दुसरी मह्त्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रम्प यांनी पाच दिवसांचा युद्धविराम घोषित केलेला असूनही इस्रायलने आपले हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे उद्यापासून परिस्थितीत सुधारणा होते की नाही ह्यावर ह्या तथाकथित युद्धविरामाचे भवितव्य अवलंबून असेल. होर्मुझच्या खाडीवर संयुक्त नियंत्रणाची नवीच टूम ट्रम्प यांनी काढली आहे. शिवाय वाटाघाटींची सुरूवात आपण केलेली नाही, तर इराणकडूनच तसा प्रस्ताव आला असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे सध्या तरी ह्या युद्धविरामाबाबत ठोसपणे काही सांगता येत नाही. जसजशी अधिक माहिती उघड होत जाईल, तसतसे ह्या युद्धविरामाचे स्वरूप स्पष्ट होत जाईल आणि ह्या गेले तीन आठवडे चाललेल्या युद्धाची इतिश्री होईल का हेही समोर येईल. शेवटी हे युद्ध अमेरिकेलाही परवडणारे नाहीच. मुळात ट्रम्प यांची लोकप्रियता घटलेली आहे. मध्यावधी निवडणुका तोंडावर आहेत. मित्रदेशांचीही सक्रिय साथ नाही. अब्जावधी डॉलरांचा नित्य चुराडा चालला आहे. अशा परिस्थितीत हे युद्ध अधिक लांबवणे सर्व दृष्टींनी महाग पडेल हे ट्रम्प यांना जाणवत नसेल अशातला भाग नाही, परंतु युद्ध एकदा सुरू केल्यावर ते थांबवणे हे व्यक्तिगत नामुष्की आणणारे आहे ह्याची त्यांना त्याहून अधिक चिंता आहे. त्यामुळे आता ह्या वाटाघाटींच्या बहाण्याने त्यांनी युद्धविराम पुकारून इराणला संधी देऊ केली आहे. ज्या अण्वस्त्रांची बात ट्रम्प करीत होते ती कुठेच दिसली नाहीत. ज्या सत्तांतराची अपेक्षा ट्रम्प ठेवून होते ते घडले नाही. जी उद्दिष्टे ह्या युद्धावेळी समोर ठेवली होती, त्यापैकी काहीही तडीला गेलेले नाही. त्यामुळे ट्रम्प कितीही म्हणोत, यामध्ये अमेरिकेचा विजय झाला असे अद्याप तरी म्हणताच येत नाही. उलट इराणने ठोशास ठोसा देत जेरीस आणल्याचेच चित्र जगापुढे निर्माण झाले आहे. काही असो, हा युद्धविराम युद्ध संपुष्टात येण्याची नांदी ठरो हीच अपेक्षा.