अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून, जागतिक शांततेसाठी धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी युद्धविरामासाठी पुढाकार घेतला असला तरी, त्यांनी अमेरिकेसमोर अत्यंत कठीण अशा 3 अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्या तरच युद्ध थांबेल, असा स्पष्ट इशारा इराणने दिला आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका स्पष्ट करताना तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत.
पहिली मागणी, गाझा आणि लेबनॉनसह संपूर्ण प्रदेशात तात्काळ आणि कायमस्वरूपी युद्धविराम लागू करावा. दुसरी मागणी, अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्धच्या सर्व आक्रमक लष्करी कारवाया पूर्णपणे थांबवाव्यात आणि तिसरी मागणी म्हणजे भविष्यात इराणवर पुन्हा कोणतेही आक्रमण होणार नाही, याची लिखित आणि ठोस आंतरराष्ट्रीय हमी देण्यात यावी, अशा मागण्या केल्या आहेत.
मोजतबा खामेनेईंचा इशारा
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर, त्यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांनी इराणची सूत्रे अधिकृतपणे हाती घेतली आहेत. सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी गुरुवारी पहिली प्रतिक्रिया दिली. या संदेशात त्यांनी अमेरिका आणि इस्रायलवर आगपाखड करत, मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्याची थेट धमकी दिली आहे.