युतीबाबत मगो कार्यकर्ते संभ्रमात

0
83

>> तातडीने निर्णय घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी

 

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या अनेक नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना २०१७च्या विधानसभा निवडणुकीत भाजप बरोबर युती झालेली नको असल्याने त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीसाठी किमान सहा महिने असताना या प्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लावावा म्हणून पक्ष प्रमुखांकडे तगादा लावला आहे. युती होणार की नाही या प्रश्‍नावर सध्या कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर, फोंड्याचे आमदार लवू मामलेदार यांना भाजप बरोबर युती नको आहे. परंतु सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी अद्याप या प्रश्‍नावरील आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. युतीच्या विषयावर भाजप नेते साबांखा मंत्र्यांच्याच संपर्कात आहेत.
महिनाअखेरपर्यंत निर्णय घ्यावाच लागेल : लवू
सुदीन ढवळीकर वगळता अन्य नेत्यांबरोबर भाजप विशेष चर्चा करण्यास राजी नाही. आमदार मामलेदार यांच्याशी संपर्क केला असता, या प्रश्‍नावर चालू महिना अखेरपर्यंत निर्णय घ्यावाच लागेल, असे त्यांनी सांगितले. गोवा फॉरवर्ड, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांनी एकत्र येऊन फोंडा मतदारसंघ मगोला सोडण्याची तयारी ठेवल्यास मगो भाजपची साथ सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.
कॉंग्रेस-गोवा फॉरवर्ड युती होणार?
कॉंग्रेस व गोवा फॉरवर्ड एकत्र येण्याचा निर्णय जवळजवळ निश्‍चित झाल्याचे कळते. प्रदेश राष्ट्रवादीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जुझे फिलीप डिसौझा यांच्याशीही गोवा फॉरवर्ड संपर्क ठेवून असल्याचे कळते. दरम्यान, फोंडा मतदारसंघावर सध्या भाजपची नजर आहे. माजी मुख्यमंत्री रवी नाईक सध्या फोंडा मतदारसंघात सक्रिय झाले असले तरी त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळू नये यासाठी अनेक कॉंग्रेस नेत्यांचे प्रयत्न चालू आहेत. या संपूर्ण पार्श्‍वभूमीवर भाजप-मगो युतीच्या प्रश्‍नावर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मगो कार्यकर्त्यांची मागणी आहे.