गुजरातमधील राष्ट्रीय एकता दिन कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेलांना वाहिली आदरांजली
ऑपरेशन सिंदूरदरम्यान अवघ्या जगाने पाहिले की जर कुणीही भारताकडे वाकड्या नजरेने पाहिले, तर भारत घरात घुसून मारतो. आज पाकिस्तान आणि दहशतवादाच्या हस्तकांना हे कळले असेल की भारताचे खरे सामर्थ्य काय आहे. शत्रूंना भारताकडून आता निर्णायक, सक्षम आणि अवघ्या जगाला दिसून येईल असे प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरात येथे दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली, त्यावेळी ते बोलत होते. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगरजवळील स्टॅच्यु ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 182 मीटर उंचीच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने त्यांनी जमलेल्या लोकांसोबत एकतेची शपथदेखील घेतली. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानवर टीकास्र सोडले. त्याचवेळी त्यांनी काँग्रेसला देखील लक्ष्य केले.
काँग्रेसने कधीही सरदार पटेलांच्या धोरणांचे पालन केले नाही. त्यामुळे देशाला हिंसाचार आणि रक्तपाताच्या स्वरूपात त्याचे परिणाम भोगावे लागले. सरदार पटेल यांना काश्मीर एक व्हावे अशी इच्छा होती, जसे त्यांनी इतर संस्थानांना एकत्र केले होते; परंतु नेहरूंनी त्यांची इच्छा पूर्ण होण्यापासून रोखले. काँग्रेसच्या चुकांमुळे काश्मीर दशके जळत राहिला. काँग्रेसच्या चुकांमुळे काश्मीरचा एक भाग पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्याखाली गेला, असा आरोप मोदींनी केला.
पाकिस्तानने दहशतवादाला प्रोत्साहन दिले. काश्मीर आणि देशाला इतकी मोठी किंमत मोजावी लागली. काँग्रेस नेहमीच दहशतवादासमोर झुकले. काँग्रेस सरदारांना विसरले, पण आम्ही तसे केले नाही, असेही ते म्हणाले.
2014 पूर्वी नक्षलवादी देशाच्या मोठ्या भागात त्यांचे स्वत:चे राज्य चालवायचे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये जाळून टाकली जायची. प्रशासन असहाय झाले होते; पण आम्ही शहरी नक्षलवादाविरोधात कठोर कारवाई केली. आज त्याचे परिणाम दिसून येत आहेत. आधी 125 जिल्ह्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद्यांचा प्रभाव आता 11 जिल्ह्यांपर्यंत मर्यादित झाला आहे. शिवाय, नक्षलवाद्यांचे अस्तित्व अवघ्या 3 जिल्ह्यांपुरते मर्यादित राहिले आहे, असे मोदी म्हणाले.
भाषणापूर्वी, पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडमध्ये सलामी स्वीकारली. परेडमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व तुकड्यांचे नेतृत्व महिला अधिकाऱ्यांनी केले.
काँग्रेस सरदार पटेलांचे विचार विसरली : मोदी
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर सरकार वल्लभभाई पटेल यांचे विचार विसरल्याचा आरोप केला. सरदार पटेल यांचे आदर्श विचार शासन कारभाराबाबत अनेक बाबतीत मार्गदर्शन करतात. त्यात फक्त बाह्य शत्रूंविरोधातील सरकारची भूमिकाच नव्हे, तर नक्षलवाद आणि घुसखोरीसारख्या अंतर्गत शत्रूंचा सामना करण्याबाबतचेही विचार आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पटेलांच्या विचारांचा आदर असेल, तर आरएसएसवर बंदी घाला : खर्गे
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसवर टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शुक्रवारी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी घालण्यात यावी. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचारांचा आदर करत असतील तर त्यांनी ही बंदी घालावी, असे खर्गे दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हणाले.