अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळामुळे राज्यात कालपासून पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. हवामान विभागाने राज्यात येत्या 6 नोव्हेंबरपर्यंत तुरळक स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
राज्यात मागील चोवीस तासांत पावसाचे प्रमाण कमी नोंद झाले होते. चोवीस तासांत 0.45 इंच एवढ्या पावसाची नोंद झाली, तर शुक्रवारी दिवसभरात पावसाची रिपरिप सुरू राहिली. मागील चोवीस तासांत पणजी येथे कमाल तापमान 32.2 अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले होते. शुक्रवारपासून पुन्हा सुरू झालेल्या पावसामुळे तापमानात पुन्हा घट झाली आहे.
अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळामुळे ऑक्टोबर महिन्यात पावसाची मोठी नोंद झाली. राज्यात 1 ते 31 ऑक्टोबर दरम्यान मुरगावमध्ये सर्वाधिक 19.60 इंच पावसाची नोंद झाली. म्हापसा येथे 14.37 इंच, पेडणे येथे 19.59 इंच, पणजी येथे 18.06 इंच, जुने गोवे येथे 15.63 इंच, साखळी येथे 13.25 इंच, फोंडा येथे 9.41 इंच, धारबांदोडा येथे 18.31 इंच, काणकोण येथे 17.33 इंच, दाबोळीत 14.41 इंच, मडगाव येथे 10.45 इंच, केपेमध्ये 9.85 इंच, सांगे 9.15 इंच पावसाची नोंद झाली.
ऑक्टोबर महिन्यातील
आत्तापर्यंतचा सर्वाधिक पाऊस
2019 – 21.52 इंच, 2006 – 16.68 इंच, 1955 – 16.26 इंच, 1985 – 15.52 इंच, 2025 – 14.78 इंच, 2009 – 13.85 इंच, 1931 – 13.54 इंच, 1928 – 13.09 इंच, 2010 – 12.81 इंच, 2024 – 11.81 इंच.
ऑक्टोबरमध्ये 14.78 इंच पाऊस
राज्यात ऑक्टोबर महिन्यात एकूण 14.78 इंच पावसाची नोंद झाली. यंदाच्या ऑक्टोबरमध्ये मागील 97 वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील पाचव्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर 2019 मध्ये सर्वाधिक 21.52 इंच पावसाची नोंद झाली होती.