Home बातम्या मुख्यमंत्र्यांकडून एसआयआरचे स्वागत

मुख्यमंत्र्यांकडून एसआयआरचे स्वागत

0

गोव्यातील मतदारयाद्यांच्या पुनरीक्षण (एसआयआर) निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी काल माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

याविषयी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे म्हणाले की, मतदारयाद्या बिनचूकच असायला हव्यात. त्यात बोगस मतदारांची नावे असता कामा नयेत. तसेच जे खरेखुरे मतदार आहेत त्यांची नावेही गाळली जाता कामा नयेत. प्रत्येक मतदाराचे नाव या यादीत असायला हवे व त्याला त्याद्वारे मतदानाचा हक्क मिळायला हवा. खरे मतदार हे मतदानांपासून वंचित राहता कामा नयेत. निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार सदानंद शेट तानावडे हे यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतदारयादी पुनरीक्षणाचा जो निर्णय घेतला आहे, तो योग्य असाच निर्णय असून आपण त्या निर्णयाचे स्वागत करीत आहे. देशाच्या ज्या ज्या राज्यात 2026 किंवा 2027 साली विधानसभा निवडणुका व्हायचा आहेत, त्या त्या राज्यात निवडणूक आयोगाने मतदारयादी पुनरीक्षणाचा निर्णय घेतला असल्याचे तानावडे हे म्हणाले. गोव्यात 2027 साली विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने गोव्यातील मतदारयाद्यांचे पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे व तो स्वागतार्ह असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.