यजमान मनोर्वा, जय गणेशची बाजी

0
100

यजमान मनोर्वा स्पोटर्‌‌स अँड कल्चरल क्लब तसेच जय गणेश शापोरा यांनी मनोर्वा चषकासाठीच्या १३व्या अखिल गोवा सीझन चेंडू टी-२० क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांत विजय नोंदवून आगेकूच केली. शापोरा पंचायत मैदानावर या स्पर्धेतील सामने खेळविण्यात येत आहेत.

दिवसातील पहिल्या सामन्यात मनोर्वाने बेतीच्या शांतादुर्गा युनायटेडला ४७ धावांनी नमविले. समीर चोडणकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर मनोर्वाने विजय साकार केला. प्रथम फलंदाजी करताना मनोर्वाने २० षटकांत ६ गडी गमावून १३६ धावा केल्या. त्यांच्या समीर चोडणकरने ३७, सुकुमार पालयेकरने नाबाद २८ व राहुल बांदोडकरने नाबाद २२ धावांचे योगदान दिले. बेतीकडून मुबारक शेख व अमितने प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना समीरच्या भेदक गोलंदाजीसमोर बेतीचा डाव १८.१ षटकांत ८९ धावांत संपला. त्यांच्या अमित कामतने २७ धावांचे योगदान दिले. समीरने १७ धावांत ४ फलंदाजांना माघारी पाठवले.

पहिल्या सामन्याप्रमाणे दुसरा सामनादेखील एकतर्फी ठरला. शापोराच्या जय गणेशने या सामन्यात आसगावच्या बादे बॉईजला ४ गड्यांनी नमविले. प्रथम फलंदाजी करताना बादे संघाने १७ षटकांत ८ बाद १२२ धावा जमवल्या. पुष्पराज एन. व स्वप्नेश यांनी प्रत्येकी २८ धावा करत संघाला शतकी वेस ओलांडून दिली. आनंद नाईकने केवळ २३ धावांत ४ गडी बाद करत बादेचा डाव मर्यादित ठेवला. जय गणेशने १६.१ षटकांत विजयी लक्ष्य गाठले. आनंद नाईकने फलंदाजीतही छाप सोडताना २५ धावा केल्या. व्यंकटेश माईणकरने २३ व मयुर बांदोडकरने २० धावा जोडल्या.