यंदाचा हिवाळा आणि काश्मीर नीती

0
109

 

  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

जम्मू काश्मीरमध्ये एका बाजूने दिनेश्वर शर्मांच्या माध्यमातून संवाद चर्चा घडविली जात आहे, तर दुसर्‍या बाजूला सैन्याचे ‘ऑपरेशन ऑलआऊट’ सुरू आहे. आता काश्मीरमध्ये बर्फवृष्टीला प्रारंभ झाल्यानंतर जिहादी हल्ल्यांत बदल होण्याची शक्यता आहे. त्याच्या मुकाबल्यासाठी नवी रणनीती लागेल.

भारतीय लष्कराने या वर्षी काश्मिरमध्ये चालवलेल्या ‘‘ऑपरेशन ऑलआऊट’’ मुळे हिंसात्मक जिहादी कारवायांना मोठाच आळा बसला. केंद्र आणि राज्य सरकारने परिस्थितीच्या गंभीर मीमांसेनंतर दिनेश्‍वर शर्मांना शांती प्रयासांसाठी ‘मध्यस्थ वार्तालापकार’ नियुक्त केले. २०१६ मध्ये जिहाद्यांनी काश्मीरमध्ये घातलेल्या हिंसक हैदोसामुळे केंद्र व राज्य सरकार जिहादी आणि त्यांच्या समर्थनार्थ सुरक्षादलांवर दगडङ्गेक करणार्‍या तरुणांना काबूत आणून, कायदा व सुव्यवस्था लागू करण्यात गुंतले होते. २०१६च्या सुरवातीला काश्मीरमध्ये दगडङ्गेक करणारे तरूण, त्यांना समर्थन देणारे काश्मिरमधील फुटीरतावादी राजकारणी आणि उर्वरित भारतातल्या स्वयंघोषित मानवाधिकारी आणि विचारवंतांच्या वादळी टीकेमुळे सरकार व सुरक्षा दलांची काश्मीरवरील पकड सैल पडत चालल्याचा भास होत होता.
ऑपरेशन ऑल आऊटआधी सुरक्षादलांच्या कारवाईत मारले गेलेले दहशतवादी आणि दहशतवादी कारवायांमध्ये शहीद झालेले सुरक्षाकर्मी यांचे प्रमाण एकास एक (१ : १) पर्यंत घसरले होते. सेनेने वेळेनुरूप, समंजस निर्णय घेतल्यामुळे आता ते तीन ते पाचास एक (३-५ : १) झाले आहे.
या समंजस निर्णयांतर्गत
१) शूपियां-कुलगाम क्षेत्रात जिहाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सेनेची मोठी कुमक पाठवली गेली.
२) घुसखोर आणि घुसखोरी विरोधी कोष्टकाला पूर्णत: कार्यक्षम करण्यात आल्यामुळे, घुसखोरीचे माहेरघर असलेल्या कुपवाडा क्षेत्रात सीमापारहून होणार्‍या पाकिस्तानी घुसखोरीला आणि त्या अनुषंगाने तेथील जंगलांमध्ये होणार्‍या चकमकींना जबरी चाप बसला.
३) जिहाद्यांनी काश्मिरी पोलिसांना शोधून मारण्याचे काम सुरू केल्यानंतर,अपेक्षाभंग झालेले आणि रागावलेले नागरिकच ‘खबरीं’चे काम करू लागल्यामुळे, सुरक्षादलांना दहशतवादासंबंधी बातम्या मिळण्याच्या कामात तेजी आली.
४) २०१६ मध्ये बुरहान वानीला टिपल्यानंतर सुरक्षादलांनी जिहाद्यांच्या म्होरक्यांची माहिती मिळवून, त्यांना एकएक करून मारण्याच्या प्रणालीचा अवलंब केला.
५) ‘एनकाऊंटर’ किंवा कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन्स चालू असताना जिहाद्यांच्या सोशल मिडियावरील चिथावणीमुळे एकाएकी गोळा होऊन हिंसक गोटमारीवर उतरलेल्या लोकांना आवर घालण्यासाठी सेना, निमलष्करीदल आणि पोलिसांनी समन्वयी कारवाई करून त्यावर मात करायला सुरवात केली.
६) सेनेने देखील परत एकदा कॉर्डन अँड सर्च प्रणालीचा अवलंब करून क्षेत्रीय वर्चस्व नीतीचा अवलंब करणे आणि तदनुसार दहशतवाद्यांना आहे त्याच ठिकाणी घेरून ठेचणे सुरू केले.
७) प्रत्येक ऑपरेशनमध्ये सेनेची राष्ट्रीय रायफल युनिट, अर्ध सैनिक दल/पोलिस आणि वायुसेनेच्या गरूड कमांडोंचा सहभाग असायचा. सर्व संशयित क्षेत्रांमध्ये शोधमोहीम चालवून पक्की माहिती मिळताच तेथे तीनस्तरीय वेढा घालून एका बाजूने जिहादी आणि दुसर्‍या बाजूनी गोटमारांचा बंदोबस्त केला जात आहे.
८) जनसंवाद व ऑपरेशन सदभावना यांच्या माध्यमातून; समुपदेशन, शिक्षण/प्रशिक्षण वर्ग, खेळांचे सामने करत दहशतवादापासून लोकांची भय मुक्तता केली गेली.
९) फुटिरतावादी नेते आणि ‘हवाला ऑपरेटर्स’वर छापे टाकून आणि त्याद्वारे दहशतवाद्यांना मिळणार्‍या आर्थिक मदतीवर कठोर चाप लावून जिहाद्यांचे कंबरडेच मोडले.
काश्मीरमधील जिहादी दहशतवाद्यांवर सामरिक वर्चस्व मिळवण्याचे आणि ते टिकवण्याचे तसेच राजकीय मजबुरीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्यास ते परत खेचून घेण्याचे काम भारतीय सेना मागील २८ वर्षांपासून अथकपणाने करते आहे. मात्र यापुढे सेना हे वर्चस्व टिकवण्यात यशस्वी होईल की दहशतवादी सेनेवर कुरघोडी करण्यासाठी आणखी कुठला तरी मार्ग शोधून दबाव टाकण्यात परत एकदा सफल होतील याचा विचार करण क्रमप्राप्त आहे.

सरकारी सुत्रांनुसार, काश्मिरमध्ये सध्या तरी ’अल कायदा’ किंवा ’इस्लामिक स्टेट’च्या स्पष्ट पाऊल खुणा दिसत नसल्या तरी १६ नोव्हेंबर १७ ला श्रीनगरमधील पोलिस चौकीवर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी आयसीसने उचलली आहे. यापुढे जिहादी दहशतवाद्यांनी प्रचलित असलेली युद्धनीती बदलून आयसीसप्रमाणे आत्मघातकी हल्ल्यांच्या, अत्याधिक हिंसक कारवाया सुरू केल्या तर काश्मिरी तरुणांचे मूलतत्वीकरण (रॅडिकलायझेशन) सुरू झाले हे मान्य करावे लागेल. आता काश्मीरमध्ये बर्फवृष्टीला प्रारंभ झाल्यानंतर जिहादी हल्ला प्रणालीत बदल होण्याची शक्यता आहे. सीमापारहून काश्मिरमधील जिहादी दहशतवादाला चालना देणारे पाकिस्तानी आकाह
अ) भारतीय सेनेने भरीव कष्ट घेऊन उभारलेले ‘इन्टेलिजन्स ग्रीड’ उद्ध्वस्त करण्याचे सर्वेतोपरी प्रयत्न करतील. ते हाणून पाडावे लागतील.
ब) सुरक्षा दलांवरील सामरिक दबाव वाढवण्याकरता, जैश ए महम्मद, लश्कर ए तायबा आणि हुरियत कॉन्ङ्गरन्सच्या माध्यमातून ‘आर्मी कॅम्प’वर हल्ले करण्यासाठी बर्फवृष्टीने वाटा बंद होण्यापूर्वी फिदायीन स्क्वॉडस् पाठवतील.
क) पाकिस्तानमधील २०१८ च्या सार्वत्रिक निवडणुकार्ंची भारत व भारतीय काश्मीरला काहीही सोयरसुतक नसले तरीही हाङ्गिज सईदच्या पाकिस्तानी राजकीय पटलावर नव्यानेच उदयाला आलेल्या मिल्ली मुस्लीम लीग या राजकीय पक्षासाठी भारतीय काश्मीर हे एक मोठ प्रचारी संसाधन आहे. भारतीय सुरक्षा दलांना हिवाळ्यात काश्मीरमध्ये ठाम सामरिक वर्चस्व स्थापन करता आले तर आयएसआय आणि हाफिज सईदच्या भारतविरोधी विखारी प्रचाराच्या शिडातली हवाच निघून जाईल. असे होऊ नये या साठी तो व त्याचे पित्तू, आयएसआय व भारतीय जयचंदांच्या मदतीने भारतीय काश्मीरमध्ये जिहादी हैदोस घालण्याचे जीवापाड प्रयत्न करतील. त्याची माहिती गुप्तचर एजन्सींना मिळवावी लागेल.

काश्मीर प्रश्‍न सोडवण्यासाठी भारत सरकारला, निदान आजतरी सामरिक पर्यायाचा त्याग करणे शक्य नाही. त्यामुळे भविष्यात एक जिहादी हल्ला, पाकिस्तान निर्मित नवा सीमा वाद किंवा सुरक्षा ठिकाणांवरील हल्ले यांमुळे दिनेश्‍वर शर्मांचा शांतीशोध मंदावेल यात शंका नाही. हे टाळण्यासाठी त्यांना स्पष्ट सामरिक, राजकीय व सामाजिक योजनांचा बेधडक अमल करावा लागेल. त्यांच्या शिफारसीवर सरकारची सकारात्मक कारवाई अपेक्षित आहे. दिनेश्‍वर शर्मांच्या वार्तालापातून काश्मीर प्रश्‍नाचे सकारात्मक उत्तर मिळाले नाही तर काश्मीर पुन्हा एकदा अलगाववादी व जिहादी दहशतवादी हिंसेच्या आवर्तात खेचला जाऊ शकतो.